लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील 11 घटकपक्षांचे येत्या 14 जानेवारी रोजी राज्यभर जिल्हावार मेळावे होणार असल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी ‘महायुती’तर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केलीहोते.
शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष समीर भुजबळ, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत ‘महायुती’ला 51 टक्के मतांसह 45पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
मकरसंक्रांतीच्या पर्वावर 14 जानेवारीला राज्यातील 36 जिल्ह्यांत ‘महायुती’तील 11 पक्षांचे संयुक्त मेळावे होणार आहेत. जिल्हा मेळाव्यांना घटकपक्षांचे जिल्हा पातळीवरील प्रमुख नेते, पालकमंत्री तसेच घटकपक्षांनी नेमलेले संपर्क मंत्री उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरीय मेळाव्यानंतर तालुका आणि बूथस्तरीय मेळावे घेण्याचा निर्णय ‘महायुती’ने घेतला आहे, असे ते म्हणाले.

फेब्रुवारीमध्ये विभागीय स्तरावर मेळावे होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, घटकपक्षांतील नेते या मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यांना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे, विनय कोरे, जयदीप कवाडे, सुलेखा कुंभारे आदी उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यासह ‘महायुती’तील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतील समन्वय वाढावा, यासाठी हे मेळावे होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली विकसित भारत साकारण्यासाठी ‘महायुती’चे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले आहेत.
शिवसेना नेते दादा भुसे यांनी सांगितले की, केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. ही विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘महायुती’च्या घटकपक्षांचे मेळावे होणार आहेत. गावपातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक समन्वय निर्माण होण्यासाठी या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

