विश्वातील कार रेसिंगच्या प्रतिष्ठेच्या फॉम्युला-वन शर्यतीत चालकांचे जग्गजेतेपद ब्रिटनच्या अवघ्या २६ वर्षीय मॅकलारेन संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लँडो नॉरिसने पटकावून “वेगाचा नवा बादशहा” अशी बिदुरावलीदेखील मिळवली आहे. या शर्यतीच्या गेल्या ७५ वर्षांच्या इतिहासात चालकाचे अजिंक्यपद मिळवणारा तो ३५वा चालक ठरला आहे. ब्रिटनसाठी अशी कामगिरी करणारा तो ११वा चालक ठरला. ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा हे जग्गजेतेपद लँडोने ब्रिटनमध्ये आणले. २०२० साली त्यांचाच नामवंत चालक लुईस हॅमिल्टनने शेवटचे विश्वविजेतेपद जिंकले होते. शेवटच्या अबुधाबी शर्यतीत लँडोने तिसरा क्रमांक मिळवून आपल्या जग्गजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. गतवर्षी याच विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत लँडो दुसऱ्या स्थानावर होता. यंदा मात्र त्याने जग्गजेतेपद निसटू दिले नाही. हे जेतेपद चार वेळा जिंकणाऱ्या रेड बुलच्या मॅक्स वेस्टापेनला त्याने दुसऱ्या क्रमांकावर टाकून गतवर्षीचा बदला घेतला. या शर्यतीच्या समाप्तीनंतर यंदाचा विश्वविजेता चालक ठरणार होता.
या शर्यतीचा मोसम अटीतटीच्या आणि चुरशीचा झाला. जेतेपदासाठी मॅक्स, लँडो आणि त्याचाच मॅकलारेन संघातील सहकारी ऑस्कर पियात्री या तिघांमध्ये जोरदार चुरस होती. अवघ्या दोन गुणांच्या फरकाने लँडोने बाजी मारली. लँडोचे ४२३ गुण झाले. दुसरा क्रमांक मिळवणारा गतविजेता मॅक्सचे ४२१ गुण होते. तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या ऑस्कर पियात्रीचे ४२० गुण झाले. यंदाच्या मोसमात लँडोने पाच शर्यती जिंकून भरपुर गुंणांची कमाई करुन आपली जग्गजेतेपदाकडे जोरात वाटचाल सुरु केली होती. त्यात आपल्या घरच्या ब्रिटीश शर्यतीचादेखील समावेश होता. अखेर शेवटच्या अबुधाबी शर्यतीत कुठलीही घाई न करता शांतपणे गाडी चालवून आपल्याला हवा असलेला तिसरा क्रमांक मिळवून त्याने विश्वविजेतेपदावर विजयाची सहज मोहोर उमटवली. या जेतेपदाबरोबरच लँडोने आपल्या मॅकलारेन संघाला सांघिक विजेतेपददेखील मिळवून देत आपल्या संघासाठी डबल धमाका उडवून दिला. मॅकलारेनने एकूण ८३३ गुणांची भरघोस कमाई करुन अव्वल क्रमांक पटकावला. मर्सिडिज दुसरा तर रेड बुलचा तिसरा क्रमांक लागला. २००८नंतर मॅकलारेन संघाला हे विजेतेपद मिळवण्यात यश आले. त्यामुळे एकंदर त्यांच्यासाठी हा “डबल धमाका” होता.

हे विश्वविजेतेपद मिळवणारा लँडो मॉकलारेन संघाचा केवळ आठवा चालक ठरला. याअगोदर त्यांच्या फिट्टीपाल्डी, हंट, लॉडा, प्रोस्ट, सेना, हाकिनेन आणि किमी रायकेनन यांनी या शर्यतीचे जग्गजेतेपद मिळवले होते. तब्बल सात वेळा या शर्यतीचे जेतेपद मिळवणाऱ्या ब्रिटनच्या लुईस हॅमिल्टनची कामगिरी खराब झाली. तो चालकांच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरला. त्याची ही या शर्यतीमधील आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी होती. सध्या लँडो फॉर्म्युला-वनच्या विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. त्याचे आताच कोट्यवधी चाहते आहेत. देखणे व्यक्तिमत्व आणि ट्रकवरील त्याचे कार चालवण्याचे कौशल्य यामुळेच तो कोट्यवधी क्रीडाचाहत्यांचा हिरो बनला आहे. गोल्फ खेळाचा शौकिन असणाऱ्या लँडोला आपल्या चाहत्यांमध्ये मिसळायला आवडते. त्याची गाडी चालवण्याची शैली वेगवान, आक्रमक, सातत्यपूर्ण आहे. त्याची विनोदबुद्धी नेहमी जागरुक असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेला लँडो नेहमीच आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो.
