मुंबईच्या मुलुंड (आय.टी.आय.) येथे सुरू झालेला लाइटहाऊस प्रकल्प दीपस्तंभाप्रमाणे काम करेल. कोणत्याही पदवीबरोबरच जागतिक बाजारपेठेत आवश्यक कौशल्य विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे. हा फाऊंडेशन कोर्स आधुनिक काळातील कौशल्य विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी यांनी मुंबईतील पहिल्या लाईटहाऊसचे उद्घाटनप्रसंगी सांगितले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग (SEEID), व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्यामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड येथे हे लाईटहाऊस प्रकल्प उभारण्यात आले आहे. निधी चौधरी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. यावेळी व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, महाराष्ट्र कौशल्य विकास मंडळाचे संचालक योगेश पाटील, लाईटहाऊस कम्युनिटीजचे चेअरमन डॉ. गणेश नटराजन, इक्लर्क्सला सर्व्हिसेस लिमिटेडचे सहसंस्थापक आणि कार्यकारी अधिकारी पी. डी. मुंद्रा, लाईटहाऊस कम्युनिटीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुची माथूर उपस्थित होते.

युवक आणि युवतींना स्पोकन इंग्लिश आणि डिजिटल साक्षरता अशा प्रकारचे प्रशिक्षण लाईटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ही २१व्या शतकातील आवश्यक आणि गरजेची कौशल्ये आहेत. केवळ रोजगार देण्याऐवजी हा कार्यक्रम तरुणांना नोकरीत राहण्यास आणि करिअर घडविण्यास सक्षम करतो, असे निधी चौधरी म्हणाल्या.
दळवी म्हणाले की, गेल्या वर्षी लाईटहाऊस प्रकल्प सुरू करण्याबाबत सामंजस्य करार झाला आणि आज या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली. आय. टी. आय.मध्ये हा प्रकल्प सुरू झाला आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चित जीवनात लागणारी कौशल्य विकसित होतील.
डॉ. नटराजन म्हणाले की, लाईटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून २०३०पर्यंत दहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून लाखों युवक-युवतींचे जीवन बदलण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल.
मुंद्रा म्हणाले की, लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशनने देशात विविध उपक्रम राबवले आहेत. मुंबईत या उपक्रमाच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. शेफाली शिरसेकर आणि वैभव कोल्हे यांनी प्रस्ताविक केले. लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी अमृता बहुलेकर यांनी आभार मानले.

लाईटहाउसच्या माध्यमातून रोजगार क्षमता वाढेल
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्यामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड येथे हा प्रकल्प सुरू झाला आहे. लाईटहाऊस प्रकल्प आय.टी.आय, मुलुंड येथे ३००० चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात आलेला आहे. यामध्ये विविध वर्ग खोल्या तयार करण्यात केल्या आहेत. यामध्ये, खजाना, कट्टा, टेक-हब आणि क्लासरूम असून या प्रकल्पामार्फत युवकांना विविध कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासावर भर देण्यात येतो. मुलुंड लाईटहाऊसमध्ये कमी उत्पन्न समुदायातील १८ ते ३५ वर्षे वयोगटातील युवक आणि युवतींना माहिती, करिअर समुपदेशन, व्यावसायिक कौशल्ये देण्यात येत असून, नोकरी मिळवण्यासाठी आणि नंतरचेही सहकार्य करण्यात येत आहे. याद्वारे त्यांना उपजीविका करता येईल. व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमांची रचना करताना उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा समावेश केला जाईल. त्यामुळे तरुणांची रोजगारक्षमता वाढेल. लाईटहाऊस कार्यक्रम भारतामध्ये ४ राज्यांमध्ये आणि १० शहरांमध्ये सुरू आहे. लाईटहाउस प्रकल्प हा सार्वजनिक खासगी भागिदारी (PPP)द्वारे चालवले जातात. त्यामध्ये सरकारी संस्था, कॉर्पोरेट्स, सामाजिक संस्था आणि नागरिक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदलासाठी काम करतात.
लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशनबद्दल
लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन हे संपूर्ण भारतातील एक दशलक्ष वंचित तरुणांसाठी जीवन-कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता यांच्या संधी निर्माण करून एक सक्षम समाजनिर्मिती करण्याच्या मोहिमेवर आहे. ही संस्था 2015पासून एका वैशिष्ट्यपूर्ण सार्वजनिक-खासगी भागिदारीतून मोठ्या प्रमाणावर परिवर्तनासाठी काम करत आहे. आतापर्यंत 1.5 लाखांहून अधिक नागरिकांना याचा लाभ झाला आहे आणि 2030पर्यंत 10 लाखांचा आकडा गाठण्याचे ध्येय ठेवले आहे.
इक्लर्क्सला सर्व्हिसेस लिमिटेड
इक्लर्क्सला सर्व्हिसेस लिमिटेड ही एक बीएसई आणि एनएसई यादीत असलेले, मुंबईस्थित भारतीय आयटी सल्लागार आणि आउटसोर्सिंग बहुराष्ट्रीय कंपनी आहे.

