महाराष्ट्रात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या म्हणजेच ईएसआयसीच्या माध्यमातून एमआयडीसीच्या जागेत सात रुग्णालयांची उभारणी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे कामगारांसाठी 1000पेक्षा जास्त खाटांची व्यवस्था होऊ शकेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांना दिली.
केंद्रीय श्रम मंत्री भूपेंद्र यादव आज मुंबईत होते. त्यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत एमआयडीसीच्या जागेत ईएसआयसीच्या माध्यमातून सात रुग्णालय उभारण्याचा निर्णय झाला. यासाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करायची आहे. यापैकी तीन जागा निश्चित करण्यात आल्या. उरलेल्या चार जागा एका महिन्याच्या आत निश्चित केल्या जातील, असे ते म्हणाले.
खासदार मनोज कोटक यांनी मुलुंडमध्ये असलेल्या जागेत एक रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे अशी विनंती यादव यांना केली. त्यावर त्याला मंत्रीमहोदयांनी मान्यता दिली. याबाबत लवकरच निर्णय केला जाईल. ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून असंघटित कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामध्ये टॅक्सीचालकांपासून डबेवाल्यांपर्यंत साधारणतः 400 कॅटेगरी निर्माण करण्यात आल्या आहेत. या सर्वांना केंद्र आणि राज्य सरकार यांच्या समन्वयातून सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

येत्या 31 तारखेला यादव यांच्याबरोबर सीआरझेड २मध्ये येणाऱ्या आणि सध्या रखडलेल्या एसआरए योजना कशा चालू करता येतील यावर निर्णय घेतला जाईल. यादव हे वनमंत्रीही आहेत. याच बैठकीत वेस्टन घाटची हद्द निश्चित करून त्यात येणाऱ्या एमआयडीसीच्या जागांना सूट देण्याबाबत विचार केला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘ई-श्रम कार्ड’साठी कॅम्प आयोजित करावेत – भूपेंद्र यादव
केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र शासन विविध योजना राबवत आहे. यासाठी ई-श्रम कार्ड अत्यंत महत्त्वाचे असून ते उपलब्ध करून देण्यासाठी कॅम्प लावण्यात यावेत. स्वनिधी योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अटल पेन्शन योजना यांसारख्या योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रामुख्याने राबविण्यात येत आहेत.
‘ई-श्रम’ कार्ड
केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. नोंदणी अंतर्गत असंघटित कामगारांना खाते क्रमांक (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) दिला जातो. ‘ई-श्रम’ कार्डच्या रुपाने असंघटित कामगारांना ओळख मिळत आहे. असंघटित कामगार, फेरीवाले, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती यांना याचा लाभ होत आहे.

