Homeटॉप स्टोरीअजितदादांच्या भाजपा प्रवेशाबद्दलचे...

अजितदादांच्या भाजपा प्रवेशाबद्दलचे गूढ वाढले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हालचालींचे गूढ वाढत असून यामुळे त्यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशाची शक्यता वाढल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या वक्तव्यांमधून भाजपाला बळ मिळत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा विषय दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काढला. ठाकरे गटाच्या नेत्यांनी या विषयाला उचलून धरले. काँग्रेसने हा मुद्दा चर्चेत आणला. मात्र त्यावर भाष्य करताना अजितदादांनी, यावर आता चर्चा करण्यात काय अर्थ आहे, असे सुनावले. 2014 साली भारतीय जनता पार्टीला सत्तेत घेऊन येणारे एकमेव नेते नरेंद्र मोदी आहेत. जगभरामध्ये त्यांनी भाजपाला नेले. आता त्यांच्या डिग्रीचा प्रश्न उपस्थित करण्याने काय मिळणार आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मधल्या काळात एके दिवशी ते दिवसभर नॉट रिचेबल राहिले. याआधी ते एका जाहीर कार्यक्रमातून निघून गेले होते. त्यामुळेही अजित पवार चर्चेत आले होते. त्यानंतर खुलासा करताना अजितदादा म्हणाले की, मला ऍसिडिटीचा त्रास झाला होता. त्यामुळे मी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतले आणि घरी विश्रांती घेतली. माध्यमाने मात्र आपण नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या रंगवल्या.

चार दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे व संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या सिल्व्हर ओक, या निवासस्थानी भेटले. तेथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत चौघांमध्ये दीड तास चर्चा झाली. त्यानंतर राऊत यांनी या चर्चेचा हवाला देत राष्ट्रवादीमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा दावा केला. पवार म्हणाले की, आपल्या कुटुंबावर पक्ष सोडण्यासाठी दबाव येत आहे. मात्र, तसा निर्णय कोणी घेतला तर तो वैयक्तिक असेल. राष्ट्रवादी भाजपाबरोबर जाणार नाही, असे राऊत म्हणाले. त्यावरूनही अजितदादांची पावले भाजपाच्या दिशेने पडत असल्याचे बोलले जाऊ लागले.

आजही अजित पवार यांनी आपले पुण्यातले दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द केले. यामध्ये सासवड येथील एका शेतकरी आणि युवा मेळाव्याचाही समावेश होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या मेळाव्याला उपस्थित राहणार होते. अजितदादा मात्र तिथे फिरकलेच नाहीत. योगायोगाने म्हणा किंवा राजकीय हालचालींचा एक भाग म्हणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आज तातडीने राजधानी दिल्लीला रवाना झाले. शनिवार संध्याकाळपासून रविवारी संध्याकाळपर्यंत भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत होते. या दौऱ्यात त्यांनी भाजपाच्या राज्यातल्या कोअर कमिटीची बैठकही घेतली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी या दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आल्यामुळे पुन्हा अजितदादांबद्दलची चर्चा गडद झाली.

एकीकडे या घडामोडी घडत असतानाच अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण केले. खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. 18 एप्रिल 2023 रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी, असे पवार म्हणाले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content