Homeटॉप स्टोरीफडणवीसांना संपवण्यासाठी पत्नीला...

फडणवीसांना संपवण्यासाठी पत्नीला आमिष! ब्लॅकमेलचाही प्रयत्न!!

आपल्या पत्नीच्या माध्यमातून पैशाच्या आमिषाने किंवा ब्लॅकमेल करून काम साध्य करून घ्यायचे आणि त्यासोबतच माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायची असा डाव माझ्या काही राजकीय मित्रांनी आखल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र हे सर्व प्रकरण राजकीय स्पर्धेतून तयार झाले आहे की नाही हे संपूर्ण चौकशीनंतरच मी सांगू शकेन, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. मात्र, हे प्रकरण पाहिल्यावर राजकारण कुठच्या थरापर्यंत पोहोचले आहे हे पाहता निश्चितच दुःख होते, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहितीच्या मुद्द्याच्या आधारे हा विषय उपस्थित केला. आजच्या एका वृत्तपत्रात फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी एका फॅशन डिझायनरविरुद्ध पोलिसांकडे गुन्हा दाखल केल्याची बातमी प्रसिद्ध केली आहे. याबाबत वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घ्यायचे आहे, असे पवार म्हणाले.

त्यानंतर फडणवीस यांनी यावर हे प्रकरण सविस्तरपणे कथन केले. अनिल जयसिंघानी नावाचा इसम गेल्या सात-आठ वर्षांपासून फरार आहे. त्याच्याविरोधात 14-15 गुन्हे आहेत. त्याची मुलगी चांगली शिकलेली आहे, हुशार आहे. 2015-16च्या दरम्यान ती माझी पत्नी अमृता, हिला अधूनमधून भेटत असे. त्यानंतर 2021मध्ये ती पुन्हा अमृताला भेटली. मी फॅशन डिझायनर आहे आणि कपडे तयार करते, आर्टिफिशियल ज्वेलरी तयार करते, 50 पॉवरफुल महिलांच्या यादीत लवकरच माझा समावेश होत आहे, माझी आई अलीकडेच वारली त्यानिमित्ताने एका पुस्तकाचे प्रकाशन करायचे आहे, असे वेगवेगळ्या वेळी सांगत तिने एका पुस्तकाचे अमृताच्या हस्ते घरच्या घरी प्रकाशनही केले. या माध्यमातून तिने अमृताचा विश्वास संपादन केला.

बऱ्यापैकी विश्वास संपादन झाल्यानंतर तिने काही डिझायनर ड्रेसेस अमृताला वापरण्यास देण्यास सुरुवात केली. मुंबईत असे अनेकजण डिझायनर ड्रेसेस काही इव्हेंटपुरता वापरायला देतात आणि परतही घेतात. माझी पत्नी सोशल फील्डमध्ये असल्यामुळे तीही तिच्याकडून काही ड्रेसेस घेत होती. त्यामुळे हा विश्वास अधिकच वाढला. त्यानंतर एक दिवस तिने अमृताला सांगितले की, माझ्या वडिलांना चुकीच्या काही केसेसमध्ये अडकवण्यात आले आहे.  तिला सोडवण्यासाठी तुम्ही मदत करा. अमृताने त्याकरीता तिला माझ्याकडे एक निवेदन देण्यास सांगितले. तोपर्यंत आमचे सरकार सत्तेवर आलेले नव्हते.

आम्ही सत्तेवर आल्यानंतर तिने माझ्या पत्नीशी संपर्क साधला आणि तिला सांगितले की, माझे वडील अनेक बुकींना ओळखतात. पोलिसांना तसेच एकमेकांच्या विरोधकांना माहिती देऊन ते रेड घडवून आणायचे आणि त्यात त्यांना दोन्हीकडून भरपूर पैसे मिळायचे. तुम्ही जर यात मदत केली तर आपल्या दोघांनाही भरपूर फायदा होईल… यावर माझ्या पत्नीने ते हसण्यावारी नेले आणि असल्या फालतू गोष्टी माझ्याकडे करू नकोस, असे सांगितले.

