भारतीय जनता पक्षाकडे भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा आहे. दिल्लीतले दोन नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचा पराभव करून मोदी-शाहांचे हे एटीएम बंद करू आणि महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच वापरू, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात केला.
लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याला महत्त्वाचे स्थान आहे. सत्तापक्ष व विरोधी पक्ष ही लोकशाहीची दोन चाके आहेत. पण स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना योग्य स्थान दिले नाही. हा लोकशाहीचा खून आहे. भाजपामध्ये सत्तेची घमेंड अजून कायम आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ही अहंकारी प्रवृत्ती सत्तेतून बाहेर काढली पाहिजे, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या १० वर्षांच्या मनमानीला जनतेने उत्तर दिलेले आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत वाढला आहे. महाराष्ट्राने संसदेत वाघिणी पाठवल्या आहेत. या महिल्या खासदार भाजपा सरकारला धारेवर धरत आहेत. लोकसभेतील राहुल गांधी यांच्या पहिल्याच भाषणाने ५६ इंचाच्या छातीला धडकी भरली. लोकसभा निवडणुकीत बहुमत जाताच मोदी यांना धर्मनिरिपेक्षतेची आठवण झाली आहे. राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना आहे. ‘पन्नास खोके, एकदम ओके’ हे जनता अजून विसरलेली नाही.
प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यावेळी म्हणाले की, महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. दर वाढवून टेंडर द्यायचे व त्यातून टक्केवारी घेऊन लूट सुरु आहे. मुंबईत आता कुकर घोटाळा सुरु झाला आहे. ६०० रुपयांचे कुकर अडीच हजार रुपयांना विकत घेऊन प्रत्येक वॉर्डात ४० ते ५० हजार कुकर वाटले जात आहेत. भाजपाने वफ्क बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा पुढे आणला आहे परंतु हिंदू धर्माच्या देवस्थानची जमीन असो वा मुस्लीम धर्माच्या देवस्थानच्या जमिनींना हात लावाल तर ते सहन केले जाणार नाही.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेची सध्या चर्चा सुरु आहे. पण महिलांसाठी महालक्ष्मी योजना सर्वात आधी कर्नाटक व तेलंगणात काँग्रेस सरकारने आणली आहे. महायुती सरकार बहिणींना नाही तर मतांसाठी पैसे देत आहे. हे पैसे परत घेण्याची धमकीही देत आहेत. लाडकी बहीण तर आता आली. लाडका मित्र योजना तर अडीच वर्षांपासून सुरु आहे. मुंबईतील सर्व महत्त्वाच्या जागा या लाडक्या मित्राला दिल्या जात आहेत.