केंद्र शासनाच्या आदेशानुसार ‘कोविड-१९’ लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवार, दि. ०१ मार्च २०२१पासून देशभरात सुरू होत आहे. या टप्प्यात वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच वयाची ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (comorbidity) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जाणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या खासगी इस्पितळातील लसीकरण केंद्रात लसीकरण केवळ त्याच इस्पितळातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहील. राज्य शासनाकडून या संदर्भात धोरण निश्चित झाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे मुंबई महानगरपालिकेनेच स्पष्ट केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जी खासगी इस्पितळे ‘जन आरोग्य विमा योजना’, केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असतील अशा खासगी इस्पितळांमध्ये ६० वर्षे वय पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील सह-व्याधी असलेल्या नागरिक यांचे लसीकरण १ मार्चपासून सशुल्क पद्धतीने करण्यात येईल. संपूर्ण कोट्यवधींच्या मुंबईत सध्या फक्त तीनच खाजगी रूग्णालयांमध्ये कोविड-१९ची लस देण्यात येणार आहे, असे मुंबई महापालिकेनेच जाहीर केले आहे. मुंबई महापालिकेच्या फक्त पाचच केंद्रांवर आज लसीकरण होणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
सदर खासगी इस्पितळांची नावे खालीलप्रमाणे :-
१. एच. जे. दोशी हिंदू सभा रुग्णालय, घाटकोपर
२. के. जे. सोमय्या वैद्यकीय महाविदयालय, शीव
३. एस. आर. सी. सी. चिल्ड्रन रुग्णालय, महालक्ष्मी
वरील तपशिलानुसार संबंधित वर्गवारीत समाविष्ट असणाऱ्या नागरिकांनी ‘कोविन डिजिटल’ मंचावर (Android App) नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी आगाऊ नोंदणी करता येऊ शकेल किंवा लसीकरण केंद्रातही लसीकरणापूर्वी नोंदणी करता येऊ शकेल.
केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाचा तिसरा टप्पा महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही राबविण्यात येणार आहे. खासगी इस्पितळांपैकी ज्या इस्पितळांमध्ये ‘जन आरोग्य योजना’ वा केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबविण्यात येत आहेत, अशा खासगी इस्पितळांना या लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारीतील निर्धारित रुग्णालयांमध्ये लसीकरण विनामूल्य असून खासगी इस्पितळात लसीकरणासाठी प्रत्येक मात्रेसाठी कमाल रुपये २५० एवढे शुल्क आकारले जाणार आहे.
मुंबईत केंद्र शासनाची ‘जन आरोग्य योजना’ राबविण्यात येणाऱ्या, तसेच केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५३ खासगी इस्पितळांची यादी तयार करण्यात आली आहे. सदर रुग्णालयांमध्ये शासकीय नियमांनुसार पुरेशी जागा, मनुष्यबळ तसेच लसीकरणामुळे होणारे संभाव्य विपरीत परिणाम, व्यवस्थापन इत्यादींसाठी सुविधा उपलब्धता या बाबींचे सर्वेक्षण करुन लसीकरण केंद्र म्हणून निवड करण्यात येईल. त्यानंतर टप्याटप्याने सदर केंद्रांमध्ये लसीकरण सुरू करण्यात येईल.
आजपासून मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील कोविड लसीकरण केंद्रात तिसरा टप्प्यातील विनामूल्य लसीकरण सुरू करण्यात आला आहे.
१. बी.के.सी. जंबो रुग्णालय, वांद्रे
२. मुलुंड जंबो कोविड रुग्णालय, मुलुंड
३. नेस्को जंबो कोविड रुग्णालय, गोरेगाव
४. सेवन हिल्स रुग्णालय, अंधेरी
५. दहीसर जंबो रुग्णालय, दहीसर
महानगरपालिकेच्या अखत्यारीतील इतर १९ लसीकरण केंद्रांमध्ये उद्या, दि. ०२ मार्च २०२१पासून तिसऱ्या टप्प्यातील विनामूल्य लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
नोंदणी करताना नागरिकांनी आपली जन्मतारीख व इतर तपशील काळजीपूर्वक नमूद करावा. हा तपशील आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा निर्धारित केलेल्या शासकीय कागदपत्रातील तपशिलानुसार असणे आवश्यक आहे. तसेच लसीकरणाच्या वेळी सदर कागदपत्रे नागरिकांनी आठवणीने सोबत न्यावीत, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
सहआजार असलेल्या नागरिकांनी नोंदणीकृत वैदयकीय सेवा देणाऱ्या व्यवसायिकांकडून प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्रात दाखविणे आवश्यक आहे. तर ६० वर्षांवरील नागरिकांनी वयाबाबतचा योग्य पुरावा (कार्यालयीन, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र इ.) सादर करणे आवश्यक आहे.
अद्याप नोंदणी न झालेले आरोग्य कर्मचारी व कोविड आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांचे लसीकरण झाले नसल्यास त्यांनी लसीकरण केंद्रात जाऊन आपले ओळखपत्र (कार्यालयीन, आधारकार्ड, पॅनकार्ड) लसीकरण केंद्रात सादर करुन आपले लसीकरण करुन घेऊ शकतात.
भारत सरकारच्या निर्देशानुसार ‘Co-win Digital Platform’ हा दि. १ मार्च २०२१ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून खुला करण्यात आला आहे. त्यानंतर वरीलनुसार संबंधित वर्गवारीत असणाऱ्या नागरिकांना स्वत: नोंदणी करता येईल. कोविन पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया सुरळीत होईपर्यत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहनही मुंबई महापालिकेने केले आहे.

