Homeन्यूज अँड व्ह्यूजनायर रूग्णालयाच्या आवारात...

नायर रूग्णालयाच्या आवारात कोसळल्या ‘श्रावणसरी’…

रुग्ण म्हणून तशी त्यांच्यासाठी ही रोजचीच सकाळ.. अवतीभवती गोळ्या-औषधांचा काहीसा दर्प.. सगळीकडे कामाची लगबग.. रात्रपाळी संपवून घरी निघालेल्या परिचारिका.. धावत-पळत रुग्णालयाच्या आवारात येणारे कर्मचारी.. पांढरे कोट घालून तपासणारे डॉक्टर.. सारा काही तोच तो माहोल.. इतक्यात या आवारात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, वासुदेव, पोतराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्यापासून गाडगे महाराज यांच्यासह विविध महापुरूष, वारकरी असे सारेच तेथे अवरतात.. आणि अवघ्या काही क्षणात मुंबईच्या  मुंबई सेंट्रल परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आसमंतात ‘श्रावणसरी’नी आल्हाददायक वातावरण तयार होते..

या सकारात्मक आनंददायी अनुभवासाठी निमित्त ठरले ते वैद्यकीय विद्यार्थ्यांनी काढलेल्या शोभायात्रेचे. बा. य. ल. नायर रुग्णालयात वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या पुढाकारने ‘उत्सव महाराष्ट्राच्या परंपरेचा’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘श्रावणसरी’ या दोन‌ दिवसीय उत्सवादरम्यान मराठी भाषेचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याच अंतर्गत मराठी भाषा आणि संस्कृतीची घट्ट नातं असणारी दिंडी आणि इतर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विशेष म्हणजे मराठी भाषेला समर्पित दोन दिवसीय उत्सवाचे आयोजन करणारे नायर वैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एकमेव वैद्यकीय महाविद्यालय आहे, अशी माहिती बा.य.ल. नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली.

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगरे डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय डॉ. नीलम अंद्रादे यांच्या मार्गदर्शनानुसार टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमासोबतच व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजनदेखील करण्यात येते. याच अंतर्गत दरवर्षी मराठी महिन्यांमधील ‘श्रावण’ महिन्यात ‘श्रावणसरी’ या उत्सवाचे आयोजन केले जाते. यानुसार या वर्षीदेखील या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले‌‌. यामध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपापला अभ्यास सांभाळून मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. मेढेकर यांनी सांगितले की, ‘श्रावणसरी’ या उत्सवांतर्गत पहिल्या दिवशी सकाळी दिंडीसह शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्यासह विविध महापुरुषांच्या वेशभूषा करून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. या शोभायात्रेत लेझीमच्या तालावर पदन्यास करणाऱ्या वासुदेव, पोतराज अशा अनेक वेशभूषांमधील विद्यार्थ्यांनी उत्सवात रंगत आणली. यावेळी सादर झालेल्या शिवगर्जनेने संपूर्ण परिसर दणाणून गेला. याच उत्सवादरम्यान गायन, नृत्य व नाट्यस्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्येदेखील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे या स्पर्धांदरम्यान सादर करण्यात आलेली गाणी ही केवळ मराठी गाणी होती; तर नृत्येदेखील केवळ आणि केवळ मराठी गाण्यांवरच बसवलेली होती.

बा. य. ल नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या ३८ वर्षांपासून ‘श्रावणसरी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये मराठी नाट्यस्पर्धा, काव्य मैफिल, नृत्यस्पर्धा, भजन, गायन यासह विविध अविष्कारातून मराठीचा जागर करण्यात येतो. विशेष म्हणजे कार्यक्रमादरम्यान दोन दिवसांमध्ये आहारदेखील मराठी पद्धतीचा असतो. यामध्ये पुरणाची पोळी, श्रीखंड, मोदक, झुणका भाकरी असे पदार्थ असतात. एवढेच नव्हे तर विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा पोशाखदेखील या दोन दिवसांच्या कालावधीत प्राधान्याने महाराष्ट्रीय पद्धतीचा असतो.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन हे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थीच करत असतात. विशेष म्हणजे कार्यक्रमाचा खर्चदेखील विद्यार्थ्यांच्या वर्गणीतून करण्यात येतो. यंदादेखील अत्यंत दिमाखात सलग दोन दिवस श्रावण सरी हा उत्सव पार पडला. यंदाच्या ‘श्रावणसरी’ उत्सवादरम्यान ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची प्रकट मुलाखत डॉ. शुभम हिरेमठ आणि विद्यार्थिनी भक्ती शिंदे यांनी घेतली. यावेळी बोलताना डॉ. प्रकाश आमटे यांनी सामाजिक क्षेत्रातील आपली वाटचाल आणि प्रवास उलगडून सांगितला. तसेच एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तेही गेल्या ३८ वर्षांपासून मराठीचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात याचे कौतुक आणि अभिमान असल्याच्या भावना डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. आमटे म्हणाले की, वैद्यकीय सेवा ही अत्यंत अत्यावश्यक अशी सेवा आहे. वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी समर्पित भावनेने राज्याच्या कानाकोपऱ्यात आवश्यकता असेल तेथे वैद्यकीय सेवा दिली पाहिजे. तसेच समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो, हे सतत लक्षात ठेवून समाजाकडे चौकस बुद्धीने पाहिलं पाहिजेत. येणाऱ्या आव्हानांचा सामना करत आणि धीरोदात्तपणे प्रत्येक संकटाला तोंड देत विद्यार्थ्यांनी आपली सेवाभावी वृत्ती जोपासली पाहिजे.

‘श्रावणसरी’ उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर काव्य मैफिल पार पडली. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी स्वरचित मराठी कविता, रचना सादर केल्या. या काव्य मैफिलीनंतर नृत्यस्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्येदेखील विद्यार्थ्यांनी मराठी गाण्यांवर नृत्य अविष्कार सादर केले.

दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र धामणे यांचे आणि आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांचेही प्रेरक व्याख्यान झाले. या कार्यक्रमादरम्यान आपले विचार व्यक्त करताना डॉ. राजेंद्र धामणे सांगितले की, प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल घडवायचे ठरविले तर आपल्या प्रत्येकामध्ये समाजाची अविरत सेवा करणाऱ्या व्यक्ती तयार होतील. याच उत्सवादरम्यान भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयात मराठी भाषेचा जागर होणे माझ्यासाठी सुखद धक्का आहे. भाषा, साहित्य आणि कला या तिन्ही बाबींचा संगम या ठिकाणी दिसून आला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अशा कार्यक्रमाचा निश्चितच फायदा होतो.

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content