स्वामी विवेकानंदाच्या समग्र ग्रंथात नागे गोसावींची कथा आहे, सिंधू नदीच्या तिरी एका निबीड अरण्यात काही गोसावी एका पाषाणावर बसले होते. जग जिंकण्याची इर्षा बाळगणारा सिंकदर तिथे पोहोचला. समोरच्या शिलाखंडावर एक वृद्ध संन्यासी बसला होता. त्याच्या मुखातून स्त्रवणाऱ्या ज्ञानामृताने सिंकदर थक्क झाला. त्याने संन्याश्यासमोर सुवर्ण नाण्याचा ढिग टाकून त्याला ग्रिस देशात येण्यासाठी विनवू लागला. त्या गोसाव्याने सुवर्ण राशीकडे तुच्छतेने पाहिले. उपहासात्मक हास्य करून तो म्हणाला, “तू स्वत:ला जगातील सर्वश्रेष्ठ योद्धा समजतोस. तुला जगजेत्ता व्हायचे आहे. जग जिंकून तू सुखी होणार आहेस. मी मात्र या नग्न अवस्थेतही सुखीच आहे. मला सुखी होण्यासाठी माझ्या अंगावर पडलेली तुझी सावली तेवढी बाजूला कर. भरपूर सूर्यप्रकाश मला मिळू दे!”
संन्यासी असे बोलताच, हा आपला अपमान आहे असे सिंकदरास वाटले. तो अत्यंत क्रोधित झाला आणि म्हणाला, “तू जर माझ्याबरोबर आला नाहीस तर मी तुझा वध करेन.” यावर सन्यासी गदागदा हसून म्हणाला, “तू आता जे काही बोललास एवढे खोटे तुझ्या पूर्ण आयुष्यात केव्हाच बोलला नसशील. मला मारण्यासाठी या जगात कोण समर्थ आहे? तू या जडजगाचा बादशहा आहेस. मी कधी जन्मलो नाही. मी चैतन्यरुप, अजरामर, शाश्वत, सर्वव्यापी, सर्वशक्तीमान आहे. तेव्हा हे कोवळ्या पोरा तू मला कसा मारशील?” सिंकदर हे उत्तर ऐकून हतबल झाला. उपनिषद ग्रंथातील तत्त्वज्ञान प्रत्यक्ष आचरणात उतरविलेल्या साधकाला असे निर्भय होऊन जगता येते. हे जगणेच अतिशय उच्च स्तरावरील इंद्रीय निग्रहाचे उदा. आहे. जड जगातील कोणतीही व्यक्ती या विचाराजवळसुद्धा जाऊ शकत नाही. त्यासाठी मिळविलेले आत्मबल अथक साधनेची फलश्रुती असते. ती कष्टसाध्य आणि निग्रहपूर्ण जीवन जगणाऱ्या योगी जिवालाच शक्य आहे.
हिंदुस्थानातील दशनाम गोसावी शंकराचार्याच्या अद्वैत (अद्वितीय) मठाचे अनुयायी आहेत. बंगालमधील काही गोसावी वैष्णव संप्रदायाचे गोकुलीय गोसावी होतं. स्वामी विवेकानंद एका व्याख्यानात असे म्हणाले होते की, “श्री चैतन्य माध्वपुरीचे शिष्य व माध्वपुरी हे प्राचीन आर्य परंपरेपैकी आणि वल्लभ संप्रदाय हा चैतन्य संप्रदायापासून निघाला म्हणजे आचार्याच्या संप्रदायाची ती उपशाखा होय. मात्र ती आज वैष्णव संप्रदाय म्हणून प्रसिद्ध आहे. दशनाम गोसावी हे आचार्यांचे कट्टर अनुयायी तरीसुद्धा त्यांनी प्राचीन नारायणीन धर्म कधी सोडला नाही. पण शंकराचार्यानी केलेल्या धर्मचिकित्सेने शुद्ध प्रमाणाचे नियम तयार केले. त्या नियमास धरून वेदांतशास्त्र तयार केले. त्यामुळे सनातन वैदिक धर्माची स्थापना झाली. लोकांच्या उथळ प्रवृतीला त्यामुळे लगाम बसून ब्रह्मज्ञानाकडे ते वळू लागले. आचार्यांचा अद्वैत वाद व मायावादाने झालेली धर्मक्रांती विलक्षण होती. वैदिक धर्माच्या प्रसार, प्रचाराकरिता त्यांनी हिंदुस्थानभर प्रवास केला. हे आपले जीवितकार्य समजून बाल वयातच त्याची त्यांनी सुरूवात करणे यात नियतीचे विशिष्ट संकेत होते. चार दिशांना चार मठ स्थापन करून विस्कळीत गोसावी समाज एकत्रित केला. अधिकारी व विद्वान शिष्याची या पिठासाठी निवड केली. सर्वत्र अद्वैत मतांचा प्रसार केला. या कार्यासाठी त्यांच्या दशनाम शिष्याचे खूप सहकार्य मिळाले. या शिष्यापासून दशनाम संन्यासाची निर्मिती झाली. गृहस्थ गोसावी त्यांचे शिष्य झाले. आचार्याच्या अद्वेत संप्रदायाचे ते चाहते झाले.
