Homeटॉप स्टोरीबिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात...

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करा!

राज्यातील विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना हाच एक उपाय आहे. त्यामुळे बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली.

जातनिहाय जनगणना करून सर्व माहिती लोकांसमोर मांडल्याबद्दल बिहार सरकारचे अभिनंदन करत वडेट्टीवार म्हणाले की, राहुल गांधी सातत्याने जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी करत आहेत. मात्र हे सरकार त्यापासून पळ काढत आहे. या सरकारला पळ काढण्याचे कारण काय? हिंदुत्वाचे राजकारण करताना देशात ओबीसी हिंदू नाहीत का? त्यांना आरक्षण मिळायला नको का? त्यातूनही हे सरकर पळ काढत असेल तर ते दुर्दैव आहे.

काँग्रेसच्या काळात २०११ साली जातनिहाय जनगणना झाली होती. या जनगणनेमध्ये प्रत्येक जातीचा डेटा गोळा केलेला आहे. ती माहिती उघड करावी ही मागणी राहुल गांधी यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण कायम राहावे म्हणून ही भूमिका मांडली. मात्र त्यातही सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

एकाबाजूला ओबीसी जनजागरण यात्रा काढायची आणि दुसरीकडे या मूलभूत प्रश्नाला बगल द्यायची अशी दुट्टप्पी भूमिका सरकार घेत असून ओबीसींना हक्कापासून वंचित ठेवायचे महापाप हे सरकार करत आहे. जातनिहाय जनगणना करताना संघ आडवा येतो का? असा सवाल करत मनुवादी विचाराने तुम्ही सरकार चालवणार का? अशी विचारणा वडेट्टीवार यांनी केली. राज्यात विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर एकच उपाय जातनिहाय जनगणना हीच आहे. बहुजनांच्या हिताचा विचार करून न्याय देणार का, असेही ते म्हणाले.

इंडिया आघाडीने केले शक्तीप्रदर्शन

दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत इंडिया आघाडीने आज दुपारी ‘मी पण गांधी’ ही पदयात्रा आयोजित केली होती. फॅशन स्ट्रीटजवळ ही पदयात्रा पोहोचल्यानंतर तिथे पोलिसांनी पदयात्रा रोखली. त्यानंतर पोलीस आणि इंडिया आघाडीतल्या पक्षांचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते आणि काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडून आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते पुढे चालू लागले. काही जणांनी तेथेच बसकण मारली. म. गांधींचा पुतळाही यावेळी समोर ठेवण्यात आला होता. या आंदोलनात सुरूवातीच्या टप्प्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा एकही नेता नजरेस पडला नाही. सर्व बाजूंनी टीका होऊ लागल्यावर नंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आपल्या समर्थकांसह दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

आघाडीचे कार्यकर्ते फॅशन स्ट्रीटजवळच्या म. गांधींच्या पुतळ्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. इंडिया आघाडीने दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा ते महात्मा गांधी पुतळा अशी पदयात्रा काढण्याची परवानगी मागितली होती. परंतु, हे शांतता क्षेत्र असल्याने तसेच उच्च न्यायालयाचे निर्बंध असल्याचे कारण देत या पदयात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलिसांनी रीगल सिनेमा ते गांधी पुतळा या मार्गाने पदयात्रेची परवानगी दिली. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी खासदार संजय निरुपम या पदयात्रेत सहभागी झाले होते.

या पदयात्रेवरील कारवाईनंतर आमदार वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीने शांततेच्या मार्गाने पदयात्रा काढली होती. प्रेम आणि सौहार्दाचा संदेश देणं हा या पदयात्रेचा एकमेव उद्देश होता. परतु, गांधी जयंतीच्या दिवशीच आमच्या पदयात्रेवर कारवाई करण्यात आली. आमची पदयात्रा रोखण्याचा प्रयत्न झाला. नथुराम गोडसेचे पुजारी गांधीजींचा आवाज दाबू शकत नाहीत, असे त्या म्हणाल्या.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content