धुळे जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनविणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेच्या कामासह धुळे शहराच्या विकास कामांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम जलदगतीने सुरू असून हा रेल्वे मार्गही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धुळ्यात दिली.
एसआरपीएफ मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे मंत्री दादाजी भुसे, मंत्री अनिल पाटील, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, आमदार किशोर दराडे, जयकुमार रावल, मंजूळाताई गावीत, काशीराम पावरा, चिमणराव पाटील, मंगेश चव्हाण, महापौर प्रतिभा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

‘शासन आपल्या दारी’ अभियानात धुळे जिल्ह्यात 3 लाख 21 हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. धुळे-नरडाणा-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामासाठी केंद्र सरकार पन्नास टक्के व राज्याचा पन्नास टक्के निधी देणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे, असे ते म्हणाले.
सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नये यासाठी शासनच जनतेपर्यंत जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशाचा झपाट्याने विकास होत आहे. तापीमधील बॅरेजच्या पाण्याचा वापर वाढला पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आर्थिक शिस्त ठेवत शासन सर्वसामान्यांसाठी सर्वांगीण काम करत आहे. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी खर्च करण्याचे शासनाचे धोरण आहे. पाऊस नसल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. धरण पाणीसाठ्याचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली.

ज्येष्ठ लोक कलावंत नथ्थू ईशी, जितेंद्र भोईटे, संतोष ताडे, अरविंद भामरे, मांगू मगरे यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वृध्द कलावंत पेन्शन योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रोजगार मेळाव्यातून रोजगार मिळालेले दिनेश पाटील, चेतन गवळी, अमोल जाधव या तरूणांना यावेळी नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी धुळे जिल्ह्याने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे टोपी, उपरणे, महिला बचतगटांनी तयार केलेल्या खान्देशी पदार्थ देऊन स्वागत करण्यात आले.

