गेल्या काही वर्षांत देशात सर्वत्र ‘मेक इन इंडिया’ची धूम आहे. याद्वारे परदेशी आयातीवर अवलंबित्व कमी करून देशांतर्गत संबंधित उत्पादनाला चालना देण्याचे धोरण केंद्र सरकारने अवलंबले आहे. त्याचा मोठा फायदा म्हणजे आयातीमुळे अन्य देशांना जाणारा रुपयातील मोठा हिस्सा घरातच वापरता येणे नि स्थानिक उत्पादक घटकाला निर्मिती प्रोत्साहन देत रोजगार निर्मिती करण्यात आहे.
विशेषतः संरक्षण दलासाठी मोठ्या प्रमाणावर बाह्य देशांवर आपण विसंबून आहोत. काही वेळा त्याचा फटका बसून सुटे भाग मिळण्यास अडचणी येतात. परिणामी येथील साहित्याची निर्मिती, दुरुस्ती प्रक्रिया मंदावते, थांबते. देशात अनेक संरक्षणविषयक बाबी उत्पादित करण्यासाठी खासगी-सरकारी उत्पादनक्षमतेत वाढ करण्यावर जोर दिला जात आहे. काही संरक्षण घटकांची आपण आता निर्यातही करत आहोत, हे विशेष!
संरक्षण क्षेत्राचा विचार करता नौदलाच्या विमानवाहू नौकांच्या आयातीत आपण आत्मनिर्भर नव्हतो. काही वर्षांपूर्वी बरीच चर्चा होऊन अखेर भंगारात काढलेली दैदिप्यमान इतिहासाची आय एन एस विक्रांत असेल किंवा आय एन एस विराट, यांचे आपण गौरवशाली स्मारकात रूपांतर करू शकलो नाही. त्या दोन्ही परदेशी बनावटीच्या होत्या. सध्या कार्यरत असलेली आय एन एस विक्रमादित्य हीदेखील रशियन बनावटीची पूर्वाश्रमीची गोर्शकव्ह.. तिलाही अव्वाच्या सव्वा रक्कम देऊन घ्यावी लागली. त्याचा परिणाम विक्रांत नि विराटच्या निवृत्ती काळावर झाला. कारण त्या कालखंडात आपल्या समुद्री सीमांच्या रक्षणासाठी एक तरी विमानवाहू नौका अत्यावश्यक आहे.
खरं पाहता आपल्याला संभाव्य धोका पाहून पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या तिन्ही बाजूला एक एक अशा नौकेची गरज आहे. त्यामुळे स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू नौकेची गरज आपल्या दृष्टीने मोठी होती. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत आपण अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी करत शेजारील राष्ट्रांपेक्षा वेगळे आहोत हे जगाला दाखवून देण्यात यशस्वी झालोत. परिणामी, समुद्री रक्षणात एक जबाबदार राष्ट्र म्हणून आपल्या नौदलाची ओळख निर्माण झाली आहे.
मागील विक्रांतच्या नावे ही नवी नौका तयार होत असता अनेकांना प्रश्न पडेल की, जुनेच नाव का? तर याचे उत्तर आहे भारतीय नौदलात अनेक जुन्या पाणबुडी नौकांनी पराक्रम गाजवला आहे. त्यांची आठवण नि पराक्रम समोर राहवा, जवान-अधिकारी वर्गाला त्यातून स्फूर्ती मिळावी हा त्यामागे उद्देश असल्याचे सांगितलं जातं. नौदल स्मारकात रूपांतर होऊ न शकलेली ‘विक्रांत’ या रूपाने सर्वांसमोर राहिल.
भारत पाकिस्तानच्या 1971च्या युद्धात आय एन एस विक्रांतच्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानचे कंबरडे आपण मोडून काढण्यात यशस्वी झाल्याने दाती तृण धरून शरण येण्याशिवाय पाकिस्तानला पर्याय राहिला नव्हता! दक्षिणेकडील कोची शिपयार्ड हिची निर्मिती करत असून काही अपवाद वगळता बहुतांश भाग स्वदेशी बनावटीचे आहेत. गेल्याच महिन्यात संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी कोचीला भेट देऊन हिच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेतला होता. त्याचवेळी विक्रांत ऑगस्टपर्यंत पूर्णत्वाला जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार तिच्या बेसिन चाचण्या (कोचीन शिपयार्डमध्ये) घेतल्या गेल्या. आता लवकरच खोल समुद्रात तिला उतरवून पुढील चाचण्या होतील.