काही दिवसांनी तिने अमृताला वडिलांना सोडवण्यासाठी एक कोटी रुपयांची ऑफर दिली. तेव्हापासून अमृता तिला जरा लांब ठेवू लागली. त्यानंतर ती वारंवार फोन करून बुकिंच्या विषयावर बोलू लागली. एकूण रागरंग पाहून अमृताने तिचा नंबर फोनवर ब्लॉक केला. काही दिवसांनी एका अननोन नंबरद्वारे तिने काही ऑडिओ तसेच व्हिडिओ क्लिप पाठवले. त्यातल्या काही व्हिडिओमध्ये ही मुलगी बाहेर एका बॅगेत पैसे भरते आहे. दुसऱ्या क्लिपमध्ये तशी बॅग ती माझ्या घरात काम करणाऱ्या बाईकडे देते आहे. हार घालते आहे… अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यात होत्या.

नंतर तिने धमक्या देण्यास सुरुवात केली. हे जे काय व्हिडिओ टाकले आहेत, काही ऑडिओ टाकले आहेत त्यापेक्षा बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत. एक तर माझ्या वडिलांना सोडवण्याचे काम कर नाही तर तुझी आणि तुझ्या नवऱ्याची कारकीर्द मी संपुष्टात आणिन.. अशा धमक्या देण्यास तिने सुरुवात केली. अमृताने ही गोष्ट मला सांगितल्यानंतर मी पोलिसांना बोलावले. अमृताने एफआयआर दाखल केला. या सर्व ऑडिओ-व्हिडिओंची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. प्रत्येक गोष्ट फ्रेम बाय फ्रेम स्पष्ट झाली. परंतु पोलिसी सल्ल्यामुळे हा एफआयएर आम्ही पब्लिक केला नाही. पोलीस यामध्ये त्यांच्याकडून काही माहिती मिळते का याची चाचपणी करत होते. त्यावरून अमृताने तिच्याशी संपर्क ठेवला आणि तिच्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली. तू या सर्व गोष्टी कोणाच्या सांगण्यावरून करतेस हे सांगितले तर तुझ्या विरोधातला गुन्हा मागे घेतला जाईल असे सांगितल्यानंतर तिने काही मोठमोठ्या नेत्यांची नावे घेतली. मागच्या पोलीस आयुक्तांच्या काळात माझ्या वडिलांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती पण सरकार बदललं आणि ते थांबले, असेही तिने स्पष्ट केले.

बोलता बोलता ती म्हणाली की, तुम्ही जर मला मदत करत असाल तर मी तुमच्या बाजूने असे पुरावे निर्माण करू शकते. त्यामुळे यामध्ये राजकीय नेत्यांचा कितपत सहभाग आहे हे आता सांगणे शक्य होणार नाही. मात्र तपासांती यावर कितपत विश्वास ठेवावा हे सांगू शकेन. आम्ही एफआयआर दाखल केला, त्यानंतर दोन दिवसांत हा विषय कोर्टात गेला आणि तेथून मीडियाकडे ही माहिती गेली. त्यामुळे तीसुद्धा गायब झाली आणि तिचे सात-आठ वर्षांपासून फरार असलेले वडीलही, जे समोर येणार होते ते आले नाहीत. मात्र, आपली सर्व राजकीय पक्षांतल्या मोठमोठ्या नेत्यांशी कशी ओळख आहे हे दाखवण्यासाठी आणि आपल्याला अप्रत्यक्ष धमकावण्यासाठी तिने काही क्लिप्स आम्हाला दाखवल्या होत्या. पाठवल्या होत्या. त्यात अनेक मोठमोठे नेते आहेत. दीड वर्षं विश्वास संपादन करण्याच्या प्रक्रियेत तिने आपल्या पत्नीचे फोनवरील सर्व बोलणे रेकॉर्ड केले होते. घरी आपल्यासोबत कोणाला ना कोणाला घेऊन येऊन व्हिडिओ क्लिप शूट केल्या होत्या. सुदैवाने यात काहीही त्यांना सापडलं नाही.

मागच्या सरकारचा काळात आपल्याला राजकारणातून उठवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मला मिळाली होती. माझ्या कुटुंबियांनाही आयुष्यातून उठवले जाईल, याची कल्पना आली होती. पण लोक या थराला जातील असे कधीही वाटले नव्हते. परंतु ईश्वराची कृपा यात काहीही वाईट झाले नाही. पण, दादा हे राजकारणात असलेल्या प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे की, सध्या कोणत्या स्तरावर राजकारण केले जाते ते आहे ते…

देवेंद्र फडणवीस यांनी कहाणी सांगितली आणि सारे सभागृह काही क्षणांसाठी अवाक् झाले, हे मात्र निश्चित!

Continue reading

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...
Skip to content