केंद्रीय मोटार नियमानुसार सर्व वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्यांकडून ०१ एप्रिल २०१९नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबरप्लेट बसविण्यात येत आहे. मात्र ०१ एप्रिल २०१९पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबरप्लेट लावणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार या नंबरप्लेट बसवणे बंधनकारक आहे.
देशातल्या बहुतांशी राज्यात जुन्या वाहनांना अशाप्रकारची नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्यातील ०१ एप्रिल २०१९पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ‘एचएसआरपी’ लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार उच्चाधिकार समितीने ३ कंपन्यांचे दर अंतिम केले असून मान्य झालेल्या दरानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने कार्यारंभ आदेश जारी केले आहेत.
राज्यात ठरवून दिलेले दर हे ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट व फिटमेंट चार्जेससह आहेत. तसेच काही राज्यातील दर फिटमेंट चार्जेसशिवाय आहेत. या दरांची माहिती एसआयएएम (SIAM)च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे सह परिवहन आयुक्त यांनी कळविले आहे.