Homeब्लॅक अँड व्हाईटएमआयएमने दिला काँग्रेस-राष्ट्रवादी...

एमआयएमने दिला काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच सपा-उबाठाला इशारा

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये एआयएमआयएम पक्षाचे १२६ नगरसेवक निवडून आल्याने सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. मुस्लिम व्होट बँकेच्या जोरावर या पक्षाने मिळालेल्या यशामुळे काँग्रेस, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांना मुस्लिम मतदारांनी इशारा घंटा दिली आहे. धर्मनिरपेक्ष पक्ष असा बँड वाजवत हे पक्ष मुस्लिम मतदारांना वर्षानुवर्षे आकर्षित करीत असतात पण नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, हीच भावना मुस्लिम समाजात बळावली आहे. मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणावर एमआयएमला मतदान केले, हे निकालानंतरच उघड झाले.

एमआयएम

महाराष्ट्रात चार-पाच मोठे राजकीय पक्ष आघाडी किंवा युती करून एकमेकांच्या विरोधात लढत असतात. प्रकाश आंबेडकर किंवा रामदास आठवले यांच्या पक्षाला युती किंवा आघाडीला बरोबर घ्यावे लागते. पण एमआयएमला बरोबर घेऊन लढावे अशी कोणाची हिम्मत झाली नव्हती. यावेळी अकोला जिल्हयातील अकोटमध्ये स्थानिक पातळीवर भाजपाने एमआयएमशी समझोता केला तेव्हा मोठा गहजब माजला. एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे, असा टीकेचा भडिमार विरोधी पक्षांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एमआयएमशी भाजपाने केलेला समझोता कदापि मान्य होणार नाही, असे जाहीर करावे लागले. महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष असताना मुस्लिम मतदारांना दुसऱ्या राज्यातील एमआयएम हा पक्ष जवळचा का वाटावा? महाराष्ट्रातील मुस्लिमांचा राज्यातील राजकीय पक्षांवर विश्वास राहिला नाही का? गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आणि यंदाच्या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्या उबाठा सेनेला मतदान केले. ते काही ठाकरेंविषयी प्रेम म्हणून नव्हे. तर ठाकरे भाजपाच्या विरोधात कणखरपणे लढत आहेत म्हणून मुस्लिम मतदारांनी मशालीवर बटण दाबले. आता एमआयएम हा पक्ष त्यांना जवळचा वाटू लागल्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नुकसान होणार आहे.

एमआयएम

ओवेसी यांनी सुरूवातीला महाराष्ट्रात मराठवाड्यात लक्ष केंद्रीत केले. छत्रपती संभाजीनगर व नांदेड वाघा‌‌ळा महापालिकेत एमआयएमने प्रथम शिरकाव केला. यंदाच्या निवडणुकीत छत्रपती संभजीनगर महापालिकेत ३३ तर नांदेड वाघाळा महापालिकेत १४ नगरसेवक एमआयएमचे निवडून आले आहेत. छ. संभाजीनगरमध्ये शिवसेना व उबाठा सेनेपेक्षा जास्त नगरसेवक एमआयएमचे निवडून आले आहेत. मुंबईमध्ये ८, नागपूरमध्ये ६ तर ठाण्यात ५ नगरसेवक निवडून आणण्याची किमया एमआयएमने केली आहे. मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. मालेगावमधे २१, धुळ्यात १०, अमरावतीत १२, सोलापूर महापालिकेत ८ नगरसेवक एमआयएमचे निवडून आले आहेत. मुस्लिम मतदार कसा एकवटलेला आहे हे त्याचे चित्र आहे. एका रात्रीत किंवा मशिदीतून ऐनवेळी फतवा निघाला म्हणून एमआयएमला मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान झालेले नाही. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीची तयारी एमआयएमकडून अगोदरपासून चालू होती. निवडणुकीचे सूक्ष्म व्यवस्थापन करणाऱ्या भाजपालाही त्याची कुणकूण लागली नाही. सन १९९९मध्ये एमआयएमने महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवली होती. २०१२ साली नांदेड महापालिकेत एमआयएमचे ११ नगरसेवक निवडून आले. २०१७ मध्ये मात्र या पक्षाला खातेही उघडता आले नव्हते. २०१४ मध्ये मोदी लाटेत एमआयएमचे दोन आमदार महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. २०१५मध्ये औरंगाबाद महापालिकेवर या पक्षाचे २५ नगरसेवक निवडून आले. २०१२मध्ये महारा्ष्ट्रात नोंदणीकृत पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे एमआयएमची नोंद झाली. २०१९मध्ये इम्तियाज जलिल औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे खासदार म्हणून निवडून आले.

