Homeटॉप स्टोरीमोर्चाची गरज होती...

मोर्चाची गरज होती मातोश्री १ ते मातोश्री २ दरम्यान!

कोविड सेंटरच्या नावाखाली करण्यात आलेल्या गैरव्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरु झाल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोर्चा काढला जात आहे. मात्र जनता त्यांच्या या भूलथापांना फसणार नाही. आज काढण्यात आलेल्या मोर्चाचे ठिकाण चुकले आहे. खरा मोर्चा मातोश्री १ ते मातोश्री २ दरम्यान काढण्याची गरज होती, कारण जो काही गैरव्यवहार झाला आहे तो याच ठिकाणी झाला आहे, असा हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर चढवला.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात युवासेनेच्या कोअर कमिटीचे राहुल कनाल व वर्धा जिल्ह्यातील करंजा नगरपरिषदेतील १० नगरसेवकांच्या प्रवेशानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथील अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याने संवेदनशील भाजपने मोर्चा रद्द केला. मात्र कोणतीही संवेदना न उरलेल्या व केवळ राजकारण करणाऱ्यांनी मोर्चा काढला, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

आजचा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. कोविड सेंटर लोकांना जगवण्यासाठी बनवली होती की मारण्यासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस कोविड सेंटर, बोगस डॉक्टर, बोगस ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आले. सदोष ऑक्सिजन प्रकल्पामुळे रुग्णांना ब्लॅक फंगस आजार झाला. एवढेच नव्हे तर मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनी कोविड काळातील मृत व्यक्तींचे मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडीबॅगसाठी सहाशे रुपयांऐवजी तब्बल साडे सहा हजार रुपये खर्च केले. आम्ही ठाण्यात तीच बॅग अवघ्या ३२५ ला बॅग घेतली. काहीजण ठाण्यातील व्यवहारांची चौकशी लावण्याची चर्चा करत आहेत. मात्र कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याने बिनधास्त चौकशी लावा, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले.

महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारांबाबत ईडी चौकशी करत आहे, ही चौकशी आम्ही लावली नाही. मात्र चौकशी सुरु झाल्याने घाबरलेल्या विरोधकांनी आमच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. मुंबईत सिमेंट क्रॉंकिटचे रस्ते २० वर्षांपूर्वी करायची गरज होती, तर महापालिकेचे साडेतीन हजार कोटी रुपये वाचले असते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवसेना भाजपचे युती सरकार राज्यात आल्यावर आम्ही विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे, ती पोटदुखी पळवण्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

महापालिकेच्या कायम ठेवी (फिक्स डिपॉझिट) जनतेच्या कामांसाठी असतात, त्या कोणाच्याही कुटुंबियांच्या खासगी ठेवी नाहीत. आमचे सरकार आले तेव्हा ७७ हजार कोटी एफडी होत्या. त्यामध्ये वाढ होऊन त्या आता ८८ हजार कोटी झाल्या आहेत. मात्र विरोधक लोकांची दिशाभूल करत आहेत. गेल्या १५-२० वर्षांत हे पैसे कोठे जात होते याची चौकशी केली जात आहे. दरोडा घालणारे चोरीची भाषा करु लागले आहेत, हा चांगला बदल आहे. सत्य बाहेर येण्याची गरज, सत्याला सामोरे जाण्याची गरज आहे. मोर्चे काढून लोकांना तुम्ही यापुढे फसवू शकणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेनेत दररोज प्रवेश सुरु आहेत. येथे कामाला संधी आहे. कोविड काळात घरी बसून राहिले, केवळ भाषणाने रेशन मिळत नाही. कोविड काळात सर्व घाबरुन घरात बसले होते. ज्यांच्यात हिंमत होती ते रस्त्यावर उतरुन काम करत होते. त्यामध्ये राहुल कनालचा समावेश होता. आपल्यासाठी सर्व जगतात, दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरतो तोच खरा नेता असतो, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content