Homeटॉप स्टोरीउपमुख्यमंत्री अजितदादांचे राजकीय...

उपमुख्यमंत्री अजितदादांचे राजकीय भवितव्य काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत राज्य सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार संपूर्ण पक्ष आपल्यासोबत घेण्यात यशस्वी होतात की आपले काका, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर गुडघे टेकत पुन्हा एकदा सरकारमधून बाहेर पडतात, याकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी, दोन जुलैला अजित पवार आणि त्यांचे आठ सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. त्यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीनंतर संतापलेले शरद पवार यांनी लगेचच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा केली. मंत्रिमंडळात सहभागी झालेले छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून त्यांनी आपल्या भूमिकेच्या समर्थनासाठी जाहीर सभा घेतली. यानंतर आणखी काही सभा ते घेणार आहेत. या सर्व सभा मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात होणार आहेत. मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर घेतलेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला होता. आपल्याला वेळोवेळी कसे तोंडघशी पाडण्यात आले हे त्यांनी तपशीलवार सांगितले. याच दिवशी शरद पवार यांनीही वेगळा मेळावा घेऊन आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली होती.

राजकीय खेळी म्हणून अजित पवार यांनी आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्याचवेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नेमणूक केली आणि प्रतोदपदी अनिल पाटील यांची नेमणूक केली. तिकडे शरद पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांना कायम ठेवले आहे. मात्र अनिल पाटीलऐवजी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रतोद म्हणून नेमले. त्याच वेळेला अजित पवार यांनी विरोधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक केली जाईल, असेही त्यांनी घोषित केले.

या नव्या मंत्र्यांना दोनच दिवसांपूर्वी खाती देण्यात आले. हे खातेवाटप होण्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक, या निवासस्थानी जाऊन आपल्या काकी प्रतिभा पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार तसेच सुप्रिया सुळे घरी उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना अजितदादा म्हणाले की, राजकीय भूमिका आणि कौटुंबिक संबंध यात फरक असतो. राजकारणामध्ये आम्ही वेगळी भूमिका घेतली असली तरी कुटूंब हे कुटूंबात असतं. त्यामुळे आपण सिल्व्हर ओकवर गेलो होतो. 

उद्यापासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या देवगिरी, या शासकीय निवासस्थानी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. ही बैठक संपताच ही सारी मंडळी यशवंतराव चव्हाण केंद्रात उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले. तेथे साधारण पाऊण तास त्यांची शरद पवारांबरोबर चर्चा झाली. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच जितेंद्र आव्हाड हे दोघेही या बैठकीत उशिराने सहभागी झाले. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्ही शरद पवार यांना आमचे दैवत मानतो. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. ही भेट पूर्वनियोजित नव्हती. यावेळी बोलताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एकसंघ राहावा यादृष्टीने चर्चेतून काही मार्ग काढावा, अशी विनंती शरद पवार यांना केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

अजित पवार आणि त्यांचे सहकारी निघून गेल्यानंतर यशवंतराव चव्हाण केंद्रातच जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांच्या काही मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार आणि मंत्रिमंडळात सहभागी झालेले इतर काही सहकारी यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ राहावा यादृष्टीने निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी शरद पवार यांना केली. मात्र शरद पवार यांनी यावेळी मौन बाळगले.

यानंतर यशवंतराव चव्हाण केंद्रातून शरद पवार थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी भवन येथील मुख्यालयात गेले. तेथे त्यांनी युवकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी आपण पुरोगामित्वाची कास सोडणार नाही असे निक्षून सांगितले. या मेळाव्याच्या आधी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याशीही त्यांची चर्चा झाल्याचे समजते. थोड्या वेळानंतर जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांकडे एक पत्र पाठवून अजित पवार यांच्याबरोबर मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या नऊ सदस्यांना वगळता बाकी सर्व सदस्यांची विरोधी बाकांवर बसण्याची आसनव्यवस्था करावी अशी विनंती केली. त्याचवेळी त्यांनी हे नऊ सदस्य सोडून इतर सर्व आमदारांसाठी व्हिपही जारी केला. शरद पवार उद्या बंगलोर येथे विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी जाणार असून तेथून नंतर ते दिल्लीला जातील, असेही आव्हाड यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार आणि त्यांचे सहकाऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे जाऊन केलेली मनधरणी फारशी फलद्रूप होणार नसल्याची शक्यता जास्त दिसत आहे.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content