Homeटॉप स्टोरीराज्य अर्थव्यवस्थेत 6.8...

राज्य अर्थव्यवस्थेत 6.8 टक्के वाढ अपेक्षित

सन 2022-23च्या पुर्वानुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेत 6.8 टक्के वाढ तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0 टक्के वाढ अपेक्षित आहे. सन 2022-23मध्ये राज्याच्या कृषि व संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्के, उद्योग क्षेत्रात 6.1 टक्के आणि सेवा क्षेत्रात 6.4 टक्के वाढ अपेक्षित आहे.

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात सादर केला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

पुर्वानुमानानुसार सन 2022-23 मध्ये सांकेतिक (नॉमिनल) (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 35,27,084 कोटी अपेक्षित आहे आणि वास्तविक (रिअल) (सन 2011-12च्या स्थिर किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 21,65,558 कोटी अपेक्षित आहे. पहिल्या सुधारित अंदाजांनुसार सन 2021-22 चे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 31,08,022 कोटी होते, तर सन 2020-21मध्ये ते 26,27,542 कोटी होते. सन 2021-22चे वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न 20,27,971 कोटी होते, तर सन 2020-21 मध्ये ते 18,58,370 कोटी होते. सन 2021-22 मध्ये दरडोई राज्य उत्पन्न 2,15,233 होते, तर सन 2020-21 मध्ये ते
1,83,704 होते.

एप्रिल ते डिसेंबर, 2022 या कालावधीत ग्रामीण व नागरी भागाकरिता सरासरी ग्राहक किंमती निर्देशांक अनुक्रमे 349.0 व 333.3 होता. कोविड-19 महामारीच्या निर्बंधांमुळे एप्रिल, 2021 करिता जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती संकलनात अडचणी आल्या आणि खाद्यपदार्थ गटाव्यतिरिक्त इतर गटातील वस्तुंच्या किंमती उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे, 2021-22करिता मे, 2021 ते मार्च, 2022 या कालावधीकरिता ग्राहक किंमती निर्देशांक परिगणित करण्यात आला. मे ते डिसेंबर, 2022 या कालावधीत ग्रामीण व नागरी भागाकरिता सरासरी ग्राहक किंमती निर्देशांक अनुक्रमे 350.8 व 334.9 होता आणि मे ते डिसेंबर, 2022 या कालावधीत सरासरी ग्राहक किंमती निर्देशांकावर आधारित वर्ष-ते-वर्ष चलनवाढ ग्रामीण भागाकरिता 8.1 टक्के व नागरी भागाकरिता 7.3 टक्के होती, असे यात नमूद करण्यात आले आहे.

अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23करिता राज्याची महसुली जमा 4,03,427 कोटी, तर सुधारित अंदाजानुसार सन 2021-22करिता 3,62,133 कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23करिता कर महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे 3,08,113 कोटी आणि 95,314 कोटी आहे. माहे एप्रिल ते नोव्हेंबर, 2022 या कालावधीत प्रत्यक्ष महसुली जमा 2,51,924 कोटी (अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 62.4 टक्के) आहे.

अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23करिता राज्याचा महसुली खर्च 4,27,780 कोटी अपेक्षित असून सुधारित अंदाजानुसार सन 2021-22करिता 3,92,857 कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23 करिता एकूण जमेतील भांडवली जमेचा हिस्सा 26.5 टक्के अपेक्षित असून एकूण खर्चातील भांडवली खर्चाचा हिस्सा 22.0 टक्के अपेक्षित आहे. सन 2022-23करिता राज्याचा प्राधान्य क्षेत्रासाठी वार्ष‍िक कर्ज आराखडा 5.22 लाख कोटी असून त्यामध्ये ‘कृषि व संलग्न कार्ये’ क्षेत्राचा हिस्सा 24.1 टक्के आणि सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग आणि खादी व ग्रामोद्योग क्षेत्राचा हिस्सा 54.5 टक्के आहे. राज्यात मान्सून 2022मध्ये सरासरी पावसाच्या119.8 टक्के पाऊस पडला. राज्यातील 204 तालुक्यांमध्ये अतिरिक्त, 145 तालुक्यांमध्ये सरासरी आणि सहा तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडला, असेही या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे.

सन 2022-23च्या खरीप हंगामामध्ये 157.97 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्ये, तेलबिया, कापूस व ऊस यांच्या उत्पादनात अनुक्रमे 10 टक्के, 19 टक्के, पाच टक्के व चार टक्के वाढ अपेक्षित असून कडधान्याच्या उत्पादनात 37 टक्के घट अपेक्षित आहे. सन 2022-23च्या रब्बी हंगामामध्ये 57.74 लाख हेक्टर क्षेत्रांवर पेरणी पूर्ण करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत कडधान्याच्या उत्पादनात 34 टक्के वाढ अपेक्षित असून तृणधान्ये व तेलबियांच्या उत्पादनात प्रत्येकी 13 टक्के घट अपेक्षित आहे. सन 2021-22मध्ये फलोत्पादन पिकांखालील क्षेत्र 23.92 लाख हेक्टर असून 327.84 लाख मे. टन उत्पादन अपेक्षित आहे.

सन 2022-23मध्ये ऑक्टोबरपर्यंत, विजेची सरासरी कमाल मागणी 22,339 मेगावॅट होती तर पुरवठा 22,441 मेगावॅट होता. सन 2021-22मध्ये विजेची सरासरी कमाल मागणी 21,221 मेगावॅट होती तर पुरवठा 21,750 मेगावॅट होता. राज्यातील रस्त्यावरील वाहनांची संख्या दि. 1 जानेवारी, 2023 रोजी 433 लाख (134 वाहने प्रति किमी रस्ता लांबी) होती, तर दि. 1 जानेवारी, 2022 रोजी 409 लाख (128 वाहने प्रति किमी रस्ता लांबी) होती, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

Continue reading

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...
Skip to content