काळा घोडा आर्ट असोसिअशनतर्फे मुंबईत आयोजित होणारा काळा घोडा कला महोत्सव फोर्ट आणि चर्चगेट परिसरातील रॅम्पर्ट रोड, क्रॉस मैदान, कूपरेज बँडस्टँड, म्युझियम गार्डन, NGMA याठिकाणी ४ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून तो १२ तारखेपर्यंत सुरू राहील. रोज सकाळी १० वाजता हा महोत्सव सुरू होतो. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यावर्षी पुन्हा एकदा कलाप्रेमींसाठी ही पर्वणी उपलब्ध होत आहे.

१९९९मध्ये स्थापित झालेल्या या वार्षिक कला महोत्सवाने देशातील तसेच जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कलांना चालना आणि प्रोत्साहन देणारा आणि मुंबई शहराच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करणारा हा कार्यक्रम कलापर्यटनाचेही लक्षणीय माध्यम बनला आहे. दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसरात नऊ दिवस चालणाऱ्या या कला महोत्सवात ललित कला, नृत्य, नाटक, सिनेमा, वास्तुकला, छायाचित्रण, सांस्कृतिक आणि प्रादेशिक कला अशा अनेक कलांचे सादरीकरण येथे होणार आहे. कलाप्रदर्शन आणि कार्यशाळा व्यतिरिक्त अनेक दिग्गजांबरोबर अनुभवांची देवाणघेवाण हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे.

४ फेबुवारी रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री तसेच मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचा आढावा घेतल्यानंतर कलाकांराचे अभिनंदन करून कला व कलाकार यांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. त्यांच्या या आश्वासनाने कलाक्षेत्रात हुरूप वाढला आहे.



