Homeमाय व्हॉईसमी मारलेला डोळा,...

मी मारलेला डोळा, राज ठाकरेंनीपण दखल घेतली…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणाला सुरुवात करताना सभागृहात धमाल उडवून दिली. उपमुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या घरात एका बुकीची मुलगी शिरली, असे सांगत त्यांनी सत्तारूढ आणि विरोधी अशा सर्व आमदारांना एक कानमंत्र दिला. पवार म्हणाले की, बाबांनो… कोणीही दुसरीकडून व्हिडियो कॉल लावला तर लगेच घेऊ नका. कारण, तो फोन करणारा लगेच फोटो काढतोय…  म्हणजे स्क्रीनशॉट घेतोय आणि बघा, अमक्या तमक्याशी बोलतोय, असे दाखवून काही उद्योग करतात. चुकून आपण डोळा बंद केला तरी डोळा मारला, डोळा मारला… असे होते. मघाशी सभागृहात नानांना डोळा मारला, आता इथे कॅमेरे नव्हते बरे झाले. नाही तर परत तसेच झाले असते, असेही ते म्हणाले.

मागच्या आठवड्यात मी मारलेला डोळा व्हायरल झाला. त्यावेळी खाली पत्रकारांशी बोलायला उद्धवजी आले आणि मी काही त्यांना डोळा मारला का, पण राज ठाकरेंनीदेखील माझ्या डोळा मारण्याची दखल घेतली, असे पवार यांनी सांगताच विधानसभेत हास्यकल्लोळ उडाला. त्यावेळी मागून कुणीतरी, मग दादा तुम्ही कोणाला डोळा मारला होता, असे विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, अहो, तो चॅनेलचा नाही का एक जण… सागर, त्याला डोळा मारला होता. पण ठीक आहे आता… त्यामुळे आपण सर्वांनीच सार्वजनिक ठिकाणी वागताबोलताना खूप काळजी घ्यायला हवी, असे सांगायलाही दादा विसरले नाहीत.

डोळा

कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे…

पुण्यात कोयता गँगचा अजूनही पुरता बंदोबस्त झालेला नाही. कोयता गँगची दहशत वाढली आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्येसुध्दा कोयता गँगने हातपाय पसरले आहेत. मुंबईतल्या नाहूरमध्ये दिवसा राजरोस तलवारी नाचवत गुंड फिरतात, हल्ले करतात. विशेष पोलीस आयुक्तांचे नवीन पद मिळाल्याने मुंबईतली गुंडगिरी कमी होईल, असे वाटले होते. त्याउलट, आता तलवारी घेऊन, दिवसा राजरोस गुंड फिरत आहेत. सर्वसामान्यांना सुरक्षित वाटेल, व्यावसायिक आपले व्यवसाय करु शकतील, अशी परिस्थिती आज मुंबईत आहे का? असा सवालही अजित पवार यांनी केला.

ऑनलाईन लॉटरी, रमीचे प्रमाण वाढले

राज्यात ऑनलाईन लॉटरी, रमीचे प्रमाण वाढले आहे. या जुगारातून शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांची फसवणूक होत आहे. तसेच तरुण पिढी या ऑनलाईन रमीकडे वळत आहे. या ऑनलाईन रमीची जाहिरात काही अभिनेते, अभिनेत्री करत आहेत. त्यामुळे तरुण या जाळ्यात अडकत आहेत. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी अजित पवार यांनी केली.

‘लव्ह जिहाद’वरुन सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न

उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्ये काही लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र यातून धार्मिक द्वेष पसरला जाणार नाही, राज्यातल्या जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. सरकारने घटनाविरोधी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली आहे. जनतेच्या मूलभूत हक्क डावलण्याचा हा प्रकार आहे. लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कोणलाही अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

डोळा

कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा हवेत

कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा सरकारने केली. मात्र दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपीला आळा घालण्यात सरकारला यश आले नाही. पेपर फुटण्याच्या अनेक घटनासुद्धा उघडकीस आल्या. दहावीचा गणिताचा पेपर फुटला, विज्ञान, तंत्रज्ञान विषयाचा पेपर फुटला. कॉपी पुरवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मारहाण झाली. कॉपीमुक्त महाराष्ट्राची केवळ घोषणा करुन उपयोग नाही. त्याच्या अंमलबजावणीकडेही सरकारने लक्ष दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात रोज ३८ महिला बेपत्ता

महिला अत्याचाराचा मुद्दा वारंवार उपस्थित होतो. पण अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. उलट त्यात वाढ होते आहे. एकट्या मुंबईत महिला अत्याचाराच्या वर्षभरात ६ हजार १३३ गुन्हे नोंद झाले. ६१४  अल्पवयीन मुली आणि ९८४ महिला विकृत वासनेच्या शिकार झाल्या. १ हजार ५९८ पैकी ९१२ गुन्हे उघडकीस आले. ६८६ प्रकरणात तर आरोपीही सापडले नाहीत. १ हजार १६४ मुलींचे अपहरण झाले. त्यापैकी १ हजार ४७ मुली सापडल्या. ११७ मुली अजून पोलिसांना सापडलेल्या नाहीत. ही मुंबईची स्थिती आहे. “शक्ती” कायद्याला अजून केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली नाही. ती मंजुरी लवकरात लवकर मिळवा. महाराष्ट्रातून रोज ३८ महिला-मुली बेपत्ता होत आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content