इंग्लंडमधील ब्रिस्टॉल शहरात त्याचा जन्म झाला. वडिल मोठे उद्योगपती. त्यांना खेळाची आवड. त्यामुळे लँडोला सुरूवातीपासूनच प्रोत्साहन मिळाले. लहानपणापासूनच तो मोटर स्पोर्टसच्या प्रेमात पडला. वयाच्या आठव्या वर्षी त्याने गो कार्टिंगचा श्री गणेशा केला. त्यामध्ये त्याने सुरूवातीला चांगले यश मिळवले. मग त्याने मागे वळून बघितलं नाही. त्याची गाडी यशाची एक एक शिखरे पार करत जोरात पळू लागली. तो छोटा असताना घोडेस्वारी, क्वाड बाइकिंग, मोटर सायकली त्याला खूप आवडायच्या. सात वर्षांचा असताना वडिल त्याला राष्ट्रीय गो काटिंग शर्यत पाहण्यास घेऊन गेले. इथेच त्याच्या जीवनाचा सारीपाट बदलून गेला. पुढल्या वर्षी तो या शर्यतीत सहभागी झाला आणि एक उत्तम चालक एफ वन फाॅर्म्युला विश्वाला मिळाला. खडतर सराव करुन तो ज्युनिअर रेसिंगमध्ये दाखलदेखील झाला. मग लँडोने झपाट्याने प्रगती करत आपले ड्रायव्हिंगमधील कसब दाखवण्यास सुरूवात केली. केएफ आणि रोटॅक्स या दोन्ही कार्टिंग विभागात तो सहभागी होत असे. त्या अनुभवाचा मोठा फायदा नॉरिसला पुढे झाला.

२०१४मध्ये तो डायरेक्ट डाईव्ह कार्टिंगचा जग्गजेता झाला. २०१५ एम. एस. ए. फॉर्म्युला चॅम्पियनशिपमध्ये तो पहिला आला. २०१६मध्ये त्याने शानदार कामगिरी करताना टोयाटो रेसिंग सिरीज, फॉर्म्युला म्युर्ला रेनॉल्ट युरो कप, एन ई सी सिरीजमध्ये पहिला क्रमांक पटकावला. त्या वर्षीचा “सर्वोत्तम युवा चालक” हा किताब लँडोने मिळवला. २०१७च्या मोसमात त्याने युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली. २०१८च्या एफ आय ए फॉम्युर्ला टू चॅम्यनशिपमध्ये तो उपविजेता होता. २०१७मध्ये तो मॅकलारेन संघात दाखल झाला. २०१९मध्ये त्याची कार्लोस सेंजचा सहकारी चालक म्हणून निवड झाली. त्याचवर्ष लँडोने ऑस्ट्रेलियन फॉम्युर्ला एफ वन शर्यतीत पर्दापण केले. पुढील वर्षी ऑस्ट्रिया शर्यतीत त्याने पहिल्यांदा अव्वल तीन चालकात स्थान मिळवले. तसेच त्यावर्षी त्याने सर्वात वेगवान लॅपचा चालक हा किताब मिळवला. २०२३च्या मोसमात लँडोने सात शर्यतीत अव्वल तीन चालकांमध्ये स्थान मिळवले. २०२४च्या मियामी शर्यतीत त्याने आपल्या कारकिर्दीतल पहिली शर्यत जिंकली. त्यानंतर आणखी दोन शर्यतीत तो पहिला आला. त्याचवर्षी लँडोचे पहिले विश्वविजेतेपद थोडक्यात हुकले. तो उपविजेता होता. यंदा मात्र त्याने जग्गजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भविष्यात लँडो यशाची किती नवनवी शिखरे पार करतो याची उत्सुकता त्याच्या कोट्यवधी चाहत्यांमध्ये नक्की असेल.
(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