शंकराचार्याचे चार प्रमुख शिष्य आहेत. ०१) सुरेश्वराचार्य ०२) पद्मपादाचार्य ०३) हस्तामलकाचार्य ०४) तोटकाचार्य. याशिवाय त्यांचा शिष्यपरिवार खूप मोठ्या प्रमाणात होता. हस्तामलकच्या विषयीची कथा अद्भूत आहे. हा बालपणी अतिसामान्य बुद्धीचा मुलगा होता. हस्तामलकाचे पहिले नाव पृथ्वीधर किंवा पृथ्वीधव होते. सुप्रसिद्ध मिमांसक प्रभाकरांचे हे अपत्य. हे कुटूंब प्रयागजवळच्या श्रीवल्ली उर्फ प्रतिष्ठानपुरीचे. गंगेच्या उत्तर तिरावरील झुशी गावी राहत असे. प्रभाकरने हा वेडसर मुलगा आचार्यास अर्पण केला. आचार्यानी त्याला
“कस्त्व कस्य कुतो ऽ सि गंता|
किं नाम ते त्वं कुत आगतो $ सि।
एतमयोक्तम वद चार्भकत्वं मत्प्रीतमे प्रतिविवर्धनो $ सि|०१|
(हे बालका, तू कोण आहेस, कोणाचा आहेस, तू कोठे जाणार आहेस, तुझे नाव काय आहे, तू कोठून आला आहेस मुला? मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. या प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडून मला मिळाले तर मला खूप आनंद होणार आहे.)
हा प्रश्न विचारताक्षणी त्याला ज्ञानसाक्षात्कार झाला. मी ज्ञानस्वरूप अखंड आत्मा असल्याचे त्याने सांगितले. पुढे त्याच्याकडून ‘हस्तामलक’ ग्रथांची निर्मिती झाली. या ग्रंथनिर्मितीमुळेच हस्तामलकाचार्य नामप्राप्ती त्याला झाली. तोटकवृतांत गुरूस्तुतीमुळे तो तोटकाचार्य झाला. सनंद अत्यंत कठोर परिश्रमाने विद्वान पंडित झाला. त्यामुळे इतर शिष्यांना त्याच्याबद्दल मत्सर निर्माण झाला. हा मत्सर किती मिथ्या आहे, हे सिद्ध करण्यासाठी काशी तिर्थक्षेत्री असता आपल्या या पटशिष्याला आचार्यानी गंगेच्या पैलतिरावरून हाक मारली. तो योगबलाच्या साह्याने तत्काळ पाण्याच्या पृष्ठभागावरून चालत आला. तेव्हा त्याच्या प्रत्येक पायाखाली पाण्यात कमलपत्रे उगवलेली दिसली. यामुळे त्यांना पद्मपाद हे नाव प्राप्त झाले. त्यांच्याकडे विलक्षण योगिक सामर्थ होते. आचार्यानी अमरू राजांच्या शरीरात प्रवेश केल्यावर त्यांना काही कालावधीपर्यंत आपल्या पूर्वदेहाचा विसर पडला होता. पद्मपादाने तेव्हा त्यांना आत्मस्वरूपाचे स्मरण करून दिले. कापालिकांने मंत्रशक्तीने आचार्यदेहात दूर्धर आजार निर्माण केला. तेव्हा केवळ योगशक्तीने त्याचा प्रतिकार पद्मपादाने केला अशी आख्यायीका आहे. या नि:स्सिम शिष्याला आचार्य शिष्यात त्यामुळे शिर्षस्थान मिळाले. विद्वता व प्रसिद्धीने सुरेश्वराचार्य सर्वश्रेष्ठ होते. पूर्वीचे नाव मंडनमिश्र. पूर्वाश्रमीचे काश्मिरी किंवा आसामी ब्राह्मण असावे. नर्मदेकाठी महिष्मती नगर (महेश्वर) निवासी. सुरेश्वराचार्याना विश्वरूपाचार्य असेही म्हटले जाते. आचार्याच्या परम शिष्यापैकी तोटकगिरी, स्वरूपाचार्य, पद्मपादतीर्थ, हस्तामलक पिठाधिकारी झाले. हे चार शिष्य पीठावर आरूढ झाल्यावर दशनाम गोस्वामी संप्रदाय विस्तृत होण्यास प्रारंभ झाला.
