Homeटॉप स्टोरीसंजय राऊतांविरोधात विधानसभेत...

संजय राऊतांविरोधात विधानसभेत सत्ताधारी आक्रमक!

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या शब्दप्रयोगाच्या विरोधात आज विधानसभेत सत्ताधारी पक्षांचे सदस्य प्रचंड आक्रमक झाले. संजय राऊत यांच्याविरोधात तातडीने हक्कभंगाची कारवाई करावी आणि त्यांना ताबडतोब अटक करावी, या मागणीसाठी सत्ताधारी सदस्य आग्रही राहिले. विरोधी पक्षांचे सदस्य यामध्ये बिचकत का होईना, पण सहभागी झाले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला चार वेळा तर नंतर पूर्ण दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

आज सकाळी कामकाज सुरू होताच भारतीय जनता पार्टीचे अतुल भातखळकर तसेच शिवसेनेचे भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना मांडली. अध्यक्षांनी या सूचना आपल्याकडे आल्या असून त्यावर योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले. मात्र सत्ताधारी पक्षाचे सदस्य ऐकायला तयार नव्हते. संजय राऊत विधिमंडळाला चोरमंडळ म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात तातडीने हक्कभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. कोणत्याही पक्षाचा सदस्य असो किंवा कोणीही असो विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणे सहन केले जाणार नाही. मात्र ते नेमके काय म्हणाले हे तपासून घेऊन मगच कारवाई व्हावी, अशी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

अतुल भातखळकर यांनी संजय राऊत विधिमंडळाला चोरमंडळ, गुंडमंडळ असे म्हणाल्याचे निदर्शनाला आणले. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊत यांचे म्हणणे तपासून घेण्यास सांगितले. शब्दांचा वापर सगळ्यांनीच योग्य केला पाहिजे. कोणी कोणाला देशद्रोहीपण म्हणता कामा नये, असे त्यांनी सांगितले. भरत गोगावले यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार संजय राऊत यांना कोणी दिला, असा सवाल केला. आशिष जयस्वाल यांनी संजय राऊत यांच्यावर सर्व कामकाज बाजूला ठेवून तातडीने कारवाई करायला हवी, अशी मागणी केली. यामिनी जाधव यानिमित्ताने म्हणाल्या की, संजय राऊत यांनी महिला आमदारांचा उल्लेख वेश्या असा केला होता. रवींद्र वायकर यांनी यावेळी बोलताना गोगावले यांच्या वक्तव्यातील एका शब्दावर आक्षेप घेतला. नंतर गोगावले यांनी हा शब्द मागे घेतला.

विधानसभेचे विविध सदस्य आपापले म्हणजे मांडत असतानाच इतर सदस्य राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरुवातीला दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. कामकाज सुरू होताच तालिकाध्यक्ष योगेश सागर यांनी सुरुवातीला वीस मिनिटे, नंतर अर्धा तास आणि पुन्हा पंधरा मिनिटे असे तीन वेळा कामकाज तहकूब केले.

कामकाज पुन्हा सुरू होताच अतुल भातखळकर यांनी संजय राऊत नावाचा इसम महिलांशी बोलतानासुद्धा शिव्या घालतो, असे निदर्शनास आले असल्याचे सांगितले. हा इसम जो सभागृहातल्या सदस्यांना चोर म्हणतो तो स्वतः आर्थिक गुन्ह्यात तुरुंगात होता आणि सध्या जामीनावर सुटला आहे असेही ते म्हणाले. संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याचे समर्थन करताना त्यांनी यशवंतराव चव्हाण, शरद पवार, नितीन गडकरी असे सर्व या सभागृहाचे सदस्य राहिले असल्याचेही सांगितले.

संजय शिरसाट यांनी आपले म्हणणे मांडताना संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही चोर म्हणतात हे निदर्शनाला आणले. नितेश राणे यांनी या कारवाईच्या मागणीसाठी बोलताना संजय राऊत सामन्यात येण्याआधी शिवसेनेच्या विरोधात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात वाट्टेल ते लिहायचे. यांचा शिवसेनेचा काय संबंध? यांचे पोलीस संरक्षण तातडीने काढा अशी मागणी केली. भास्कर जाधव, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, नाना पटोले, कालिदास कोळंबकर आदींनी संजय राऊत यांच्या विरोधात तातडीने हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली.

यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसात चौकशी करून आठ मार्चला पुढचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा केली. त्याआधी त्यांनी ही बाब विधिमंडळासाठी अवमानकारक असून अतिशय गंभीर असल्याची टिप्पणी केली. अध्यक्षांच्या निर्णयानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राऊत यांच्याविरोधातली आपली घोषणाबाजी चालूच ठेवली. त्यामुळे झालेल्या गदारोळानंतर नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब केले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content