दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या आशिया पॅसिफिक आफ्रिकन क्लासिक आणि इक्विप पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडची पॉवरलिफ्टर अमृता भगत ठरली “बेस्ट लिफ्टर”. अमृता शेलू वांगणीची रहिवासी असून तिने 47 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
या स्पर्धेत अमृता भगत हिने जूनियर इक्विप गटातल्या स्कॉट प्रकारात 122.5 किलो वजन, बेंच प्रेस प्रकारात 67.5 किलो वजन, आणि डेडलिफ्ट प्रकारात 132.5 किलो वजन उचलले. तिने एकूण 322.5 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर “एशियन बेस्ट लिफ्टर” हा किताबसुद्धा प्राप्त केला. अमृता भगतची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती आणि तिने पदकांची परंपरा कायम राखली.
अमृता भगत हिला खोपोलीमधील विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शन असून ती अतिशय खडतर मेहनत घेते. रायगडच्या महिला खेळाडूला पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत किताब मिळाला आहे. याबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी राज्य खेळाडू गिरीश वेदक, माजी राष्ट्रीय खेळाडू माधव पंडित आणि सचिव अरुण पाटकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिचे खास अभिनंदन केले असून येणाऱ्या भावी काळासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच तिचा असोसिएशनतर्फे खास गौरव करण्यात येणार आहे.