Homeब्लॅक अँड व्हाईटयंदा पुन्हा रंगली...

यंदा पुन्हा रंगली हापूसच्याच गोडीची चर्चा!

दरवर्षी मार्च महिना उजाडला की, आंब्याच्या, खासकरून हापूसच्या गोडीची चर्चा सुरु होते. हवामान हवे तसे हेलकावे खात असल्यामुळे त्याच्या परिणामांची चर्चा आपण सारे करीतच असतो. नको त्या वेळी म्हणजे रात्री दहीवडा खाल्ला किंवा आंबट ताक प्यायले की सर्दी होणारच. दुसऱ्या दिवशी सकाळी नाक गळायला लागले की, आपण दोष देणार तो व्हायरल वातावरणाला. तर असे वातावरण बदलले की पिकांवर परिणाम होणे आलेच. गेल्या काही वर्षांत अशा बदलत्या वातावरणाचा अनुभव आपण घेत आहोत. मी मुख्यतः महाराष्ट्रात असलेल्या परिस्थितीच्या संदर्भात बोलतो आहे. तर मार्च महिन्यात चर्चा सुरु होते ती आंब्याची. कोकणात शिमगोत्सव अनुभवायला गेलेल्या लोकांना आंबा खायला मिळण्याचा योग फारसा येत नाही. कुठकुठे जरा चांगली वाढलेली कैरी दिसेल. उन्हात रापून कैऱ्या खाली पडतात. त्या पिवळ्या होतात. पण त्या पिकलेल्या नाहीत. तर आंबा आला अशी बातमी वाचायला आणि बघायला मिळाली. पण पाच पेट्या म्हणजे साधारण पंचवीस डझन आंबे आले, आणि डझनाला चांगला भाव मिळाला अशी ती बातमी.

गतवर्षी डिसेंबर महिन्यात पुण्यात डेक्कनवर गेलो होतो. तिथे सत्तर रुपयाला एक याप्रमाणे दोन पिकलेले तोतापुरी आंबे मिळाले होते. घरी आणले तर नात आनंदली. विक्रेता म्हणाला होता की इथून काही रोपे दक्षिण आफ्रिकेत गेली होती, तिथून काही आंबे इथे येतात. पण तोतापुरी हल्ली बारा महिने येतो म्हणतात. तशा इतर आंब्याच्या काळसर कैऱ्यादेखील हंगाम नसताना मिळत असतात. पण हे सगळे अनैसर्गिक किंवा नैसर्गिक नसलेल्या पद्धतीने तयार केलेले. हल्ली ते भलेमोठे पेरुदेखील येतात. अगदी छोट्या झाडाला हे पेरु धरतात. पण त्याला चव ना ढव.
हापूस आंब्याचे असेच कौतुक असते. कोकणच्या पट्ट्यात तयार होणारा हापूस. खारे वारे आंब्याच्या पिकाला उपयुक्त असतात. देवगड परिसरात होणारा आंबा खवय्यांना आवडतो. रत्नागिरी परिसरातदेखील चांगला आंबा होतो. पण आकारमान वेगवेगळे असते. आता आखातात युद्धाची परिस्थिती असल्यामुळे आपली म्हणजे भारताची बरीच निर्यात अडकून पडली आहे. कांदा आणि अन्य शेतमाल अडकला आहे. युद्ध संपेल तेव्हा संपेल पण कुस्तीचा आखाडा भरला की सगळीकडे धूळच धूळ होते, पहिलवान जखमी होतात आणि ते अंगावर येऊन पडल्याने प्रेक्षकदेखील जखमी होतात. हकनाक मरणारे निष्पाप असतात. निष्पाप असणे हाच त्यांचा दोष असतो. तर आखाती युद्धात तिकडचे लोक अडकले आहेत. त्यामुळे यंदा आंबा तिकडे कमी प्रमाणात जाईल. कदाचित इथे भाव कमी होतील अशी चर्चा आहे. पण यंदा हवामान बरेच विचित्र राहिल्यामुळे देवगड, रत्नागिरी भागात आंब्याचे पीक कमी येणार हे महत्त्वाचे भाकित. भाकित नव्हे, गणित.

हापूस

देवगडचा आंबा हे मोठे आकर्षण. तेथे गेल्या काही वर्षांत आंबा उत्पादन करण्यासाठी माणसांची टंचाई भासते आहे. याचे कारण ज्यांच्याकडे बागा आहेत त्यांच्या पुढच्या पिढ्या उच्चशिक्षित झाल्या आणि नोकरीसाठी शहरात किंवा विदेशात गेल्या. त्यामुळे बागेचे रक्षण आणि देखभाल कशी आणि कोणी करायची हा मोठा प्रश्न. जमीन भरपूर आहे, पण आधीच्या बागा कमी होत आहेत किंवा निगा राखायला माणसे कमी आहेत. त्यामुळे उत्पादन घटते आहे. परिणाम असा की फक्त देवगड तालुक्यात दरसाल कधीकधी पन्नास हजार टन आंबा होत असे, तो आता खूप कमी झाला आहे. धक्कादायक आकडेवारी आहे. हवामानातील बदलांमुळे किंवा अकाली पावसाने नुकसान झाले तर सरकार भरपाई देते किंवा विमा कंपनी भरपाई देते. पण आंब्याचा मोहर कमी झाला म्हणून पीक कमी आले म्हणून काही नुकसानभरपाई मिळत नाही. शिवाय आपल्याकडे कोकणात आंबा, फणस वगैरे शास्त्रीय पद्धतीत उत्पादन करण्याचे एकंदर प्रमाण कमी आहे. अनेक बागा शंभर वर्षे जुन्या आहेत. काही ठिकाणी तर बागेत पडणारी फळे एकत्र केली तरी पेट्याच्या पेट्या भरतात. पण एकूण जमीनधारणा तुलनेने कमी असल्यामुळे प्रत्येक शेतकरी किंवा उत्पादक शास्त्रीय पद्धतीने व्यवसाय करतोच असे नाही. तरीही संपन्नता कमी आहे असे नाही. मूळच्या व्यवसायाला जोडव्यवसाय असतो. आणि अनुभवातून जे ज्ञान मिळते ते महत्त्वाचे असते. असे अनुभवी लोक आंबा आणि अन्य व्यवसायात आहेतच.

