Homeडेली पल्समेरे प्यारे देशवासियों...

मेरे प्यारे देशवासियों…

मेरे प्यारे देशवासियों… म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाचा शंभरावा भाग सादर केला. यावेळी त्यांनी साधलेल्या संवादाचा हा गोषवारा…

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज मन की बातचा शंभरावा भाग आहे. मला आपल्या सर्वांची हजारो पत्रं मिळाली आहेत, लाखो संदेश आले आहेत. आपली पत्रं वाचताना मी कित्येकदा तर अतिशय भावनावश झालो आणि स्वतःला पुन्हा सावरलं. आपण माझं मन की बातच्या शंभराव्या भागासाठी अभिनंदन केलं आहे. परंतु वास्तविक अभिनंदनास पात्र तर आपण सर्व श्रोते आहात.

मित्रांनो, ३ ऑक्टोबर २०१४ या दिवशी विजयादशमीचं ते पर्व होतं आणि आम्ही सर्वानी मिळून मन की बातचा प्रवास सुरू केला. विजया दशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय  साजरा करण्याचं पर्व. मन की बातसुद्धा देशवासियांच्या भलेपणाचं, सकारात्मकतेचं एक आगळंवेगळं पर्व बनली आहे. यात आम्ही सकारात्मकता साजरी करतो. प्रत्येक भाग अगदी खास होता. प्रत्येक वेळेस, उदाहरणांचं नाविन्य, देशवासियांच्या यशस्वीतेचा विस्तार होता. मन की बात कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जोडले गेले. ज्या विषयाशी लोक  जोडले गेले, तो लोक आंदोलनाचा विषय झाला. जेव्हा मी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी मन की बात सामायिक केली, तेव्हा याची चर्चा संपूर्ण जगभरात झाली.

मित्रांनो, मन की बात तर माझ्यासाठी दुसऱ्यांच्या गुणांची पूजा करण्यासारखीच आहे. माझे एक मार्गदर्शक होते- लक्ष्मणराव इनामदार. आम्ही त्यांना वकीलसाहेब म्हणत असू. ते नेहमी असं म्हणत की, कुणीही दुसऱ्यांच्या गुणांची पूजा केली पाहिजे. समोर कुणीही असो, आपला साथीदार असो की आपला विरोधी गटातील असो, त्याचे चांगले गुण जाणण्याची, त्यांच्यापासून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या या शिकवणीने नेहमीच मला प्रेरणा दिली आहे.

मला आठवतं की, जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा स्वाभाविकपणेच सामान्यजनांशी भेटणं आणि त्यांच्याशी चर्चा करणं होतच होतं. मुख्यमंत्रीपदाचं कामकाज आणि कार्यकाल  असा असतो की लोकांना भेटण्याची खूप संधी मिळत असते. पण २०१४मध्ये जेव्हा दिल्लीत आलो, तेव्हा मला असं आढळलं की, येथील जीवन तर खूपच वेगळं आहे. कामाचं स्वरूप वेगळं आहे. जबाबदारी वेगळी आहे आणि स्थिती, परिस्थितीची बंधने, सुरक्षेचा बंदोबस्त, वेळेची मर्यादा… सारं काही वेगळं आहे. सुरूवातीच्या दिवसात, काही वेगळेपण जाणवत होतं. काहीतरी रितेपण वाटत होतं. पन्नास वर्षांपूर्वी मी यासाठी माझे घर सोडलं नव्हतं की आपल्याच देशवासियांशी संपर्क अवघड व्हावा. मन की बात ने मला या आव्हानावर उपाय दिला. पदभार आणि शिष्टाचार शासकीय व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला आणि लोकभावना, कोटी कोटी भारतीयांसोबत माझ्या भावविश्वाचं अतूट भाग बनून गेला.