एमआयएम

वर्षानुवर्षे मुस्लिम मतदार काँग्रेसला मतदान करीत होता. मुंबईतील मुस्लिमांची वस्ती मोठ्या संख्येने असलेल्या प्रभागातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून मुस्लिम नगरसेवक महापालिकेत निवडून येत असत. नवाब मलिक आणि अबू आजमी यासारखे नेते मुस्लिम मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करीत असत. मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष आहेत तर आजमी मुंबईतील सपाचे अध्यक्ष आहेत. यंदाच्या निवडणुकीत मुंबई व महाराष्ट्रातील मुस्लिम मतदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा सपा यांच्याऐवजी एमआयएम हा पर्याय स्वीकारला असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. छपन्न वर्षाचे अससुद्दीन ओवेसी आक्रमक नेते आहे. मुस्लिमांचे प्रश्न ते जाहिरपणे व संसदेत प्रभावीपणे मांडत असतात. ते उत्तम वक्ते आहेत. भाषणात ते संविधान व भारतीय कायद्याचे कलम सांगून पुरावे देत असतात. तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष मोदींना देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून रोखू  शकले नाहीत किंवा महाराष्ट्रात महायुतीला सत्तेवर येण्यापासून कोणी अडवू शकले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. यापुढे राजकीय पक्षांना मुस्लिम मतदारांना गृहित धरता येणार नाही, असे त्यांनी बजावले आहे. महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणुका लढविण्याचा त्यांच्या पक्षाचा विचार आहे तसेच पश्चिम बंगाल, तामिळनाडू. आसाम येथेही येणाऱ्या विधानसभा निवडणुका एमआयएम लढविणार आहे.

एमआयएम

गेल्या काही वर्षांपासून जसे हिंदुत्वाच्या नावावर मतांचे ध्रुवीकरण होत आहे तसेच मुस्लिम, ख्रिश्चन, आदी धर्मियांच्या नावावरही मतांचे एकत्रिकरण होत आहे. भाजपाने महापालिका निवडणुकीत एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नव्हती. मुस्लिमांचा भाजपाला विरोध आहेच पण धर्मनिरपेक्ष म्हणविणारे पक्षही मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व देत नाहीत हा या समाजाचा रोष आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी होती, म्हणून मुस्लिमांनी आघाडीला मतदान केले. महापालिका निवडणुकीत आघाडी नव्हती म्हणून पर्याय म्हणून एमआयएमला पसंती दिली. मुस्लिम समाजावर कट्टरतावादी नेत्यांचा प्रभाव जा्स्त आहे, पुढील पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीत मुंब्रा संपूर्ण हिरवा करण्याचे आवाहन एमआयएमची नवनिर्वाचित तरूण नगरसेविकेने करताच, समाजात जल्लोश झाला. यावरून देशभर लोकशाहीला धोका म्हणून आक्रोश प्रकटला. ध्रुवीकरणाला वेग आला तर त्याचा लाभ भाजपालाच होतो हे निवडणूक निकालाने सिद्ध केले आहे.

एमआयएम

एआयएमआयएम म्हणून देशात ओ‌‌‌ळखल्या जाणाऱ्या या पक्षाचे नाव ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन असे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातच या पक्षाची स्थापना हैदराबाद संस्थानमध्ये झाली. इदेहत्त म्हणजे ऐक्य. समाजात ऐक्य भावना जोपासण्यासाठी व टिकविण्यासाठी एआयएमआयएम स्थापना झाली. सुरूवातीच्या काळात नवाब बहादूरयार जंग यांनी या संघटनेचा कारभार पाहिला. एआयएमआयएमची उभारणी व इतिहास संघर्षाचा आहे. बहादूरयार जंग यांच्यानंतर कासीम रझवी संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी रझा नावाची संघटना स्थापन केली. पोलीस कारवाईनंतर रझाकारांवर खटले दाखल झाले. कासीम रझवी यांनाही शिक्षा झाली. सुरूवातीला चंचलगुडा जेलमध्ये व नंतर पुण्याच्या येरवडा जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले. १९५७मध्ये त्यांची सुटका झाल्यावर ते कराचीला निघून गेले व तिथेच त्यांचा १९७०मध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अब्दुल वाहिद ओवेसी यांनी इत्तेहादुल मुसलमीनचे पुनरूज्जीवन केले व नंतर त्यांच पुत्र सुलतान सलाउद्दीन ओवेसी एमआयएमचे अध्यक्ष झाले. सलाउद्दीन ओवेसी हैदराबाद पालिकेचे सदस्य होते. नंतर ते वेगवेगळ्या मतदारसंघातून आंध्र प्रदेशच्या विधानसभेत चार वेळा निवडून गेले. १९६२ साली ते प्रथम आमदार झाले. नंतर ते खासदार म्हणून निवडून गेले. सलाउद्दीन ओवेसी यांचे पुत्र अससुद्दीन ओवेसी १९९४ ते २००४ या काळात आंध्र प्रदेश विधानसभेत आमदार होते. नंतर ते हैदराबादमधून लोकसभेवर खासदार आहेत. अससुद्दीन यांचे भाऊ अकबरूद्दीन आंध्र प्रदेश विधानसभेत आमदार आहेत. एआयएमआयएमने केवळ हैदराबादचा स्थानिक पक्ष ही ओळख पुसून आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक अशी अनेक राज्यांत मजल मारली आहे.

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार तसेच राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आतातरी बोध घेतील का ठाकरे बंधू?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपाने जिंकल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला दूर ठेऊन मुंबईवर कब्जा करण्याचे भाजपाचे स्वप्न यावेळी पूर्ण झाले. पंचाहत्तर हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर आता पुढील पाच वर्षे भाजपाचे वर्चस्व असणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईकर ठाकरेंच्या सेनेला घरी...
Skip to content