Homeटॉप स्टोरीउद्यापासून उद्धव ठाकरे...

उद्यापासून उद्धव ठाकरे होणार ‘मुँहबोले पक्षप्रमुख’!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उद्या साजरी होत असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून प्रश्नांकित शिवसेनेचे ‘मुँहबोले पक्षप्रमुख’ होणार आहेत.

शिवसेना सत्तेत असताना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना ठाकरे यांच्याकडे पक्षाचे पक्षप्रमुखपदही होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत उठाव झाला आणि तेव्हापासून ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्षावरच हक्क सांगितला आणि धनुष्यबाण चिन्हाचीही मागणी केली. केंद्रीय निवडणूक आयोगापुढे हा विषय सध्या प्रलंबित आहे. येत्या ३० जानेवारीला यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी कोणता गट वैध आहे आणि कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरणार यावर सध्याच्या शिंदे—फडणवीस सरकारचे भवितव्य ठरणार आहे. आणि हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावर १४ फेब्रुवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे. ढोबळ मानाने पाहिल्यास निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे विचाराधीन असलेले विषय परस्परांशी संबंधित आहेत.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. तोपर्यंत मूळ शिवसेना नेमकी कोणाची आहे, उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची हे निश्चित होणार नव्हते. त्यामुळेच या पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण कोणाचे हेही गुलदस्तात राहिले. पोटनिवडणुकीत अडचण येऊ नये तसेच शिवसेना आणि धनुष्यबाणाचा निर्णय होईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले. ठाकरे यांच्या या पक्षाला मशाल ही निशाणी दिली तर शिंदे यांच्या पक्षाला ढाल तलवार ही शिवसेनेची फार पूर्वीची निशाणी दिली. सध्या शिवसेनेतले हे दोन्ही गट त्यांच्या या नव्या पक्षांचे नेते आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेतल्या पक्षप्रमुखपदाची मुदत उद्या संपत आहे. त्यामुळेच त्यांच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षप्रमुखपदासाठी निवडणूक घेण्याची परवानगी द्यावी किंवा सध्याच्या पदावरील व्यक्तीला मुदतवाढ द्यावी अशी विनंती करण्यात आली. परंतु सध्या शिवसेना, या पक्षाचे नाव आणि चिन्हच गोठविण्यात आल्याने प्रत्यक्षात शिवसेना पक्षच अस्तित्त्वात राहिलेला नाही. परिणामी त्याचे पक्षप्रमुखपदही निकालात निघाले आहे. त्यामुळे आयोगाने ठाकरे गटाच्या या विनंतीवर काही भाष्यच केले नाही आणि निर्णयही दिला नाही. शिवसेना हे नाव आणि त्याचे धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाकडे गेल्यावरच पुन्हा पक्षप्रमुखपद अस्तित्त्वात येईल आणि तेव्हाच उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाला काही अर्थ राहील. तोपर्यंत त्यांचे पक्षप्रमुखपद हे ‘मुँहबोला भाई’प्रमाणेच ‘मुँहबोला पक्षप्रमुख’ असे असेल.

ठाकरे तसेच त्यांचे पाठिराखे आजही शिवसेना आपलीच असा दावा करत आहेत. त्यामुळेच त्यांच्यावतीने पक्षाचे पक्षप्रमुखपद आजही अबाधित असल्याचे मानले जाते. त्यामुळेच त्यांच्याकडून या पदाची मुदत २३ जानेवारीला संपत असून त्याकरीता निवडणूक घेण्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. तशी परवानगी देता येणे शक्य नसेल तर या पदासाठी मुदतवाढ द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली होती. परंतु आयोगाने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने ठाकरे गटाच्या पाठिराख्यांच्या पदरी निराशा पडली. या पाठिराख्यांच्या मते पक्षप्रमुखपद अबाधित असले तरीही त्याचीही मुदत उद्या संपत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे उद्यापासून अधिकृतपणे ‘मुँहबोले पक्षप्रमुख’ होतील, हे निश्चित मानले जात आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content