दशनाम गोसावी हे आचार्यांचे सांप्रदायीक शिष्य होते. आचार्यानी संप्रदायाच्या प्रचारार्थ चार मठाची योजना करून प्रत्येक मठाचे अनुयायी, देवदेवता, वेद, ब्रह्मचारी, महावाक्य, अधिकारक्षेत्र यासंबधी नियम तयार केले. आचार्याचे प्रमुख चार शिष्य व दशनाम गोसावींचा संबंध पुढीलप्रमाणे आहे.
०१) ज्योतीर्मठ:- तोटक गिरि उर्फ तोटकाचार्य यांच्याकडे बद्री केदार येथील ज्योतीर्मठाचा कार्यभार देऊन ज्योतीपीठाचे पहिले शंकराचार्य होण्याचा सन्मान त्यांना मिळाला. त्याशिवाय पर्वत सागर यांच्यासह असणारी आतापर्यंतची आचार्य परंपरा फार मोठी आहे. उत्तराखंड राज्यात असणाऱ्या या पिठाचे वर्तमान आचार्य अविमुक्तेश्वरानंद आहेत.
०२) शारदामठ:- द्वारका येथील हे हिंदूपीठ गुजरात राज्यात असून तेथील पहिले शंकराचार्य पृथ्वीधर उर्फ हस्तमलकाचार्य होय. याशिवाय तीर्थ व आश्रम यांची असणारी आचार्य परंपरा मोठी आहे. या पीठाचे वर्तमान शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती आहेत.
०३) शृंगेरी मठ:- हिंदू धर्माच्या चार पिठापैकी एक. दक्षिण पीठ म्हणून प्रसिद्ध आहे. कर्नाटक राज्यातील (जि. चिकमंगलूर) तुंगा नदीच्या तिरावर स्थापीत झाले आहे. तेथील प्रथम आचार्य सुरेश्वराचार्य होते. वर्तमान शंकराचार्य स्वामी भारती कृष्णतिर्थ आहेत.
०४) गोवर्धन मठ:- आद्य शंकराचार्यांनी ओरीसामध्ये जगन्नाथपुरी येथे स्थापलेला हा मठ आहे. मठातील प्रमुख वेद ऋग्वेद आहे. मठाचे महावाक्य प्रज्ञान ब्रह्म आहे. इथे दिक्षा प्राप्त करणाऱ्या संन्यासाच्या नावा अखेर आरण्य असे लिहीण्याची प्रथा आहे. या मठाचे प्रथम शंकराचार्य पद्मपादस्वामी होते. वर्तमान शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती आहेत.
