“रंगमंचावर
त्याने
विविध भूमिकांचे परिवेशच
अंगावर चढवले नाहीत
त्या त्या भूमिकांची
जीवनेही
आपल्या आत्म्यावर चढवली
आणि हीच ठरली
त्याची शोकांतिका” (कुसुमाग्रज अप्रकाशित)
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या या ओळी आठवण्याचे कारण म्हणजे रविवारी सकाळपासून सुरू झालेली प्रख्यात अभिनेता सलमान खान याच्या बंगल्यावर झालेल्या गोळीबाराची बातमी! अर्थात हा गोळीबार त्या दिवशी तरी अज्ञातांनी केल्याचे जाहीर झाले होते. संध्याकाळपर्यंत कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई याच्या इशाऱ्यावरून केला गेल्याचे त्याचा भाऊ अनमोल याने समाजमाध्यमावरून जाहीर केल्याने मुंबई पोलीस दल आणि सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली.
काही झाले तरी सलमान खान हा हिंदी सिनेमातील एक आघाडीचा अभिनेता आहे हे मान्य केलेच पाहिजे. शिवाय तो चित्रपट संवादलेखक व लेखक सलीम जावेद यांचा सुपुत्रही आहे. खरेतर घरातच इतकी चित्तथरारक तसेच चित्तचक्षू चमत्कारिक नाट्यमय घटना घडत असताना उगाचच मेंदूला ताण कशाला? मारा बैठक आणि लिहून काढा एक-दोन बैठकीत आणि बोलवा दिग्दर्शक भंसाळी यांना व होऊन जाऊदे एखादा आणखी ‘ब्लॉक बस्टर!’… स्वागतच होईल. असो.
आता या बंगल्यावरील गोळीबारासंदर्भात चार जणांना पोलिसांनी शर्थीने ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. आगामी दोनचार दिवसांत आणखी काही जणांना ताब्यात घेतले जाईलही. आकडा दहाच्या जवळपास जाईल. पोलिसांच्या शूरकथा सांगितल्या जातील आणि वाचक त्या ऐकून मानाही डोलावतील. सत्तारूढ पक्ष पोलिसांच्या पाठीवर थाप मारतील. रसभरीत वर्णने वाचायला मिळतील. परंतु पनवेलमधील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलेल्या काळू नामक संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते ते हॉटेल सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसपासून अवघ्या पाच-सहा किलोमीटर्सवर आहे. इतकेच नव्हे तर या काळूने सलमानच्या या फार्म हाऊसमध्ये काम केल्याचेही गुन्हेगारी जगतात बोलले जाते. हा कळूच सलमान आणि बिष्णोई यांच्यातील दुवा असल्याचे सूत्रांनी सूचित केले.
खरेतर बिष्णोई आणि सलमान यांच्यात 1998मध्येच राजस्थानमधील काळवीट शिकरीवरून धुमशान झालेले होते. ते केवळ निमित्त होते सलमानला भिडण्याचे! बरीच झकाझकही झाली होती. काही काळ जाताच, वातावरण शांत झाल्यावर एका मध्यस्थामार्फत बिष्णोईशी संपर्क साधण्यात आला. फोनवर बोलणेही झाल्याचे सूत्रांनी सांगितले. थोडीशी गरमागरमीही झाली. अखेर काही ‘खोक्यां’च्या बदल्यात पांढरे निशाण फडकावले गेले. मुठीत पांढरा रुमाल घेऊन आणाभाका घेतल्या गेल्या आणि नंतर तारीख पे तारीख आपण सर्वांनीच पाहिलेले आहे. त्यानंतर अधूनमधून बिष्णोई टोळीच्या तळहातांला खाज सुटते तेव्हा अलगद निरोप पोहोचवले जातात. लेनदेन होते आणि मामला थंड होतो.
यावेळी मात्र सलमानच्या ‘कार्यबाहुल्या’मुळे संपर्कात खंड पडला! अरे भाई के खाने के वांदे पडे और तुम बिझी बिझी यह कैसा चलेगा. बहोत ना इन्साफी है.. म्हणून थोडी या शूटआऊटची गरज. भाई लोग दिमाख की घंटी बजनी चाहिये ना. बस्स अपनेको तो इतनाही करना था. भाई कोही भूल गया तो काम कैसा चलेगा. अरे कटिंग का भी भाव बढेला है, पेट्रोल भी बढ ही गया है.. स्टाईलवाला गाडीका भाव भी बढेला है. आज चोरीका गाडी नही लेता है, नंबर प्लेट बदलनेसे काम चलता है तो भाडेका कायकू लेनेका? सिधी बात!!

