मराठा रक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. या बैठकीला विरोधी पक्षाच्यावतीने आम्ही हजर राहू. सर्वपक्षीय बैठकीला मनोज जरांगे यांनाही निमंत्रित करावं. याशिवाय, ओबीसींच नेतृत्त्व करणारे छगन भुजबळ यांनाही निमंत्रित करावं. त्या संयुक्त बैठकीत चर्चा करून आरक्षणाचा तिढा कसा सोडवता येईल ते पाहावं, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
मराठा ठोक मोर्चाच्या एका शिष्टमंडळाने शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातल्या मोदी बाग येथील निवासस्थानी भेट घेतली. मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण देण्याच्या विषयी त्यांची भूमिका जाणून घेण्याकरीता या शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर पवार थेट माध्यमांशीच बोलले. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्राने हे धोरण बदललं पाहिजे. केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. केंद्र सरकारने धोरण बदलण्याची भूमिका घेतली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे ते म्हणाले.
आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. दोन समाजामध्ये कटूता निर्माण होणार नाही, यादृष्टीने पावलं टाकली पाहिजे. आज वेळीच काळजी घेतली नाही तर काय राहील, हे सांगता येणार नाही. मी पर्याय सुचवला की, माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा झाली. आता तुमच्यामार्फत असं सुचवू इच्छितो की, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांनी योग्य वाटतील त्या लोकांना बोलवावे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून बैठकीला हजर राहू, आमची भूमिका सहकार्याची राहील, असे पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे मणिपूर होण्याची भीती व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्यावर महाराष्ट्राचा मणिपूर करण्याकरीता हातभार लावत असल्याचा आरोप केला. त्यांनी आपले नाव का घेतले हे माहित नाही. आपण बोलायचेही नाही का, असा सवाल पवार यांनी केला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागेही आपण असल्याच्या राज ठाकरेंच्या आरोपाबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.