Homeटॉप स्टोरीपंढरीच्या आषाढी वारीसाठी...

पंढरीच्या आषाढी वारीसाठी टोल माफ!

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश देतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणा केली.

पंढरीच्या आषाढीच्या वारीच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, अक्षय महाराज भोसले तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी वरिष्ठ अधिकारी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत पाचवरून दहा कोटींची आणि ग्रामपंचायतींकरिता पंचवीसवरून पन्नास लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद केली आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे. त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

वारी मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना देण्यात येणारा निधी दुप्पट केला आहे, तत्काळ वितरीत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंढरपूर आणि परिसरातील रस्ते वारीसाठी सुस्थितीत व्हावेत यासाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून होणारी कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत यासाठी मंत्रालयीन स्तरावरील नगर विकास विभागाच्या उपसचिवांनी प्रत्यक्ष पंढरपूर आणि क्षेत्रीय स्तरावर पोहोचून देखरेख व संनियत्रण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पालख्यांच्या प्रस्थानापूर्वीच वारीसाठीची सर्व सज्जता ठेवा. यंदा वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वारी मार्गावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष नियोजन करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, असे चोख नियोजन करा. विभागातील आजुबाजुच्या महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या यंत्रणाचीही मदत घ्या. वारी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे तंबू-निवारे उभे राहतील, पंखे आणि सावली याकरिता काळजी घ्या. वैद्यकीय पथके त्यातील तज्ज्ञ आणि रुग्णवाहिका यांचीही सज्जता ठेवा. औषधे, पिण्याचे पाणी, अन्य आरोग्य सुविधा याबाबत वेळीच नियोजन करा. पंढरपूरमधील रस्त्यांसाठी निधी दिला आहे. त्यातून पंढरपूर नगरपालिका आणि आजुबाजुच्या रस्त्यांचे डांबरीकरण करा. त्यामध्ये नगरपालिकेचा रस्ता, ग्रामपंचायतीचा रस्ता असे हद्दीच्या विषयातून रस्त्यांची कामे मागे ठेवू नका. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर चिखल किंवा राडा-रोडी दिसता कामा नये याची दक्षता घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालखी मार्गासह वारीत येणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत विशेष व्यवस्था करा. वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल द्यावा लागू नये यासाठी पोलीस विभागाने स्टीकर्स किंवा पासेसच्या माध्यमतून कार्यवाही करावी. टोल नाक्यांवर विशेष व्यवस्था करून, वारकऱ्यांना टोल द्यावा लागू नये असे नियोजन करावे. पालखी मार्गावरील टोल नाके सुरू होणार नाहीत. त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

जी-२०चे प्रतिनिधी मंडळ अनुभवणार वारी..

जी-२० चे प्रतिनिधी मंडळ आषाढी वारीच्या काळात पुण्यात येणार आहे. त्यांना पंढरपूरची वारी आणि त्या अनुषंगाने या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या प्रतिनिधींना आपल्या संस्कृतीतील या वैशिष्ट्यपूर्ण अशा वारीचे दर्शन घडवा, त्यासाठी उत्तम नियोजन करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content