तिच्या सागरी चाचण्या पूर्ण झाल्यावर नौदलकडून अनेक तपासण्या, चाचण्या पूर्ण केल्यावर ती अंतिमतः नौदल ताफ्यात समाविष्ट केली जाईल. तोपर्यंत पुढील वर्षाचा मध्य म्हणजे ऑगस्ट महिना उजाडेल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. हिंद महासागरातील खोल समुद्रात चाचणीसाठी नेण्यास कोचीन शिपयार्ड आणि नौदल तयारीला लागले असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

अशी आहे विक्रांत!
या विक्रांतला विक्रमादित्यच्या जवळपास असेल असे बनवण्यात आले आहे. दीड हजार नौसैनिक आणि दोनशे अधिकारी यांच्या तैनातीबरोबरच मिग 29सारखी 26 अत्याधुनिक विमाने राहू शकतात. शिवाय, दहा हेलिकॉप्टर अथवा लहान विमाने अतिरिक्त सामावून घेता येतील. याचा पृष्ठभाग (डेक) 1.5 एकराचा असून धावपट्टीदेखील मोठी आहे. कामोव्ह 31, मल्टी रोल एम एच 60, हवाई हल्ल्याची सूचना देणारी, पाणबुडी जवळपास असल्याची सूचना देणारी सोनार यंत्रणा आदींसह अन्य शस्त्रसज्जता असेल ती वेगळीच.
या विक्रांतला पूर्वेकडे चीनच्या अरेरावीला आळा घालण्यासाठी तैनात केले जाण्याची शक्यता आहे. विक्रमादित्य पश्चिम किनाऱ्यावर तैनात राहिल. या दोन्ही बाजूंनी देशाला असलेला धोका लक्षात घेऊन पर्याय म्हणून तिसऱ्या विमानवाहू नौकेची मागणी नौदलाने सरकारकडे केली आहे. त्याचप्रमाणे एखादं जहाज दुरुस्तीसाठी गोदीत (डॉकमध्ये) गेल्यास त्यासाठी बराच वेळ लागतो, हेही ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. विक्रमादित्य गेल्या काही काळात अनेकदा दुरुस्तीसाठी कारवार तळावर आणल्याने देशाच्या सागरी सीमेवर विमानवाहू नौकेची गरज प्रकर्षाने जाणवत होती.
सध्या चीनची अरेरावी वाढली असल्याने अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया जपान आदी राष्ट्रे भारतीय नौदलाकडे भक्कम पाठबळ म्हणून पाहतात. चीनवर यामुळे दबाव राहून कुरापती कमी होतील. गेल्या काही काळात चीनचे आरमार सातत्याने भारतीय हद्दीजवळ घुसखोरी करण्यासाठी आतुर असलेले पाहण्यास मिळाले आहे. मात्र, भारतीय नौदल चुस्त असल्याने त्याचे हे प्रयत्न हाणून पाडण्यात तटरक्षक दल नि नौदल यशस्वी ठरले आहे.
गेल्या जून महिन्याच्या अखेरीस नौदलाच्या कारवार बेसला भेट देऊन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रोजेक्ट सीबर्डचा आढावा घेतला. त्याचवेळेस त्यांनी भारतीय बनावटीची विमानवाहू नौका स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात नौदल ताफ्यात असेल असे भाष्य केले होते. यामुळे सागरी सीमांच्या बळकटीकरणासाठी मोठी मदत मिळेल. त्यानंतर त्यांनी कोचीन इथे जाऊन विक्रांतच्या निर्मितीची माहिती घेतली. सध्या नौदलाच्या 44 युद्धनौकांपैकी 42ची बांधणी विविध गोदीत नौदलाच्या गरजेनुसार केली जात आहे. यातही 75 टक्के स्वदेशी बनावटीचे भाग असतील. भारतीय समुद्री हद्दीत नि त्यापुढे नौदल जी कामगिरी करत आहे त्याची वाखाणणी जगभरात होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
अत्याधुनिकीकरण करताना स्वदेशीला चालना देतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या हिंद महासागरातील व्यापारउदिमास शांती नि स्थैर्य मिळण्याच्या दृष्टीने या ‘विक्रांत’कडे पाहिले जाते. एकूणच इंडो पॅसिफिक क्षेत्रात नौदलाचे सामर्थ्य या दुसऱ्या विमानवाहू नौकेच्या दाखल होण्याने वाढेल हे निश्चित!

