Homeटॉप स्टोरीमाणूसही फिरकला नाही,...

माणूसही फिरकला नाही, तरी ‘वर्षा’चे लाखोंचे बिल!

वर्षा निवासस्थानी सोन्यासारखी हजारो माणसे येत असताना तिथे चहापानावर दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्च झाला म्हणून टीका करणाऱ्या विरोधकांनी मागच्या अडीच वर्षांत वर्षावर कोणी माणूसच जात नसताना आणि फेसबुक लाईव्ह चाललेले असताना चहापाण्याचा लाखो रुपयांचा खर्च कसा काय झाला याचा हिशेब द्यावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केले.

राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल अभिनंदन करणारा प्रस्ताव आज संमत करण्यात आला. या प्रस्तावाच्या निमित्ताने झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मागच्या अडीच वर्षांत कोविडच्या काळात वर्षा बंगला सर्वसामान्यांसाठी बंदच होता. कोणी गेलेच तर त्याला कोविड टेस्ट करून घ्यावी लागायची. प्रमाणपत्र दाखवायला लागायचे. मग कोण कशाला मरायला जाईल… असे असताना, एकही माणूस तेथे फिरकत नसताना फेसबुक लाईव्हवर लाखो रुपयाचा चहापाण्याचा खर्च कसा झाला, असा सवाल त्यांनी केला.

आमच्या काळात जाहिरातींवर खूप खर्च होत असल्याची टीका करता… अजितदादा, तुमच्या काळात तर पर्सनल पीआरसाठी सहा कोटींची तरतूद करण्यात आली होती. नंतर बोंबाबोंब झाल्यावर हा विषय बोंबलला. आम्ही तर सरकारच्या योजना जाहिरातीमार्फत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतोय. अगदी सामना, सकाळ सगळ्या पेपरमध्ये जाहिराती येतात. जर हे सरकार घटनाबाह्य आहे तर सरकारने दिलेल्या जाहिराती सामन्याच्या मालकाला चालतात का? या सरकारने दिलेला पैसा सामन्याचा मालकाला चालतो का, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

हे सरकार पूर्णपणे कायदेशीर आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली नाही. लोकशाहीत जे कायदेशीर आहे, जे काय घटनात्मक आहे त्याप्रमाणे हे सरकार काम करत आहे. आता पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी रोड शो केला म्हणून आमच्यावर टीका करण्यात आली. पण, पवारसाहेब तुम्हीदेखील त्यावेळी गल्लीबोळात फिरतच होता. शरद पवार साहेबांनी पंधरा-वीस मिटिंग का घेतल्या होत्या? मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरणारच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये रोड शो केला आणि अख्खे गुजरात जिंकले. ही पोटनिवडणूक होती. कसब्यामध्ये आलेल्या पराभवामुळे आता आम्ही अलर्ट झालो आहोत. कसबा जिंकले म्हणजे पूर्ण राज्य जिंकू आणि देश जिंकू… हे जे काय चाललेय ना… त्याला काय अर्थ नाही. तुमची तीन पक्षांची आघाडी आहे. एका पक्षाचा उमेदवार उभा राहिला तर बाकीच्या पक्षांचे नेते काय भजन करत बसणार? त्यामुळे इतका आनंद साजरा करण्याची काही गरज नाही. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टी चारीच्या चारी पोटनिवडणुका तसेच लोकसभेची पोटनिवडणूक हरला होता. मात्र त्यानंतर झालेल्या राज्याच्या निवडणुका भाजपाने; जिंकल्या. त्यामुळे जे पोटनिवडणूक हरतात ते पुढे राज्य जिंकतात, हे लक्षात ठेवा, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

वर्षा

तुम्ही पहाटे शपथ घेतली तेव्हा तुमचे पुतळे जाळले. आमचे पुतळे जाळायला दहा वेळा फोन करावे लागले हे लक्षात ठेवा. एमपीएससीच्या पोरांना आंदोलन करायला भाग पाडणारा निर्णय आम्ही घेतला नाही तर तो तुमच्या काळात झाला. पोरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्हाला निवडणूक आयोग की लोकसेवा आयोग असा सवाल करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आम्ही हा विषय सोडवताना तो रखडत ठेवला नाही. श्रेय घेण्याचा कोणताही मुद्दा पुढे न आणता आम्ही त्यावर निर्णय घेतला. आत्मक्लेषासाठी आम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीकडे जावे लागले नाही, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्ग करायला सुरुवात झाली. लगेचच काही जणांनी खाट टाकली. ते सगळे स्पीडब्रेकर आम्ही दूर केले आणि हे काम पुढे चालू ठेवले. आज शिर्डीपर्यंतचा समृद्धी महामार्ग खुलाही झाला. दादा हे सर्व तुम्हाला माहित आहे. तुम्हीही शपथ घेतली. आम्ही साखरझोपेत असताना… इतक्यात अजितदादा खाली बसूनच म्हणाले की, तुम्हाला तुमच्या लोकांनी साथ दिली, आम्हाला दिली नाही. तो धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले की, दादा तुम्ही मोठी चूक केली. जयंतरावांना विश्वासात घेतले नाही. तेव्हाच विश्वासात घेतले असते तर असा विषय पुढे झालाच नसता आणि सभागृहात एकच हंशा पिकला. त्याच्याही अनेक सुरस कथा आहेत. दोन-चार मला फडणवीसांनी सांगितल्या आहेत. जेव्हा ते सांगतील तेव्हा अनेकांची पंचाईत होईल, असे ते म्हणाले.

दादा तुम्ही बोलता गोड. पण तुमचा कार्यक्रम सुरूच असतो. सत्तेतून अचानक पायउतार झाल्यामुळे तुमच्या डोळ्यासमोर अंधारी आली आहे आमच्या सरकारने केलेली चांगली कामे तुम्हाला दिसत नाही. असे पोटदुखीचे प्रसंग वारंवार येतील. त्यावर आमच्याकडे जालीम औषधही आहे. त्यासाठी आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे. त्यात डॉक्टरही आहे. कंपाउंडरही आहे… नको. कंपाऊंडर नको… असे म्हणताच पुन्हा सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

दादा, तुम्ही आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणालात. आम्ही काय महाराष्ट्राचा द्रोह केला? आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणता. मग, आपले विरोधी पक्षनेतेपदपण घटनाबाह्य आहे का? जयंतरावांची इच्छा होती त्या पदावर बसण्याची. त्यांच्यावर अन्याय करून आपण बसलात आणि आता या पदाला घटनाबाह्य म्हणता? शिवसेनेची बाजू मांडा… पण, इतकी… आता फक्त सेनेचे प्रवक्तेपदच द्यायचे बाकी राहिले आहे. त्यांच्याकडे तर तीही संधी नाही. कारण शिवसेना पक्ष आणि त्याचे चिन्ह आमच्याकडे आले आहे असे शिंदे म्हणाले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content