वाचकहो.. बावचळून जाऊ नका. असंच काही बोलणं झालं, पुरावा आहे (सदू काका). खरंतर हिंदी सिनेजगत आणि गुन्हेगारी जगत यांचे संबंध फार जुने आहेत. तुम्हाला आठवत असेलच दुबईत राहून भारतातील गुन्हेगारी क्षेत्रावर वर्चस्व गाजवणाऱ्या कुविख्यात दाऊद इब्राहिम याच्या अनेक आलिशान मेजवान्यांना येथील बडेबडे अभिनेते आणि अभिनेत्र्या जात असत. अशाच एका आलिशान पार्टीमध्ये संगीतकार अन्नू मलिक याने “गरिबोंको जिसने अमिरी सिखायी, सबका भाई दाऊद भाई’ हे स्वरचित गाणे म्हटले होते आणि नाचलाही होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने चौकशीही केली होती. परंतु अन्नूचे स्पष्टीकरण काही अजूनपर्यंत जाहीर झालेले नाही. तसेच यावेळीही चौकशीचा गाजावाजा केला जाईल. हाती काहीच लागणार नाही.
हा शूटआऊट ज्या बांद्रा भागात झाला तो भाग अत्यंत संवेदनाशील आहे. अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती या भागात राहतात. अनेकांना चोवीस तास सुरक्षा आहे. असे असतानाही पहाटेच्या सुमारास बेछूट गोळीबार होतो व हल्लेखोर हसतहसत निघून जातात, याचे कौतुक करायचे की पोलिसांनी हल्लेखोरांना चोवीस तासांत पकडले म्हणून कौतुक करायचे? काही समजत नाही. सलमानलाही पोलिसांची सुरक्षा आहे. ही सुरक्षाव्यवस्था काय झोपा काढत होती त्यावेळी? काहीतरी केमिकल लोच्या नक्की आहे.
अनेकांची सुरक्षा काढाच!
मुंबई पोलीस दलातील सुमारे 10/15 टक्के पोलीस नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा देण्यासाठी वापरले जाते. पोलिसी प्रक्षिक्षण घेऊन काय दरवाजेच उघडण्यासाठी काम करायचे का? याचा विचार मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी करावा. गुन्हेशोध मोहिमेवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. अनेकवेळा पोलीसठाण्यात अंमलदारच नसतात. एक ज्येष्ठ पोलीस अधिकारी म्हणाला की काहीजण केस तयारीच्या कामात असतात, काहीजण फिल्डवर, काहीजण सरकारी वकिलांकडे, नाममात्र गुन्हे शोधात, तक्रारी घेण्यासाठी जेमतेम एक दोन पोलीस कुठे कुठे बघणार? आणि वर अनेक विशेष चौकशी पथके.. पोलिसांनी काम तरी कसे करायचे? डोक्याचा भुगा होतो अगदी…
सलमान खानची स्वतःचीही सुरक्षाव्यवस्था आहे. त्याचा अंगरक्षक शेरा हे काम सांभाळतो. त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. सुरक्षा म्हणजे सलमानभोवती नुसते कडे धरून चालणे नव्हे, हे त्याला कानशील गरम करून सांगायला हवे. “For the powerful, crimes are those the others commit” ही मानसिकता बदलली पाहिजे.
“सत्तालब्ध असे
की कालच गंधाक्षतानी पूजलेले
त्यांचे पोलादी पाय
टायरच्या फाटक्या तुकड्यासारखे
दुमडतात, फडफडतात, फाटतात,
धर्मांधतेच्या गंजलेल्या पिंपात कुजवलेल्या वलग्नासमोर
भ्रष्टाचार तर असा
जो नागडा होऊन बसला आहे
प्रत्येक व्यवहाराच्या देवडीवर” (कुसुमाग्रज)
हे चित्र जोवर बदलत नाही तोवर असे शूटआऊट होतच राहणार..
छायाचित्र- वसंत प्रभू ; छायाचित्र मांडणी- श्रेया साळसकर

