Homeटॉप स्टोरीसंगीत रजनीच्या आयोजनात...

संगीत रजनीच्या आयोजनात नीलम गोऱ्हेंना डावललेच नाही?

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानभवनाच्या प्रांगणामध्ये विधिमंडळाचे सदस्य तसेच काही निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नितीन मुकेश यांच्या संगीत रजनीच्या आयोजनात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना विश्वासात घेतले नसल्याच्या चर्चेचे आज विधानसभेत पडसाद उमटले. तेव्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निर्णयात विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषद सभापतींशिवाय इतर कोणाला सहभागी करून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.

दोनच दिवसांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसिद्ध गायक मुकेश यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनाच्या प्रांगणात एका संगीत रजनीचे आयोजन केले होते. याच अध्यक्षांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभेतील महिला सदस्यांना चांदीच्या ताटात जेवू घातले होते. ही माहिती विधानसभेतच एका महिला सदस्यांनी जाहीर केल्याने सर्वांना कळली होती. त्यामुळेच नार्वेकर यांच्या या संगीत रजनीच्या कार्यक्रमावर काल सर्वत्र जोरदार चर्चा होती. विधान परिषदेतही हा विषय चर्चेला आला होता. त्यानंतर अनेक सदस्यांची तसेच इतरांची अशी भावना झाली होती की, या संगीत रजनीच्या कार्यक्रमाच्या आयोजनात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना डावलण्यात आले. तशा आशयाचे वृत्त आज अनेक माध्यमांतूनही प्रसिद्ध झाले.

नीलम

आज विधानसभेत भारतीय जनता पार्टीचे सदस्य आशिष शेलार यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे हा विषय उपस्थित केला. आज माध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांमुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. विधानसभेचे सभागृह वरिष्ठ की विधान परिषदेचे सभागृह वरिष्ठ असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये कोणत्यातरी महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीला डावलले गेल्याचा विषयही निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर स्पष्टीकरण व्हायला हवे, असे शेलार म्हणाले.

यावर स्पष्टीकरण देताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, दोन्ही सभागृह स्वतंत्रपणे कार्यरत असतात. यामध्ये कोणतेही सभागृह वरिष्ठ किंवा कनिष्ठ असत नाही. विधानसभेमध्ये कामकाज करताना विधानसभेचे अध्यक्ष कामकाज पाहतात. त्यांच्या अनुपस्थितीत वा त्यांचे पद रिक्त असेल तर हे कामकाज उपाध्यक्ष किंवा अध्यक्षांनी नेमलेले तालुकाध्यक्ष पाहतात. तशीच पद्धत विधान परिषदेतही आहे. विधान परिषदेत सभापती कामकाज पाहतात. ते अनुपस्थित असतील किंवा ते पद रिक्त असेल तर तेथील कामकाज उपसभापती किंवा सभापती वा उपसभापतींनी नेमलेल्या तालिका सभापतींनी कामकाज पाहायचे असते. मात्र विधान भवनाशी संबंधित इतर जी कामे असतात याचा निर्णय विधान भवनाचे बोर्ड घेते. या बोर्डात विधानसभेचे अध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सभापती यांचाच  समावेश असतो. या दोघांपैकी जे पद रिक्त असेल तेथे उपाध्यक्ष व उपसभापती यांचा समावेश केला जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा निर्णयात कोणाला विश्वासात घेतले वा डावलले, असा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content