पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, रविवारी राजधानी दिल्लीतल्या नवीन संसद भवनाचे लोकार्पण केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या नव्या संसद भवनाचे दहा डिसेंबर 2020 रोजी भूमिपूजन केले होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभा तसेच राज्यसभेतल्या सदस्यांनी नव्या संसद भवनासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरला होता. त्यानंतर दहा डिसेंबर 2020 रोजी या वास्तूचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले. चार मजल्यांच्या या इमारतीत 1224 खासदारांना बसता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

सध्या अस्तित्त्वात असलेल्या जुन्या संसद भवनापेक्षा नवीन संसद भवन तब्बल 1700 चौरस मीटर मोठे आहे. एकूण 64 हजार 500 चौरस मीटर जागेत नवीन संसद भवन उभारण्यात आले आहे. त्यात सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. नव्या संसद भवनात कडेकोट सुरक्षाव्यवस्था असणार आहे. यात मार्शलना नवा ड्रेसकोड असेल.

जुन्या संसद भवनात लोकसभेचे 550 तर राज्यसभेचे 250 सदस्यांना बसण्याची व्यवस्था आहे. नव्या संसद भवनात लोकसभेचे 888 तर राज्यसभेचे 384 सदस्य बसू शकतील. याशिवाय संसद सदस्यांसाठी लाऊंज, पुस्तकालय, भोजन क्षेत्र, पुरेशी पार्किंग व्यवस्था अशा सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. या नव्या संसद भवनाच्या बांधकामावर साधारण बाराशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. याचे बांधकाम टाटा प्रोजेक्ट कंपनीने सप्टेंबर 2020मध्ये सुरू केले. त्यावेळी या बांधकामाचा खर्च 861 कोटी रुपये अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्ष कामकाजात काही अतिरिक्त कामे करण्यात आली. त्यामुळे हा खर्च 1200 कोटी रुपयापर्यंत पोहोचला.





