राज्यातील महाविकास आघाडीमध्ये चाललेली धुसफूस दिवसेंदिवस विकोपाला जात असल्याचे चित्र आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आता तर शरद पवार यांचे कट्टर पाठीराखे म्हणून ओळखले जाणारे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या मुखपत्रात थेट पवारांवर निशाणा साधला आणि त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राऊत यांना खडे बोल सुनावले. एकीकडे या गोष्टी होत असतानाच उद्धव ठाकरे गटाकडून तसेच राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांना पक्षात घेतले जात असल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी आपल्या मुखपत्रात शरद पवारांवर टीका केली. शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा पवार यांनी करताच जास्त खळबळ त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस. त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्त्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच असल्याचेही त्यांनी या अग्रलेखात म्हटले आहे.

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचाही भाजपाचा प्लॅन होता. लोक बॅगा भरून तयारच होते आणि येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, शरद पवारांच्या खेळीने भाजपाचा प्लॅन कचऱ्याच्या टोपलीत गेला, असेही यात म्हटले आहे.
या अग्रलेखातील भाष्याबद्दल सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी अजूनही हा अग्रलेख आपल्या वाचनात आला नसल्याचे सांगितले. या मुखपत्राचे संपादक महाविकास आघाडीचे नेते असल्यामुळे ते पूर्ण माहिती घेऊन मगच देतील तसेच महाविकास आघाडीला पोषक अशीच भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र या विषयावरून संजय राऊत यांना खडे बोल सुनावले. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे त्यांना वाटते का असा सवाल त्यांनी केला. शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाष्य केले असले तरी ठाकरे यांनी यावर संयमित प्रतिक्रिया दिली आहे. अशा वेळेला शरद पवार यांच्या राजीनामाचा विषय राऊतांनी का उकरून काढावा, असा सवाल त्यांनी केला. शरद पवार हे फार प्रगल्भ नेते आहेत. संजय राऊत यांचे वय जेवढे आहे त्यापेक्षा जास्त त्यांचा राजकीय अनुभव आहे. तेव्हा आपण काय लिहितो याचे भान त्यांनी पाळले पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.
लोक माझे सांगाती या आत्मचरित्रपर पुस्तकात शरद पवार यांनी, मंत्रालयात दोन दिवस जाणारे तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करताना ही बाब आपल्याला पचनी पडली नसल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर त्यांच्या पक्षातून इतका विरोध होईल याची कल्पना आपल्याला नव्हती असे म्हणत पवार यांनी उद्धव ठाकरे कोणताही प्रतिकार न करता आपल्या पदाचा राजीनामा देतील याबद्दलही पवार यांनी नापसंती व्यक्त केली आहे.

शरद पवार यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. तीन दिवसानंतर त्यांनी राजीनामा परत घेतला. त्यानंतर आज संजय राऊत यांनी आपल्या मुखपत्राच्या अग्रलेखात पवार यांच्यावर टीका केली.
भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही या निमित्ताने महाविकास आघाडी पुढच्या निवडणुकीपर्यंत टिकणार नाही, असे सांगितले. भाजपा नेते प्रवीण दरेकर यावर बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची पावले आता राष्ट्रवादीच्या विरोधात पडू लागली आहेत. त्यांचा आता राष्ट्रवादीवर विश्वास राहिलेला नाही, हेच यातून दिसून येते.
दरम्यान काल महाड येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तर आज सोलापूरच्या दौऱ्यात तेथील काही काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावरून फार संतप्त झाले.
नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतलेले आमचे उमेदवार परत करावेत अशी मागणी त्यांनी केली. स्नेहल जगताप यांनी आपल्या पक्षात घेऊ नये, असे ठाकरेंना सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी ऐकले नाही. तुम्ही महाविकास आघाडीतल्या घटकपक्षाला कमकुवत करत असाल तर ते योग्य नाही. आपण ही बाब महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडणार आहोत. तसेच महाडची ही जागा काँग्रेसच लढवेल, असेही पटोले म्हणाले.

