Homeटॉप स्टोरीसंजय राऊतांचे बोलविते...

संजय राऊतांचे बोलविते धनी दस्तुरखुद्द शरद पवार?

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी त्यांच्या एकूण हालचाली पाहता ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्याचबरोबर अजितदादांना राष्ट्रवादीमध्ये थोपवून धरण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दादांबाबत घेतलेल्या भूमिकेमागचे बोलविते धनी दुसरेतिसरे कोणी नसून दस्तूरखुद्द शरद पवारच असल्याच्या चर्चेला सध्या ऊत आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या वक्तव्यांमधून भाजपाला बळ मिळत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीच्या विषयावर भाष्य करताना अजितदादांनी, यावर आता चर्चा करण्यात काय अर्थ आहे, असे सुनावले. जगभरामध्ये त्यांनी भाजपाला नेले. आता त्यांच्या डिग्रीचा प्रश्न उपस्थित करण्याने काय मिळणार आहे, असा सवाल त्यांनी केला. मधल्या काळात एके दिवशी ते दिवसभर नॉट रिचेबल राहिले. याआधी ते एका जाहीर कार्यक्रमातून निघून गेले होते. त्यामुळेही अजित पवार चर्चेत आले होते. त्यानंतर खुलासा करताना अजितदादा म्हणाले की, मला ऍसिडिटीचा त्रास झाला होता. त्यामुळे मी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतले आणि घरी विश्रांती घेतली.

चार दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे व संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या सिल्व्हर ओक, या निवासस्थानी भेटले. तेथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत चौघांमध्ये दीड तास चर्चा झाली. त्यानंतर राऊत यांनी या चर्चेचा हवाला देत राष्ट्रवादीमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा दावा केला. आपल्या कुटुंबावर पक्ष सोडण्यासाठी दबाव येत आहे. मात्र, तसा निर्णय कोणी घेतला तर तो त्यांचा वैयक्तिक असेल. पक्ष म्हणून राष्ट्रवादी भाजपाबरोबर जाणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बैठकीत सांगितल्याचे संजय राऊत यांनी आपल्या लेखात लिहिले. माध्यमांसमोरही त्याचे समर्थन केले. मात्र, बंद दाराआड झालेली ही चर्चा सार्वजनिक झाल्यानंतरही त्यावर मौन पाळले.

त्यामुळे अजितदादांची पावले भाजपाच्या दिशेने पडत असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यानंतर अजित पवार यांनी आपले पुण्यातले दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द केले. यामध्ये सासवड येथील एका शेतकरी आणि युवा मेळाव्याचाही समावेश होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या मेळाव्याला उपस्थित राहणार होते. दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे निक्षून सांगितले. माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या वावड्या असल्याचे ते म्हणाले.

पवार

यावेळी बालताना अजितदादांनी संजय राऊतांना खडे बोल सुनावले. काही प्रवक्ते त्यांच्या पक्षाबद्दल बोलण्याऐवजी आमच्या पक्षाचे प्रवक्ते बनले आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावे. मुखपत्रात काय लिहितो हे बघावे. आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आमचे वकीलपत्र कोणी घेण्याची गरज नाही, असे ते म्हणाल. त्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी आपण कोणाच्या बापाला घाबरत नसल्याचे सांगितले. आपण फक्त शरद पवारांचे ऐकतो. अजित पवार मला सांगू शकत नाही, असे सांगितले. यावरही शरद पवारांनी काही भाष्य केले नाही. त्यामुळे अजित पवार यांना तूर्तास थोपविताना शरद पवारांनी संजय राऊत यांना हाताशी धरल्याचे बोलले जाते.

एकीकडे या घडामोडी होत असतानाच काल अजित पवार यांच्या देवगिरी, या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ तसेच दिलीप वळसे पाटील दाखल झाले. त्यापाठोपाठ सुनील तटकरे तेथे पोहोचले. भुजबळ तसेच वळसे पाटील हे शरद पवारांचे नजीकचे सहकारी मानले जातात. त्याचवेळी तटकरे हे पूर्वीचे अजितदादांचे व आताचे शरद पवारांचे विश्वासू समजले जातात. या नेत्यांकडून साधारणतः दीड ते दोन तास अजित पवार यांची समजूत काढण्याचे काम चालू होते, असे सूत्रांनी सांगितले.

त्याचवेळी शरद पवार राष्ट्रवादीच्या विविध आमदारांशी संपर्क साधून अजित पवार यांच्या बंडाला साथ मिळणार नाही याची खातरजमा करून घेत होते. सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी पक्षाचे विधानसभेतील प्रतोद नितीन पवार यांना आपल्या सिल्वर ओक, या निवासस्थानी बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा झाल्यावर तेथून निघालेले नितीन पवार अजितदादांच्या बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी दादांशीही चर्चा केल्याचे कळते.

आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीतली गटबाजी पुढे आली. उद्या राष्ट्रवादीचा मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे. याकरीता शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, अदिती तटकरे आदी नेत्यांची नावे कार्यक्रमपत्रिकेवर टाकण्यात आली आहे. मात्र, यातून अजितदादांना वगळण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादीकडून कोणीही काही बोललेले नाही. मात्र, यावर कोणतेही भाष्य न करता अजितदादा पुण्याकडे रवाना झाले आहेत. उद्या पिंपरीत त्यांचे काही कार्यक्रम आहेत. तेथे ते उपस्थित राहणार असल्याचे समजते.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content