मुद्दा असा की, आंबा म्हणजे फक्त हापूसच असे म्हणायचे का? तसे म्हणता येत नाही. शेकडो जाती आहेत आंब्यात. कोकणात राजापुरी आंबा होतो. तो मुरांबा करायला मस्त असतो. तो पिकतो तेव्हादेखील चवदार लागतो. बिटकी आंबा म्हणजे अगदी छोटेछोटे आंबे मुलांना गंमत म्हणून देण्यासाठी मस्त असतात. थोडक्यात काय यंदा परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे आंबा पीक फारसे येणार नाही असे एकंदर वातावरण आहे. परिणाम असा की भाव अगोदरच चढे असणार आहेत. चांगले पॅकिंग केले की, चांगला भावही मिळतो. मूळ उत्पादन कसे आहे याकडे फारसे लक्ष जात नाही. पण एक गंमत अशी आहे की प्रतिकूल हवामानात कसे टिकून राहायचे हे माणसांना कळते त्यापेक्षा प्राण्यांना अधिक कळते. त्यांना नैसर्गिक देणगी असते. आमच्याकडे येणाऱ्या बोकोबाला थंडी वाजत असेल असे कधी वाटते तेव्हा सहज स्पर्श केला तर त्याचे अंग ऊबदार असते असे लक्षात येते. श्वानदेखील थंडीच्या दिवसात ऊबदार जागा शोधते आणि उन्हाळ्यात नेमक्या ठिकाणी जाऊन विसावते.

आंब्याच्या पिकाचेदेखील असेच असते. पुण्यात आमच्या इमारतीसमोर चौकात मधोमध आंब्याचे खूप जुने झाड आहे. जुनाबार. खूप मोहर आला होता. असे वाटले की, यंदा भरपूर आंबा होणार. पण कसचे काय? सगळा मोहर गळून गेला असे वाटले. पण, तसे कायम होत नाही. आतल्या बाजूला कुठेकुठे मोहर शिल्लक असतो. झाड आपल्या पिकाचे रक्षण करते. गेल्या वर्षी आमच्या जवळच्या या झाडाला मोहर फारसा दिसत नव्हता तरी पहाटेच्या वेळी बाहेर पडणाऱ्या लोकांच्या पुढ्यात आंबा पडलेला अनुभवायला मिळाला. म्हणजे जरी, प्रतिकूल परिस्थिती असली तरी झाडांना नैसर्गिक शक्ती असते. ती योग्य वेळी फळे देतातच. त्यामुळे फारशी चिंता नको. भरपूर आंबा खायला मिळेल. योग्य वेळी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

“अनलिमिटेड थाळी” आणि संपन्नतेची सूज!

विवाह समारंभाला जायचे असते तेव्हा माझ्या मनात बरंच काही सुरु असतं. मुख्यतः भोजनाची व्यवस्था हा माझा अभ्यासाचा विषय. एका जुन्या वाड्यात एका खोलीत राहण्याचा अनुभव घेतल्यानंतर आता अर्धा गुंठा आकाराच्या घरात फक्त दोन माणसे, अशा परिस्थितीचा अनुभव मी घेतो...

निशांत कुमार यांनी जदयु टिकवला तरी भाजप समाधानी!

बिहारचे राजकारण आता कोणत्या दिशेला जाईल या संदर्भात वेगवेगळ्या पातळीवर चर्चा होणार आहे. तशी ती सुरुदेखील झाली आहे. बिहार हे सध्यातरी द्विपक्षीय राजकीय मैदान नाही. तीन प्रमुख आणि इतर बारीकसारीक घटक आहेत. एका बाजूला जेवढी ताकद जमा होईल त्यात...

ममतांचे हल्लागुल्ला तर ठाकरे बावचळलेले.. मग ‘इंडी’चा नेता कोण?

देशात सर्वात प्रथम १९६७मध्ये काँग्रेस पक्षाला लोकसभेत मिळालेल्या जागांची संख्या ३००पेक्षा कमी झाली होती. त्यावेळी काँग्रेस कमकुवत झाली होती. मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडील राज्यांमध्ये संयुक्त विधायक दल स्थापन झाले होते. जनसंघासह सगळे विरोधी पक्ष काँग्रेसच्या विरोधात एकत्र झाले होते....
Skip to content