मन की बात स्वपासून ते समष्टीपर्यंतचा प्रवास आहे. मन की बात अहंपासून ते वयमपर्यंतचा प्रवास आहे. हा मी नाही तर तूही याची संस्कारसाधना आहे. आज मागचे कितीतरी भाग, पुन्हा डोळ्यासमोर येत आहेत. देशवासियांच्या या प्रयत्नांमुळे मला सातत्यानं स्वतःला कार्यरत राहण्याची प्रेरणा दिली आहे. मित्रांनो, मन की बात कार्यक्रमात मी ज्या लोकांचा उल्लेख करतो, ते सर्व आमचे हिरो आहेते, ज्यांनी या कार्यक्रमाला जिवंत बनवलं आहे. आज जेव्हा आम्ही १००व्या भागाच्या मुक्कामापर्यंत पोहोचलो आहोत, माझी इच्छा आहे की पुन्हा एकदा आम्ही त्या सर्व नायकांकडे जाऊन त्यांच्या प्रवासाबाबत जाणून घ्यावं.

देशवासियों

मित्रांनो, मला या गोष्टीचा इतका आनंद आहे की मन की बातमधून आम्ही देशातील स्त्री शक्तीच्या शेकडो प्रेरणादायक कहाण्यांचा उल्लेख केला आहे. मग त्यात आमचं सैन्य असो की मग क्रीडा जगत असो. जेव्हा मी महिलांच्या यशाबद्दल उल्लेख केला, त्यांची खूप प्रशंसा केली गेली आहे. मन की बात कार्यक्रम त्यांच्या प्रयत्नांना समोर आणण्याचा मंच बनला आहे. मित्रांनो, आमच्या देशात कितीतरी असे प्रतिभाशाली लोक आहेत, की जे आपल्या मेहनतीच्या जोरावर शिखऱस्थानावर पोहोचले आहेत. मन की बात कार्यक्रमच त्या सर्वांच्या उत्पादनांना सर्वांसमोर आणण्याचं एक साधन बनलां होता. आम्ही मेक इन इंडियाच्या अनेक उदाहरणांपासून ते अंतराळ स्टार्ट अप्सपर्यंतची चर्चा मन की बात कार्यक्रमात केली आहे.

मित्रांनो, मन की बातची अजून एक विशेषतः आहे. ‘मन की बात’च्या माध्यमातून अनेक लोकचळवळी जन्माला आल्या तसेच त्यांना गतीदेखील प्राप्त झाली. आपल्या खेळण्यांच्या उद्योगाला पुनरुस्थापित करण्याचे मिशन ‘मन की बात’पासूनच तर सुरू झाले होते. भारतीय प्रजातीचे श्वान, आपल्या देशी श्वानांबद्द्ल जागरुकता निर्माण करण्याच्या कामाची सुरुवात देखील ‘मन की बात’ पासूनच झाली होती. आपण आणखी एक मोहीम सुरु केली होती, गरीब लहान दुकानदारांसोबत घासाघीस करणार नाही, भांडण करणार नाही. जेव्हा ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरु झाली, तेव्हादेखील देशवासियांना या मोहिमेशी जोडण्यात ‘मन की बात’ने महत्त्वाची भूमिका पार पाडली.

मित्रांनो, देशात पर्यटनाचा विकास वेगाने होत आहे. नद्या, पर्वत, तलाव हे आपले नैसर्गिक स्रोत असोत किंवा मग आपली तीर्थस्थाने असोत त्यांना स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. पर्यटन उद्योगाला याची खूप मदत होईल. पर्यटनात आम्ही स्वच्छतेसोबतच अतुल्य भारत चळवळीविषयीदेखील अनेकदा चर्चा केली आहे. या चळवळीमुळे लोकांना पहिल्यांदाच त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या अशा अनेक ठिकाणांची माहिती झाली. मी नेहमी म्हणतो की परदेशात पर्यटनाला जाण्यापूर्वी आपण आपल्या देशातील किमान 15 पर्यटनस्थळांना भेट दिली पाहिजे आणि ही स्थळे तुम्ही राहता त्या राज्यातील नसावीत, दुसऱ्या राज्यातील असली पाहिजे. आज ज्या पर्यावरणाच्या प्रश्नावर संपूर्ण जग चिंतेत असताना तो सोडवण्यासाठी ‘मन की बात’चा हा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे.