या चार धर्मपीठानंतर संपूर्ण भारतात लहानमोठी अनेक धर्मपीठे स्थापन झाली. पुढेही होत राहतील. त्या माध्यमातून धर्मकार्य व राष्ट्रकार्य सुरू राहीलच. आपल्या अभ्यासाचा मुख्य उद्देश गोसाव्यांनी दिलेला लढा, त्यांचा त्याग, बलिदान व राष्ट्रभक्तीचा इतिहास हा अभ्यास अधिक महत्त्वाचा आहे असे मला वाटते. अनुकूल परिस्थितीचा लाभ जर गोसावी समाजाला मिळाला तर प्रवृती व निवृतीचा सुंदर संगम होऊन राष्ट्रकार्य सुकर होईल. गोसावी संप्रदायातील खरा संन्यास हा मानस संन्यास समजला जातो. मुण्डण, भगवी वस्त्रे, दंडधारण, भैक्षचर्य, अविवाहित राहणे, या सर्व बाबी बाह्यचिन्हे होत. याज्ञवल्क सन्यासधर्माचे प्रवर्तक होते तरी त्यांनी ‘सन्याससंगीतेत कर्मयोगी विशिष्यते’ हे तत्त्व मांडले आहे. शंकराचार्यानीसुद्धा मानस संन्यासालाच महत्त्व दिले आहे. ती वृती जर आंतर्बाह्य असेल तर त्याचं व्यक्तीकडून भरीव असे धर्मकार्य होण्याची शक्यता असते. बाह्यचिन्हे धारण करणारे पाखंडी युगानुयुगे समाजाची घोर फसवणूक करत आले आहेत. त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करणार?
गृहस्थ धर्माची मध्यंतरीच्या कालावधीत हेटाळणी सुरू झाली होती. पण यवन हल्ले सुरू होताच क्षात्रतेज अंगी असणारे गृहस्थाश्रमी गोसावी पेटून उठले. अनुवांशिक संस्कार प्रसंगी असे उफाळून आले की भस्माचे गोळे व रूद्राक्ष माळा, दंड, कमंडलू देवघरात सुरक्षित ठेऊन ढाल, तलवार, धनुष्यबाण हाती घेऊन इतर स्वधर्मीय योद्ध्याप्रमाणे रणांगणात उतरून शत्रूचा नि:पात केला. इंग्रजांच्या राजवटीत मात्र गोसाव्यांच्या पराक्रमास वाव नव्हता. हिंदवी स्वराज्याच्या अंतामुळे खरा योग विसरून गोसावी नावाचेच योगी राहिले. भिक्षा मागणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, हा विचार अज्ञान व गैरसमजातून वर्तनात आला. गुरूशिष्य परंमपरेतील भव्यतम अर्थ नष्ट होऊन,
लोभी गुरू. लालची चेला दोनो खेले दावं।
भवसागरमे डुबते बैठे पत्थरकी नांव||
अशी भयावह अवस्था निर्माण झाल्यामुळे आदरणीय गोस्वामी समाज भणंग, भिकारी, दरोडेखोर, या अवस्थेत ब्रिटिश कालावधीत आला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शिक्षणाचे प्रमाण वाढले हे खरे आहे. पण आपला वैभवशाली इतिहास मात्र आपण विसरलो आहोत का?
आपल्या न्याय्यहक्कासाठी लढा देणे ही बाब अगदी योग्यच आहे. पण गुरूपरंपरेचे पूर्ववैभव, तो सन्मान, आदर प्राप्त करण्यासाठी आमच्यातील ती साधकवृत्ती आम्ही गमाऊन बसलो का? हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारलाच पाहिजे. केवळ भौतिक सुखाच्या बळावर आम्ही आम्हाला आणि आमच्या भावी पिढ्यांना सुखी, समाधानी व आनंदी बनविण्याचा वेडेपणा करत आहोत का? हा वेडेपणा काळाच्या ओघात एक दिवास्वप्न ठरणार आहे, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. साधना, ज्ञानप्राप्ती व प्रत्यक्ष कर्म हेच आम्हाला तारणार आहेत आणि त्यामुळेच मानवी इतिहासात आमचे स्थान अढळ राहणार आहे. हे वास्तव ओळखून आमच्याकडून प्रत्यक्ष कृतिपर कार्याची अपेक्षा आहे. ती कार्यसिद्धी आमच्यातील मनुष्यत्वाची उंची वाढविणार आहे. त्या कृतिचा उपयोग मानवतेची उंची वाढविण्यासाठी होईल.
संपर्क- 9011229232 / 8482890991

