नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख केला आणि त्याबरोबरच पेंग्विनचा उल्लेख करत त्यांना कोपरखळीही मारली.
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सहा मार्गांवर वॉटर मेट्रो सुरू करणार असल्याची घोषणा मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत केली. ती करताना ते म्हणाले, आदित्य ठाकरेजी आणि वरुण सरदेसाईजी, तुम्हाला नरिमन पॉईंटला थेट जलमार्गाने मेट्रोद्वारे वेगाने येता येईल, अशी व्यवस्था आमचे सरकार करणार आहे. त्यावर आदित्य ठाकरे बसल्या जागेवरून म्हणाले की, तुम्हीही बरोबर या… त्यावर मंत्री नितेश राणे उत्तरले- आदित्यजी तुम्हाला कोल्ड कॉफी आवडते तर त्याचीही व्यवस्था मी करेन, कारण आपल्याला तुमची आणि पेंग्विनचीही काळजी घ्यायची आहे. फक्त तुम्ही बांद्र्याहून वॉटर मेट्रोने येताना मला जुहूला पिकअप करा, कारण मी जुहूला राहतो.
महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कोकण किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी आता पारंपरिक लाकडी गस्तीनौकांऐवजी स्टीलच्या म्हणजेच पोलादी अद्ययावत गस्तीनौका तैनात करण्याबरोबरच ड्रोन्सचा वापरही केला जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

सरकारी अधिकारी बनलेत भोंदूबाबा अशोक खरात…
सध्या नोकरशाहीकडून सरकारला सहकार्य मिळत नसल्याचे चित्र असून सरकरला आणि मंत्र्यांना केवळ अशोक खरात फसवतो, असे नसून काही अधिकारीही ‘अशोक खरात’ बनून मंत्र्यांना फसवत आहेत, अशी टीका आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
गेले आठवडाभर भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांची चर्चा टीव्ही वाहिन्यांवरून गाजत आहे. त्याचा संदर्भ मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिला आणि गेल्या तीन आठवड्यांप्रमाणे शेवटच्या आठवड्यातही सरकारला घरचा अहेर दिला. आश्वासन समितीचा अहवाल मांडत असताना आमदार रवि राणा यांनी अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यानंतर मुनगंटीवार यांनी नोकरशाहीतील काही अधिकारी अशोक खरात बनले आहेत आणि ते मंत्र्यांना फसवत आहेत, अशी टीका केली. विधिमंडळाच्या समित्यांना अधिकारी उपस्थित राहत नसतील किंवा सहकार्य करत नसतील तर सरकार किंवा या समित्या म्हणजे बिनपेट्रोलची गाडी बनतील, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.
नोकरशाही म्हणजे घोडा आणि राजकारणी किंवा सरकारमधील मंत्री म्हणजे घोडेस्वार, अशी उपमा कायम दिली जाते आणि घोडेस्वार तरबेज, निष्णात असेल तर नोकरशाही नीट चालते, असेही सांगितले जाते. अधिकारी समित्यांच्या कामकाजात सहकार्य करत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली. त्यावर विविध समित्यांना कामकाजासाठी अधिकाऱ्यांनी सहकार्य न करणे म्हणजे विधिमंडळाच्या सार्वभौमतेशी तडजोड आहे, असे मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले. तसेच ही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी अधिकाऱ्यांची पर्यायाने नोकरशाहीची कानउघाडणी केली.

बिबटे जुन्नरला, सफारी बारामतीला…
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे जुन्नरला बिबट सफारी सुरू व्हावी, यासाठी आग्रही आहेत, असे सांगून वनमंत्री गणेश नाईक यांनी बारामतीला बबिट सफारी व्हावी, हा अजित पवारांचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे, अशी माहिती आज विधानसभेत दिली. त्यावर शरद सोनवणे यांनी शेरा मारला की, बिबटे जुन्नरला आणि बिबट सफारी बारामतीला…
आमदार शरद सोनवणे यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना होणाऱ्या बिबट्यांच्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी बिबट्याचा ड्रेस घालूनच विधानसभेत प्रवेश केला होता. त्याचा उल्लेख करून वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांना सल्ला दिला की, बिबट्यांबद्दल नागरिकांना राग असल्याने तुम्ही असा गणवेष पुन्हा कधीच घालू नका.
येऊरच्या जंगलात वानराला बाणाने मारण्यात आले आहे, हा विषय आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच, धनुष्यबाण चुकीच्या हातात गेला की काय होते, ते बघा, अशी टिप्पणीही त्यांनी केली. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आता एकनाथ शिन्दे यांच्या शिवसेनेला मिळाले असल्याने ठाकरे यांनी ही टिप्पणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शेरा मारला- धनुष्यबाण कोणाच्या हातात याच्यापेक्षा नेम चुकला तर काय होते, याचे हे उदाहरण आहे. त्यावर सभागृहात हंशा उसळला.
(लेखक शैलेंद्र परांजपे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

