Homeबॅक पेजपायऊतार होताच महापौर...

पायऊतार होताच महापौर निधीतल्या पैशाचा हिशेब चुकता!

अठरा फेब्रुवारी हा पुण्याचे दिवंगत महापौर शांतिलाल सुरतवाला यांचा जन्मदिवस. आज ते हयात नाहीत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर दोन दिवसांनी सुरतवाला यांचे निधन झाले. पुण्यात सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी महापौर असताना आपल्या अभिनव कल्पना आणि मोठा जनसंपर्क यामुळे चर्चेत असलेले शांतिलाल सुरतवाला यांचे कुटूंब मूळचे सूरत येथील. म्हणून कदाचित आडनाव सुरतवाला. मनसोक्त भटकंती करण्याची आवड असलेले सुरतवाला यांना अनेक वर्षांपूर्वी दुर्धर असा आजार झाला होता. पण आधुनिक उपचार करुन तो नियंत्रणात ठेवण्यात त्यांना यश मिळाले होते. पण वयाच्या पंच्याहत्तरीकडे वाटचाल करीत असताना आजार पुन्हा बळावला. तरीही आपल्या आवडत्या काश्मीरची सहल करुन ते आले होते. फक्त एक माजी महापौर म्हणून नव्हे, तर नेता म्हणून सर्वदूर माहिती असूनही आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून राहण्यात सुरतवाला यांनी आनंद मानला. महापौर असताना त्यांनी अनेक अभिनव कल्पना मांडून त्या वास्तवात आणल्या. शरदराव पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या सुरतवाला यांनी मागणी किंवा अन्य काही प्रयत्न न करता पवार यांनी त्यांना पुण्याच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी दिली. महापौर निधीत जमा झालेल्या रकमेचा हिशोब त्यांनी मुदत ज्या दिवशी संपली त्याच दिवशी दिला होता.

पुण्यात गणेशोत्सव खूप मोठा असतो. या मंडळात सामाजिक काम करणारे कार्यकर्ते पुढे राजकारणात येतात. सुरतवाला असेच एका गणेश मंडळाचे कार्यकर्ते. पुण्यात नागरी संघटना होती तेव्हा त्या संघटनेच्या वतीने त्यांना उमेदवारी मिळाली आणि फक्त कार्यकर्ते पाठीशी होते म्हणून ते निवडणुकीत विजयी झाले. त्यावेळी जनता पक्षात असलेले नामवंत वकील म. वि. अकोलकर यांच्या विरोधात सुरतवाला यांनी निवडणूक लढविली होती. प्रचाराच्या काळात अनेक उचापती त्यांनी केल्या. अकोलकर यांना पराभूत केले. सुरतवाला पंच्याहत्तरीचे तर अकोलकर त्यांच्यापेक्षा जवळपास वीस वर्षांनी मोठे. योगायोग म्हणजे अकोलकर यांचेही अलिकडेच निधन झाले. ते वयाची नव्वदी ओलांडूनदेखील स्वयंपूर्ण राहिले. हे दोनही नेते माझे सुह्रद होते. निवडणुकीत निकाल काहीही लागला तरी आपण अकोलकर यांना वाकून नमस्कार करीत असू, ही आठवण सुरतवाला यांनी सांगितली होती. सुरतवाला यांनी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या अनुभवांचा समावेश असलेले पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये पंचेचाळीस वर्षांपूर्वी पुणे कसे होते आणि नगरसेवक होण्यापूर्वी चौकात कायकाय उचापती केल्या त्याचे दिलखुलास वर्णन आहे.
शाळकरी मुलांना मुंबईत घेऊन जाणे आणि ताजमहाल हॉटेल दाखवणे, पुण्यात दिवाळीत किल्ले तयार करण्याची स्पर्धा आयोजित करणे अशा विविध कल्पना त्यांनी अंमलात आणल्या. डोक्यावर हेल्मेट घालायला सुरतवाला यांचा विरोध होता. त्यांनी त्यासाठी अभिनव अशी आंदोलने उभारली. नामवंत व्यक्तींना भेटणे आणि गरज असेल त्याला मदत करणे यात सुरतवाला नेहमी पुढे असत.

राजकारण समाजासाठी करायचे, वैयक्तिक स्वार्थासाठी नाही याचा वस्तुपाठ पुण्यातील तीन नेत्यांनी घालून दिला. ते म्हणजे माजी खासदार दिवंगत गिरीश बापट, सुरतवाला आणि त्यांचे समवयस्क एड. अंकुश काकडे. गिरीश, अंकुश, शांतिलाल या तीन नावांमधील पहिले इंग्रजी अक्षर घेऊन GAS असे नामकरण पुण्यात करण्यात आले होते. त्याची मोठी चर्चा होत असे. आज अंकुश काकडे यांना एकाकीपण जाणवत आहे. तेही मोठे अभ्यासू आणि मनमोकळ्या स्वभावाचे आहेत. चौकात कार्यकर्ते दिसले की अंकुशराव थांबणार आणि आवर्जून विचारपूस करणार. यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी, जगजीवनराम, शंकरराव चव्हाण, यासारख्या राजकीय नेत्यांप्रमाणे अमिताभ बच्चन, संजीवकुमार, राजेंद्रकुमार, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या कलाकार मंडळीशी मित्रत्व असलेल्या सुरतवाला यांनी नामवंत अभिनेत्री ललिता पवार यांना त्यांच्या अखेरच्या काळात मोठा आधार दिला होता. शिवशाहीर डॉ. बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी सुरतवाला यांचा मोठा स्नेह. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यात दिवाळी पहाट आयोजित करण्यात सुरतवाला अग्रेसर असत. तिथे अनेक वर्षे डॉ. बाबासाहेब पुरंदरे पहाटेच्या समयी येत असत.

