Homeटॉप स्टोरी... अखेर नाना...

… अखेर नाना पटोलेंनी केली थोरातांबरोबर दिलजमाई!

बाळासाहेब थोरात मला सोडून सर्वांना भेटतात, ते नाराज आहेत का, हे ते तुम्हालाच सांगतील… असे सांगणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अखेर दिल्लीतल्या नेत्यांनी दिलेल्या कानपिचक्यांनंतर बाळासाहेब थोरातांबरोबर दिलजमाई केली. दिल्लीश्वरांच्याच इशाऱ्यानंतर पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी या दोन्ही नेत्यांमधली कटुता तोंडदेखली तरी दिसणार नाही हे निश्चित केले.

विधानसभेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातल्या निवडणुकीत थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यामुळे थोरात आणि पटोले यांच्यातला संघर्ष चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर थोरात यांनी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामाही दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडे पाठविला. त्यानंतर दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांनी तातडीने हालचाली करून महाराष्ट्र काँग्रेसमधली बेदिली थोपविण्यात यश मिळवले. एच. के. पाटील यांनी थोरात यांचा राजीनामा फेटाळल्याचे जाहीर केले तसेच थोरात यांच्याबरोबर त्यांच्या घरी एकांतात दीर्घ चर्चा केली. त्यानंतर थोरात यांनीही आपली तलवार म्यान केली.

आज मुंबईत, प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, आ. प्रणिती शिंदे, खासदार कुमार केतकर, डॉ. भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, विलास मुत्तेमवार, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजित कदम, सतेज पाटील, वसंत पुरके, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, एनएसयुआयचे आमीर शेख आदी उपस्थित होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत पक्षांतर्गत कोणतेही वाद नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात व आपल्यामध्ये कोणतेही वाद नाहीत. आम्ही एकत्रच आहोत. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीतील नागपूर व अमरावतीतील पराभवाकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टीने आमच्यात मतभेद असल्याचे वातावरण निर्माण केले व माध्यमांनी त्याला हवा दिली, असे पटोले यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेचा संदेश राज्यभर पोहोचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राज्यात सुरू करण्यात आले असून घरोघरी जाऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा संदेश पोहोचवावा. अमरावती व नागपूरमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे. कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही मविआचेच उमेदवार विजयी होतील. भाजपाच्या कारभाराला जनता कंटाळली असून आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करण्याचा संकल्प करा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले.  

भारत जोडो यात्रेची दखल जगाने घेतलेली आहे. एव्हढी मोठी पदयात्रा जगाच्या पाठीवार आजपर्यंत झालेली नाही. ही यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम केले. भारत जोडो यात्रेने जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे काम केले. भाजपाचा कारभार पाहता देशात लोकशाही, संविधान राहिल का नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देश, लोकशाही व संविधान वाचवण्याचे काम काँग्रेसच करू शकतो. काँग्रेसच आता आशेचा किरण आहे, असे थोरात म्हणाले.

राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतील वातावरण पाहता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला भीती वाटू लागली आहे. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळल्या जात आहेत. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकाही एकत्रितच घेतल्या जाण्याची शक्यता आहे. आगामी वर्ष महत्त्वाचे आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या कामाला आतापासूनच लागा असे आवाहन चव्हाण यांनी केले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content