Homeटॉप स्टोरीआता मंत्रालयात दिलेल्या...

आता मंत्रालयात दिलेल्या पत्रांचा ठावठिकाणा कळणार मोबाईलवरच!

येत्या महाराष्ट्र दिनापासून मंत्रालयात आपल्या पत्रांचा पाठपुरावा करण्यासाठी चपला झिजवणाऱ्या अभ्यागतांना मंत्रालयातल्या त्यांच्या पत्रांचा ठावठिकाणा मोबाईलवरच मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री वा अधिकारी यांना पत्र देण्यासाठी तसेच त्यांचा पाठपुरावा करण्याकरीता दररोज हजारो लोक मंत्रालयात येत असतात. यामुळे मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. दैनंदिन कामात अडथळा येतो. तो रोखण्यासाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सेंट्रल रजिस्ट्री युनिट उभारले जात आहे. याद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून ते सचिवांपर्यंत ३७ विभागांची दररोजची सुमारे ४० हजार पत्रे प्रवेशद्वारावरील याच युनिटमध्ये स्वीकारली जाणार आहेत. या खिडक्यांवर तत्काळ ही पत्रे स्कॅन होऊन थेट संबंधित विभागात पोहोचणार आहेत. त्याचे ‘टोकन’ पत्र देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर मिळणार आहे, असे कळते.

सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून यासाठी ऑनलाईन यंत्रणा उभारली जात आहे. प्रवेशद्वारावरील सेंट्रल रजिस्ट्री युनिटमध्ये स्वीकारलेल्या पत्रांवर नेमकी काय कारवाई सुरू आहे हे पत्र देणाऱ्या व्यक्तीला अगदी गावात बसूनही संबंधित वेबसाईटवर टोकन नंबर टाकताच कळणार आहे.

माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज याबाबत अधिकृत माहिती एका पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात येत आहे. शासनाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात ई-ऑफिस होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून, शासनाचा कारभार हा लवकरच कागदविरहित (Paperless) करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती सौनिक यांनी दिली.

मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना नागरीकांकडून तसेच क्षेत्रिय कार्यालयांकडून पाठविण्यात येणारे टपाल स्वीकारण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये प्राप्त होणाऱ्या टपालांवर तत्काळ कार्यवाही व्हावी व वेळेचा अपव्यव टाळण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई- ऑफिसच्या माध्यमातून पाठविण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. मंत्रालयात फक्त टपाल देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून आणि क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांद्वारे प्राप्त होणारे टपाल स्वीकारण्यासाठी कार्यालयीन वेळेत मंत्रालयाच्या मध्यवर्ती टपाल केंद्रात टपाल स्वीकृतीसाठी विभाग व कार्यालयनिहाय व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्विकारलेले टपाल स्कॅन करुन ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येईल. याकरिता मध्यवर्ती टपाल केंद्रातील विभागांकरिता स्वतंत्र ई-खाते एनआयसी (NIC) मार्फत तयार करण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या.

नोंदणी शाखेस ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून कामकाज करणे अपरिहार्य आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशे, पुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाही, असे टपाल समक्ष स्वीकारले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपले सरकार वेबपोर्टलही होणार लोकाभिमुख

‘आपले सरकार’ वेब पोर्टलच्या माध्यमातून 511 सेवांपैकी ३८७ सेवा नागरिकांना दिल्या जातात. शासनाच्या जास्तीतजास्त सेवा लोकाभिमुख करण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये 124 सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना आपले अर्ज दाखल केल्यापासून सेवा सहज मिळाव्यात यासाठी मोबाईल ॲपदेखील सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content