अनेक अभिनव कल्पना मांडणारे सुरतवाला यांच्या मनात एका कल्पनेची रुखरुख कायम राहिली. त्यांनी ती बोलून दाखवली आणि पुस्तकातदेखील उल्लेख केला आहे. ही अभिनव कल्पना अशी होती की, पुण्यात कात्रज येथे ऐतिहासिक तलाव किंवा छोटे धरण आहे. या धरणातील पाण्याचा योग्य असा उपयोग करण्यासाठी पुण्यातील काही प्रमुख रस्ते अग्निशमन दलाच्या टँकरने पाणी आणून धुण्याची कल्पना सुरतवाला यांनी मांडली होती. रोज वेगवेगळ्या भागात हा उपक्रम करावा असे ते म्हणत. याचे कारण म्हणजे अग्निशमन दलाचे टँकर किंवा बंब काम नसेल तेव्हा सुरु ठेवावे लागत, कारण वर्दी आली आणि टँकर सुरु झाला नाही तर काय, आणि कर्मचारी नुसते बसून राहणार. शिवाय धरणातील पाण्याचा वापर न झाल्याने ते साठून खराब होते. कल्पना अभिनव होती. पण त्या काळात वर्तमानपत्रांत वाचकांनी पत्रांचा पाऊस पाडला आणि योजना बारगळली. आतादेखील या योजनेचा विचार करायला हरकत नाही. सुरतवाला यांना ती श्रद्धांजली ठरु शकेल. शांतिलाल सुरतवाला यांचे अत्यंत महत्त्वाचे योगदान म्हणजे आचार्य आनंदऋषीजी महाराज ब्लड बँक. त्यांच्या महापौरपदाची मुदत २० मार्च १९९३ला संपली. त्यादिवशी नवी पेठेत या रक्तपेढीचे उदघाटन झाले. आजतागायत ती व्यवस्थित सुरु आहे. आपली कन्या हिना हिला चांगले प्रशिक्षण देऊन सुरतवाला यांनी तयार केले. आता कन्या रक्तपेढी सांभाळत आहे.

सन २०१० मध्ये सुरतवाला यांनी अंटार्क्टिकाची सफर करुन तिथल्या अनुभवांवर पुस्तक लिहिले आहे. आयुष्य छान जगण्याची आवड असलेले शांतिलाल अत्यंत व्यवहारी होते. आपल्यानंतर कोणाला कोणताही त्रास होणार नाही याचा चोख बंदोबस्त केल्याचे त्यांनी मला सांगितले होते. माझी फक्त निखळ मैत्री होती. ते पारदर्शक असल्यामुळे त्यांच्या अंतरंगात मी अलगद प्रवेश करीत असे. वयाच्या साठीनंतर त्यांनी वाईजवळ कोरडी ठणठणीत जमीन घेऊन तिथे छान फार्महाऊस उभारले. नारळाची शेकडो झाडे लावली आहेत. अनेक शेतकरी मंडळींना तिथे रोजगार मिळाला आहे आणि पुढच्या पिढीसाठी संपन्नता. राजकीय प्रवाहातून बाजूला झाल्यानंतर दुर्लक्षित होणे अपरिहार्य असते. सुरतवाला दुर्लक्षित झाले नाहीत. त्यांचा मित्रपरिवार आणि त्यांनी जोडलेली माणसे अगणित आहेत. सर्वांना आयुष्यातील बरेच काही हरवले आहे असेच वाटत आहे.

(लेखक मनोहर सप्रे ज्येष्ठ पत्रकार आहेत. संपर्क- 99604 88738)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

महाराष्ट्रात उपलब्ध आहे विरोधी पक्षाची ‘स्पेस’!

महाराष्ट्रात नजीकच्या काळात निवडणूक नाही. बारामतीत विधानसभा पोटनिवडणूक होईल तेवढीच. आता चार राज्ये आणि केंद्रशासित पुद्दूचेरी येथे निवडणूक होईल. आसाममध्ये भाजपला निवडणूक सहजसोपी आहे असे नाही. प.बंगाल, तामिळनाडू, केरळ इथेदेखील भाजपसाठी संघर्ष आहेच. तिथे काय निकाल येतात यावर महाराष्ट्रात...

गावातल्या मातीतला ओलावा आजही कायम!

शेती परवडत नाही, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा.. वगैरे चर्चा शहरी लोक ऐकत असतात. ऐकून सोडून देतात. गावात बांधावर प्रत्यक्ष जाऊन बघण्याची उत्सुकता असली तरी योग येईल असे नाही. मुद्दाम आणावा लागतो. प्रत्यक्ष शेतात गेल्यानंतर निरीक्षण करता येते आणि विचारांना...

मातीच्या कुस्तीतले नवे खतरनाक डाव ठरतील घातक!

कुस्तीचा कोणताही प्रकार 'प्रेक्षक' या भूमिकेत आपण असतो तेव्हा प्रेक्षणीय असतो. शालेय जीवनात संघशाखेत जात असताना रविवारी वगैरे कुस्तीच्या तालमीत जाण्याचा योग येत असे. पण माझी अंगकाठी आणि खुराकाच्या मर्यादा यामुळे कधी कुस्ती या खेळात जाण्याचा योग नव्हता. पण...
Skip to content