Homeटॉप स्टोरीकुणबी नोंदींसाठी न्या....

कुणबी नोंदींसाठी न्या. शिंदे समितीची कार्यकक्षा आता राज्यभर!

मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविण्यात आलेली मोहीम आता संपूर्ण राज्यभर मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यासंदर्भात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्यासही त्यांनी सांगितले. या कामाच्या संनियत्रणासाठी मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव दर्जाचे अधिकाऱ्यांचीदेखील यावेळी नियुक्ती करण्यात आली. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा आता राज्यभर वाढविण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिव मनोज सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची बैठक घेतली. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यासमवेत शासनाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेतील मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी आज विभागात कुणबी नोंदी तपासणीच्या कामाचा आढावा घेतला. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाला इम्पॅरीकल डेटासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी महिन्याभरात उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

कुणबी नोंदी तपासण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम घ्या

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी मराठवाड्यासह राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हून कुणबी नोंदी तपासण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी. त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली  कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावी. त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ, साधनसामुग्रीदेखील तातडीने देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी याबाबत संनियंत्रण करतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करा

मराठवाड्यात शिंदे समितीने शिफारस केलेल्या पुराव्यांच्या आधारे कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करावी त्याचबरोबर प्रांत अधिकारी, तहसीलदार व जातपडताळणी समित्यांमधील अधिकारी, कर्मचारी यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासनाचे दोन पातळीवर काम

मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासन दोन पातळीवर काम करीत असून राज्यभर कुणबी नोंदी तपासण्याची कार्यवाही सुरू करतानाच दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाला इम्पॅरीकल डेटा जमा करण्यासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावी, असेही त्यांनी सांगितले. इम्पॅरीकल डेटा गोळा करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिस्टीक्स अण्ड इकॉनॉमिक्स आणि इंडियन इन्स्टीट्युट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज यासंस्थांची मदत घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

कर्जवाटपासाठी विशेष योजना तयार करा

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणारे कर्ज तातडीने उपलब्ध होईल यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याचे निर्देश देतानाच कर्ज वितरणामध्ये वाढ झाली पाहिजे. महिला उद्योजकांना कर्जवाटपासाठी विशेष योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

वसतीगृहांसाठी भाडेतत्त्वावर जागा घ्या

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी विभागाने भाडेतत्त्वावर जागा घेऊन तातडीने वसतीगृहे सुरू करण्याचे निर्देश देऊन त्याबाबतचा दर आठवड्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. जेथे वसतिगृह उपलब्ध होत नाहीत अशा महानगर असलेल्या मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रति वर्ष प्रति विद्यार्थी 60 हजार रुपये निर्वाह भत्ता, विभागीय ठिकाण, विभागीय मुख्यालय व क वर्ग महापालिका असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रति वर्ष 51 हजार रुपये निर्वाहभत्ता देण्यात येणार असून अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी 43 हजार रुपये निर्वाहभत्ता तर तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपये निर्वाह भत्ता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content