Homeटॉप स्टोरीमंत्रिमंडळाचे खातेवाटप व...

मंत्रिमंडळाचे खातेवाटप व विस्ताराबाबत एकत्रितपणे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप व मंत्रिमंडळाचा विस्तार समतोल पद्धतीने केला जाईल. कुणी नाराज होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते एकत्रितपणे याबाबतचा निर्णय घेतील, असे मत राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी आज का पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पालकमंत्रीपदाचा निर्णयदेखील तिन्ही नेते एकत्रितपणे घेतील. महामंडळे कोणत्या पक्षाला किती मिळणार याचा निर्णय आठ दहा दिवसांत घेतला जाईल. विविध समित्यांबाबतचा निर्णय समन्वय समितीमध्ये पुढील आठवड्यात होईल, असे त्यांनी जाहीर केले. पुलोदमध्ये झाला होता तसाच प्रयत्न एकनाथ शिंदेंनी केला, या बाबी राजकारणात १९७८पासून चालत आलेल्या आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत आलेल्यांवर टीका करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

कुणी कितीही दौरे केले व कितीही आदळाआपट केली तरी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे आगामी लोकसभा निवडणुकीत ४५पेक्षा जास्त खासदार व विधानसभा निवडणुकीत २००पेक्षा अधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्यावर, आमच्या नेतृत्त्वावर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम विरोधकांनी सुरू ठेवला आहे. स्वतःकडे असलेले निवडक आमदार व निवडक कार्यकर्ते टिकवण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू आहे. त्यांची ही अस्तित्त्वाची लढाई सुरू आहे. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो व अशा भाषणांकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असे ते म्हणाले.

आम्ही जनतेशी व जनतेच्या विकासाशी बांधील आहोत, तेच आमचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार दमदारपणे वेगाने काम करत आहे. त्यामुळे आम्ही विरोधकांच्या कोणत्याही आरोपांना महत्त्व न देता जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत. आम्हाला शिवीगाळ करुन कुणाला त्यांची सत्ता येईल, असे वाटत असेल तर ती त्यांची दिवास्वप्ने आहेत, असा टोला त्यांनी लगावला. कलंकाबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. २०१९च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. सध्या विरोधकांकडून सध्या केवळ एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केली जात आहे. पुढे अजित पवारांची बदनामी केली जाईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. 

सर्वसामान्य कुटुंबातील शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्याने त्यांचा तिळपापड होत आहे. शासन आपल्या दारी, हा कार्यक्रम काही लोकांना झोंबला आहे. कोट्यवधी जणांना या कार्यक्रमाचा लाभ होत आहे. ही संकल्पना पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवली आहे. त्याचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिंदेंचे कौतुक झाल्याने काहीजणांच्या पोटात दुखत आहे. सर्वसामान्य घरातील मुख्यमंत्री होऊ नये असा विचार असणारेच टीका करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

रुग्णालयात असताना बैठका झाल्या असे सांगणाऱ्यांना रुग्णालयात नेमक्या किती बैठका झाल्या हे मला सांगावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. तात्त्विक विरोध समजू शकतो. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करणे विरोध करणे चुकीचे आहे. महाविकास आघाडी सरकार असताना राष्ट्रवादीला अधिक निधी मिळत होता, त्यावर आमदारांनी आवाज उठवला होता. मात्र तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या तक्रारीकडे दु्र्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content