कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज कोणी ना कोणी महनीय व्यक्तीच्या निधनाची बातमी येत आहे. केंद्र सरकारच्या पाच-दहा मंत्रिमंडळांमध्ये कायम स्थान टिकवून रहिलेले पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी जाट पट्ट्यातील महत्त्वाचे नेते अजित सिंग यांच्या निधनाची बातमी ही त्या मालिकेतील ताजी बातमी होय. निधनसमयी ते 82 वर्षांचे होते आणि गुरगावमधील एका रूग्णालयात कोरोनाशी संबंधित काही व्याधी-गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले.
राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष ही त्यांची ओळख अर्थातच खूपच अपुरी आहे. भारतीय राजकारणातील 89-90च्या दशकाताली प्रभावी व्यक्तिमत्वांपैकी एक ही त्यांची खरी ओळख ठरावी. त्याहीपेक्षा, शेतकऱ्यांचे राजकारण करताना सर्वच राजकीय पक्षांना स्वतःभोवती नाचायला लावण्याची कला त्यांना काही काळ साध्य झाली होती असेही म्हणता येईल. निवडणुकीचा कौल कुणाच्या बाजूने लागणार याचा अंदाज अजित सिंग कोणत्या गटा-तटाबरोबर आहेत याकडे पाहून लावता येत असे!
अजित सिंगांचे पिताजी, चौधरी चरण सिंग, हे जाट शेतकरी समाजाचे मोठे व मान्यवर नेते होते. म. गांधींचे तरूण अनुयायी व नेहरूंच्या डाव्या समाजवादी धोरणांचे काँग्रेसमधील उघड विरोधक अशी त्यांची प्रतिमा होती. उत्तर प्रदेशात गोविंद वल्लभ पंतांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे महसूल मंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या फायद्याचे महत्त्वाचे जमीन सुधारणा कायदे केले होते. काँग्रेसमधील 1966नंतरच्या वादळी काळात त्यांनी काँग्रेस सोडून भारतीय लोकदल या पक्षाची स्थापना केली. या पक्षात उत्तर भारतातील सात महत्त्वाचे काँग्रेसविरोधी पक्ष एकत्र आले होते.
या पक्षाचे विलिनीकरण अन्य अनेक पक्षांप्रमाणे जनता पार्टीत केले गेले आणि जनता प्रयोगात ते मोरारजींनंतरचे भारताचे पाचवे पंतप्रधानही झाले. पण चरण सिंगांची ती करकीर्द अल्पजीवी ठरली. त्यांच्या सरकारचा पाठिंबा इंदिरा काँग्रेसने काढून घेतला, कारण इंदिरा गांधींवरचे आणीबाणीसंबंधीचे खटले संपवायला त्यांनी ठाम नकार दिला होता. ते राजीनामा देऊन मोकळे झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये जनता पार्टीचे अस्तित्त्व समाप्त झाले.
चौधरी चरण सिंग पुन्हा काँग्रेस विरोधाचे आपले राजकारण (राष्ट्रीय लोक दल) रालोदचे प्रमुख म्हणून करत राहिले. त्यांच्या आजारीपणात परदेशात असणाऱ्या मुलाला त्यांनी बोलावून घेतले आणि 1987मध्ये अजित सिंगांवर पक्षाची व शेतकरी राजकारणाची धुरा सोपवून चौधरी चरण सिंग निजधामास गेले.
अजित सिंग हे खरगपूरच्या आयआयटीचे पदवीधर! ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत बोस्टनला होते. वडिलांच्या आजारपणात त्यांना अमेरिकेचे ते सारे आयुष्य सोडून परतावे लागले. अजित सिंगांनी रालोदचे प्रमुख म्हणून आपली तीस-चाळीस वर्षांची कारकीर्द मात्र गाजवली. चौधरी चरणसिंगांना जे जमले नाही ते, म्हणजे सतत सत्तेत राहण्याचे कौशल्य, अजित सिंगांनी दाखवले. दुसऱ्या जनता प्रयोगात जनता पार्टीमध्ये ते सक्रीय होते. व्ही. पी. सिंग विरुध चंद्रशेखर यांच्या ओढाताणीत अजित सिंगांनी स्वतःचे महत्त्व वाढते ठेवले.
जेव्हा विश्वनाथ प्रताप पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी अजित सिंगांना उत्तर प्रदेशाच्या राजकारणातून बाहेर काढले व दिल्लीत स्थानापन्न केले. तेव्हापासून पुढची पंचवीस वर्षे अजित सिंगांनी आधी व्ही. पी., नंतर पी. व्ही. नरसिंहराव नंतर अटलबिहारी वाजपेयी आणि नंतर मनमोहन सिंग अशा सर्व पंतप्रधानांसमेवेत केंद्रीय मंत्री म्हणून कामगिरी बजावली. उद्योग, पेट्रोलियम, रसायने व खते, हवाई वाहतूक अशी जबाबदारीची व महत्त्वाची खाती त्यांनी 1989 ते 2009 पर्यंत सांभाळली. ते भाजपाप्रणित रालोआत व काँग्रेसप्रणित संपुआमध्येही निरनिराळ्या वेळी सामील होते. राव साहेबांच्या काळात तर ते काही काळ काँग्रेसमध्येही गेले होते. नंतर पुन्हा बाहेर पडून त्यांनी भारतीय लोक दल नावाचा पक्ष काढला. पुढे ते रालोद चालवू लागले!
अजित सिंगांची शेतकरी नेता ही प्रतिमा मात्र कायम होती. अर्थात उत्तर प्रदेशात मुलायम सिंगांचे राजकारण जोर धरू लागले तेव्हा अजित सिंगाचे महत्त्व कमी झाले. तोवर उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून ते वावरत होते. त्यांची ती संधी मुलायम सिंगांनी 1989मध्ये हुसकावून घेतली. अजित सिंगांनी आपल्या वडिलांचे पश्चिम उत्तर प्रदेशातील बलस्थान मात्र अखेरपर्यंत सांभाळले. अलिकडे नरेंद्र मोदींनी जेव्हा अन्य साऱ्या विरोधी नेत्यांना गुंडाळून सर्वाधिक लोकप्रिय नेते हा किताब मिळवला तेव्हा अन्य अनेक नेत्यांप्रमाणेच अजित सिंग थोडे बाजूला पडले होते.
देशातल्या कोणत्याही शेतकरी समस्येबाबत त्यांचा विचार घेतला जात असे. त्यांना त्या क्षेत्रातील मानाचे स्थान दिले जात असे. अगदी अलिकडे फेब्रुवारीमध्येही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा तिढा कसा सोडवाचा किंवा या आंदोलनाची पुढची दिशा काय ठेवायची यासाठी टिकैत आदी नेत्यांनी अजित सिंगांशी चर्चा केली होती. वयोमानाने थकल्याची जाणीव झाली तेव्हा अजित सिंगांनी आपला पुत्र जयंत चौधरी याच्याकडे रालोदची सूत्रे सोपवली आणि ते निवृत्तीच्या तयारीला लागले होते. पण कोविडच्या लाटेत त्यांचा टिकाव काही लागू शकला नाही.