गेल्या सहा महिन्यांतील मुंबईतील ही तिसरी मोठी व भयंकर आगीची घटना घडली. भांडुप स्टेशनच्या बाहेर फलाटापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ड्रीम मॉलमध्ये भीषण आग लागली. ती विझवायला जवळपास बारा तास लागले. मॉलच्या पहिल्या मजल्यावरील एका बंद दुकानात आग गुरुवारी मध्यरात्रीनंतर भडकली आणि त्याच्या झळा व धूर तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या सनराईज हॉस्पिटलमधील रुग्णांना बसल्या.
या सनराईजला जागावापराचा तात्पुरता परवाना होता. त्याची मुदत ३१ मार्च रोजी संपत होती. खरेतर या मॉलला गेली तीन वर्षे महापालिकेने जागावापराचा परवाना दिलेलाच नव्हता. तिथे रुग्णालय काढायलाही अधिकाऱ्यांची हरकतच होती. पण तुरूंगात असणाऱ्या बिल्डर वाधवाच्या घरातील मुलीच्या मालकीच्या या रुग्णालयाला कोरोना काळातील अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली तातपुरत्या स्वरुपात परवानगी देण्यात आली.
मुळात मॉलमधून बाहेर पडण्यासाठी नीट व्यवस्था नव्हती. म्हणून या रुग्णालयासाठी दोन स्वतंत्र लिफ्ट तसेच स्वतंत्र जिना निर्माण करण्यात आला. पण तीही व्यवस्था भीषण आगीत अपूर्णच ठरली. कारण कोरोनाशी झुंजणाऱ्या बारा वयोवृद्धांना आपले प्राण आगीत गमवावे लागले.
हा मॉल तसा जवळपास बंदच होता. वीस टक्के दुकाने जेमतेम सुरू होती. पण तरीही तिथे ज्वलनशील पदार्थ भरपूर होते. जवळपास एक हजार गॅस सिलेंडर त्या वीस हजार फुटांच्या तीन मजली मॉलमध्ये विविध दुकानांतून सापडले. त्यातील काहींचा विस्फोट झाला की नाही हे आता पुढच्या काही दिवसात आग्निप्रतिबंधक तपासणीनंतर स्पष्ट होईल. इथे एखादी भयंकर दुर्घटना होऊ शकते याची कल्पना प्रशासनाला होती. कारण ड्रीम मॉलमध्ये आग लागल्यास करायच्या उपाययोजनेसाठी आवश्यक अशी उपकरणे, यंत्रणा, जवळपास नव्हतीच. गेल्या ऑक्टोबरमध्येच या मॉलचे फायर ऑडिट केले गेले होते व अनेक त्रुटी नजरेस आलेल्या होत्या.
२२ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यरात्रीनंतर नागपाड्यातील सिटी सेंटर मॉलला अशी भीषण आग लागली होती. ती विझवायला 56 तासांची झुंज फायर ब्रिगेडला द्यावी लागली होती. अग्निशामक दलाचे अडीचशे कर्मचारी आणि तितक्याच संख्येने आगीचे बंब तिथे कामाला लावले गेले होते. ड्रीम मॉल आगीनंतर मुख्यमंत्र्यांनी जसे तातडीचे चौकशांचे व फायर ऑडिटटचे आदेश दिले तसेच सिटी सेंटर आगीच्या दुर्घटनेनंतरही राज्य सरकारने तातडीने अग्निसुरक्षेचे उपाय मॉलमध्ये आहेत की नाही याची तपासणी करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले होते.
पालिकेच्या मुख्य अग्निसुरक्षा अधिकाऱ्यांनी मुंबई शहरातील सर्व मॉलची पाहणी अग्निसुरक्षा या विषयाच्या अनुषंगाने केली. त्यात ज्या 29 मॉलला नोटिसा दिल्या होत्या, सुधारणा करण्याचे आदेश दिले होते, त्यामध्ये काल जळालेल्या भांडुपच्या ड्रीम मॉलचाही समावेश ठळकपणाने झालेला होता.
मुळातच भांडुपचा हा मॉलच गडबड होता. त्याचा मालक पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी एचडीआयएल कंपनीच्या वाधवा बंधुंनीच हा मॉल व त्याच्या बाजूची मोठी कॉलनी बांधलेली आहे. सुरू झाल्यापासून ड्रीम मॉल हे दुःस्वप्नच ठरले होते. सारीच दैन्यावस्था होती. तिथे कधीच पूर्ण क्षमतेने दुकाने सुरू नव्हती. मॉलला वापराचा परवाना नव्हता. तरीही काही दुकाने सुरु होती हे विशेष.
अशा या धोक्याच्या मॉलमध्ये कोविड रुग्णांच्या व्यवस्थेसाठी रुग्णालय सुरू करण्याची परवानगी मुळातच दिली कशी गेली व का दिली गेली हे सवाल आहेत. त्यांचीही उत्तरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना खडसावून घ्यायला हवीत.

