Homeडेली पल्सस्वा. सावरकर, राहुल...

स्वा. सावरकर, राहुल गांधी आणि गदारोळ…

मुंबईत विधानसभेमध्ये गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसने आणि राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवरून गदारोळ झाला. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करत त्यांचा निषेध केला आणि या गदारोळात सभागृहाचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा विषय उपस्थित केला. त्यापाठोपाठ शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटावर टीका केली आणि ते राहुल गांधी यांना साथ देत असल्याबद्दल निषेध केला. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांना चपलेने मारायला हवे, असे जाहीर केले होते. त्याउलट त्यांचे वारस आज राहुल गांधींना साथ देत आहेत, अशी टीका केली. स्वा. सावरकर यांचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधी यांना कोणी दिला, असा सवालही त्यांनी केला.

एकीकडे सत्ताधारी सदस्य सावरकर अवमानाविरूद्ध आक्रमक होत असतानाच विरोधी पक्षांचे सदस्यही सत्ताधाऱ्यांविरूद्ध घोषणाबाजी करत होते. परिणामी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी  सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू होताच सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकही त्याला घोषणांनीच उत्तर देत होते. तेव्हा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासाकरीता तहकूब केले.

कामकाज पुन्हा सुरू होताच आमदार अतुल भातखळकर यांनी बोलण्यास सुरूवात केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनला जाऊन ब्रिटिशांच्या छाताडावर पाय ठेवून क्रांतिकार्य केले आणि तुरुंगातून जामिनावर असलेले राहुल गांधी त्यांच्यावर टीका करतात, त्यांचा निषेध करतो, असे वक्तव्य त्यांनी केले. त्याला आक्षेप घेऊन काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांनी भातखळकर यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाका, अशी मागणी केली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम यांचा अपमान करणाऱ्यांना तसा नैतिक अधिकार नाही, असे ते म्हणाले.

सावरकर

त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आवारात राहुल गांधी यांच्या फोटोला सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोड्याने मारण्याचा प्रकार घडला, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, आज राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारले… आणि हेच उद्या अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्यांच्या बाबतीत घडू शकेल. त्यामुळे त्याचा आम्ही निषेध करतो. अध्यक्षांनी त्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गदारोळातच याबद्दल मत मांडले. विधिमंडळ आवारात जोडे मारणे आंदोलन करू नये, याच्याशी मी सहमत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. जोडे मारो आंदोलन यापुढे होऊ नये, याची काळजी आपण घ्यायला हवी. त्याचवेळी क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ज्या हीन पद्धतीने बोलले जाते, तेही बंद करायला हवे. सावरकरांनी जे भोगलंय ते कोणीही भोगलेलं नाही. अनन्वित अत्याचार सहन करत सावरकर भारत माता की जय आणि वंदे मातरम् म्हणत राहिले आणि संघर्ष केला. क्रांतिकारक भगतसिंगांनीदेखील सावरकरांनी तयार केलेले जोसेफ मँझिनीचे चरित्र बाळगले होते, वाचले होते तर मग हे लोक काय भगतसिंगपेक्षा मोठे आहेत का, त्यांचा आम्ही निषेध करतो, असे ते म्हणाले.

सत्तारूढ पक्षाच्या वतीने आश्वस्त करतो की सभागृहाच्या आवारात जोडे मारो आंदोलन केले जाणार नाही. समोरच्यांनीही लक्षात ठेवलं पाहिजे की, स्वातंत्र्यवीरांच्या संदर्भात वेडंवाकडं बोलणं, ही हीन प्रवृत्ती आहे. संभाषणात काही चुकीचं असेल तर तपासून घ्यावं आणि काढून टाकावं, अशी विनंतीही त्यांनी अध्यक्षांना केली.

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, विधिमंडळ आवारात असंसदीय गोष्टी होणार नाहीत, याची काळजी घ्या. नाही तर कडक कारवाई करावी लागेल. योग्य आयुधांचा वापर करा, निर्णय घेऊ, आज असा प्रस्ताव किंवा नोटीस आलेली नाही. त्यामुळे कामकाज सुरू करू, असे नार्वेकर यांनी सांगितल्यानंतर हा गदारोळ थांबला आणि पुढील कामकाज सुरळीतपणे सुरू झाले.

Continue reading

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...
Skip to content