मित्रांनो, यावेळी मला युनेस्को चे महासंचालक औद्रे ऑजुले यांनी ‘मन की बात’विषयी एक विशेष संदेश पाठवला आहे. 100 भागांच्या या अद्भुत प्रवासासाठी त्यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी काही प्रश्नही विचारले आहेत. मित्रांनो, युनेस्कोच्या महासंचालकांना शिक्षण आणि सांस्कृतिक संरक्षणा संदर्भातील भारताच्या प्रयत्नांबद्दल जाणून घ्यायचे आहे. हे दोन्ही विषय ‘मन की बात’चे आवडते विषय आहेत. शिक्षण असो वा संस्कृती, तिचे जतन असो वा संवर्धन असो, ही भारताची प्राचीन परंपरा आहे. आज देश या दिशेने जे कार्य करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असो किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षणाचा पर्याय असो, शिक्षणात तंत्रज्ञानाचा समावेश असो, असे अनेक प्रयत्न तुम्हाला दिसतील.काही वर्षांपूर्वीगुजरातमध्ये, उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘गुणोत्सव आणि शाला प्रवेशोत्सव’ यासारखे कार्यक्रम हे लोकसहभागाचे एक अद्भुत उदाहरण म्हणून स्थापित झाले होते. शिक्षणासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या अनेक लोकांच्या प्रयत्नांवर आम्ही ‘मन की बात’मध्ये प्रकाशझोत टाकला आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या उपनिषदातील एक मंत्र शतकानुशतके आपल्या मनाला प्रेरणा देत आहे.

चरैवेति चरैवेति चरैवेति|

चालत राहा.. चालत राहा.. चालत राहा..

याच भावनेने आज आम्ही ‘मन की बात’चा 100 वा भाग पूर्ण करत आहोत. भारताची सामाजिक जडणघडण मजबूत करण्यामध्ये, ‘मन की बात’ हा माळेतील उभ्या आडव्या धाग्यासारखा आहे जो प्रत्येक मणी एकत्र गुंफून ठेवण्यात मदत करतो. प्रत्येक भागात देशवासियांची सेवा आणि शक्ती इतरांना प्रेरणा देत आहे. एकप्रकारे, मन की बातचा प्रत्येक भाग पुढच्या भागासाठी पार्श्वभूमी तयार करतो. ‘मन की बात’ नेहमीच सद्भावना, सेवाभावनेने आणि कर्तव्यभावनेने पुढे गेली आहे. हीच सकारात्मकता स्वातंत्र्याच्या काळात देशाला पुढे नेईल, एका नव्या उंचीवर नेईल आणि मला आनंद आहे की ‘मन की बात’ची जी सुरुवात झाली होती ती आज देशात एक नवीन परंपरा बनत आहे. भारतातील लोक, भारतावर विश्वास ठेवणारे लोक ज्यांनी ‘मन की बात’चे हे धनुष्य लीलया पेलले आहे. हे सर्व केवळ तुमची प्रेरणा आणि शक्तीमुळेच शक्य झाले आहे.

मित्रांनो, आज मला इतकं काही सांगायचं आहे की, वेळ आणि शब्द दोन्ही कमी पडत आहेत. पण मला खात्री आहे की तुम्ही सर्व माझ्या भावना समजून घ्याल. ‘मन की बात’च्या माध्यमातून मी तुमच्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच तुमच्यामध्ये राहिलो आहे, राहणार आहे. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. पुन्हा नवीन विषय आणि नवीन माहिती घेऊन देशवासियांच्या यशाचा आनंद साजरा करूया. तोपर्यंत मला निरोप द्या. खूप खूप धन्यवाद!

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content