2021 या वर्षाच्या सुरूवातीलाच रुग्णालायतील आगीची करूण आणि संतापजनकही घटना आपण पाहिली होती. भंडारा येथील शासकीय रुग्णालयातच अग्निसुरक्षेचे बारा वाजले होते. तिथे नवजात शिशुंना खास देखरेखीखाली ठेवण्याचा जो न्युओनॅटल कक्ष होता तिथे वातानुकूलन यंत्रणा बसवताना हलक्या दर्जाच्या केबल वायरींचा वापर केला गेला होता आणि त्यामुळेच त्या यंत्रणेत आग लागली आणि त्यात जगात धडपणाने येण्याच्या स्थिती नसणारी दहा अजाण नवजात बालके गुदमरून मरून गेली. त्या हत्येची जबाबादारी कोणाची? तसाच प्रश्न ड्रीम मॉलमधील आगीत जीव गमावलेल्यांचे कुटंबीय विचारत आहेत. या मृत्युंना जबाबदार कोण?
बेकायदा जागेत महापालिकेने दिलेल्या तात्पुरत्या परवनागीने सुरू झालेल्या रुग्णालयातील आगीत जे व्हेंटीलेटरवरचे रुग्ण दगावले त्यांची जबाबदारीही कोणाची, हे सरकारला ठरवावे लागेल. एक 78 वर्षांचे वृद्ध गृहस्थ दाखल झाल्यापासून दोन तासात दगावले आणि दुसरे असेच वृद्ध गृहस्थ कोरोना निगेटिव्ह आले होते, त्यांची सुटका काही तासात होणार होती. त्यांनाही जीव गमवावा लागला.
एक वृद्ध दांपत्य, दोघेही कोरोना पझिटिव्ह होते व म्हणून त्यांना त्याच रात्री दहाच्या सुमारास मुलाने दाखल केले. त्यासाठी एक लाख रुपये आकार रुग्णालयाने घेतला होता. त्यांच्या स्पेशल रूममध्ये वृद्ध गृहस्थांना ऑक्सिजन लावला होता. बाईंना फार लक्षणे नव्हती. त्या तिथेच दुसऱ्या कॉटवर होत्या. त्यांनी सांगितले की, खोलीत धूर येऊ लागला म्हणून त्या उठून बाहेर आल्या. सर्वत्र धूर होता पण बाहेर कोणीही कर्मचारी मदतीस येत नव्हता. ऑक्सीजन लावलेल्या गृहस्थांना धड चालवतही नव्हते. त्यांना कसेबसे खेचत बाईंनी अंधाऱ्या पॅसेजमधून बाहेर आणले. अन्य काही लोकांच्या मदतीने त्या कशाबशा आजारी व अशक्त नवऱ्याला घेऊन तळ मजल्यावर पोहोचल्या.
तिथेही मदतीसाठी कोणी येत नव्हते. त्या रस्त्त्यात रडत बसल्या. मुलाला कळवले होते. तो नंतर आला. त्याने धडपड सुरू केली. कुठेही अँब्युलन्स उपलब्ध नव्हती. आठ हजार रुपये भरून त्याने एक रुग्णवाहिका मिळवली व आई-वडिलांना घेऊन तो दुसऱ्या रुग्णालयाचे दरवाजे ठोठवायला निघाला. रात्री कुठेच बेड मिळत नव्हते. अखेरीस ठाणे शहरात पहाटे चारच्या सुमारास त्यांना एका रुग्णालयात जागा मिळाली. रुग्णांची जी अशी ससेहोलपट झाली, जी परवड झाली, त्याचाही जाब सरकारने विचारायला हवा.
ही आग प्रत्यक्षात रुग्णालयात लागली नव्हती. पण ज्या मॉलचा एक भाग, असे हे रुग्णालय होते त्या मॉलमध्येच अग्निसुरक्षेची बोंब होती. ही बाब प्रशासनाला चांगली माहिती असूनही तिथे रुग्णालय सुरू केले गेले. हे सारेच भंयकर आहे. एकूणच आपण अग्निसुरक्षा या विषयाला अजिबातच गांभीर्याने घेत नाही. कोणतीही अशी मोठ्या आगीची घटना होते तेव्हा प्रशासन जागे होते. सरकार धडाधड आदेश देते. थोडे दिवस हालचाली होतात. नंतर सारे पुन्हा येरे माझ्या मागल्या..
भंडाऱ्यातील भीषण अग्निकांडानंतर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट कऱण्याचे आदेश सुटले. पुढे काय झाले? शासकीय बरोबरच खाजगी रुग्णालयांचेही फायर ऑडीट व्हायलाच हवे होते. पण नुसती पाहणी करून व अहवाल तयार करून काय उपयोग? तिथे प्रत्यक्षात अग्निसुरक्षेचे उपाय जागेवर आहेत का? उपकरणे लावली आहेत की नाही? हे कोण बघणार? लक्ष्मीदर्शन हाच केवळ अशा फायर ऑडिटचा हेतू असतो की काय अशी शंका घेणे रास्त ठरावे, अशी स्थिती सर्वत्र आहे.
ठाणे शहरातील एका मुख्य अग्निसुरक्षा अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पकडले गेले होते. त्यांच्यावर मुंबई अग्निशामक दलात असल्यापासूनच आरोप होते. तरीही त्याची नेमणूक ठाण्यातील अग्निशामक दलातील महत्त्वाच्या व मुख्य पदावर का व कशासाठी केली गेली? हाही सवाल आहे. ठाणे शहरातही रुग्णालयाला आणि हॉटेलांना आधी लागल्यांच्या भीषण घटना घडल्यानंतर अशाच प्रकारे तपासणीचे आदेश सुटले. त्यात या मुख्य अग्निसुरक्षा अधिकाऱ्यांनी भरपूर हात धुऊन घेतले अशा तक्रारी आहेत. तीच गत मुंबईतही नाही ना हेही तपासून पाहायला हवे.