Homeटॉप स्टोरीआताचा उत्तर प्रदेश...

आताचा उत्तर प्रदेश आव्हानांपासून पळ काढत नाही!

भारताचा नवीन उत्तर प्रदेश आव्हाने बघून पळ काढत नाही तर त्याचा कडवटपणे मुकाबला करतो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश आत्मविश्वासाने पुरेपूर सक्षम आहे. उत्तर प्रदेश आत्मनिर्भर होण्यासाठी सक्रिय आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केले.

उत्तर प्रदेशला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून योगी आदित्यनाथ आज संध्याकाळी मुंबईत पोहोचले. आजपासून ते दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मुंबईतल्या प्रवासी उत्तर प्रदेशवासियांशी संवाद साधला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना समोर बघून उत्साही झालेल्या प्रवासी प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या पाच-सहा वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या सुधारणांचे आपण साक्षीदार आहात. पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशला कोणी ओळखत नव्हते. आज तिथे विकासाच्या नवीन कहाण्या रचल्या जात आहेत. आजमगडच्या लोकांना याच मुंबईत धर्मशाळा मिळत नव्हती. आज त्याच आजमगडमध्ये विमानतळ आणि विद्यापीठ उभारले जात आहे. आज उत्तर प्रदेशच्या युवकाला आपली ओळख लपवावी लागत नाही. तो अभिमानाने सांगतो की मी उत्तर प्रदेशातला आहे. कोरोना महामारीत जेव्हा प्रवासी उत्तर प्रदेशवासियांवर पलायनाचे संकट आले तेव्हा उत्तर प्रदेशने सर्वांना सहारा दिला, असेही ते म्हणाले.

2017पूर्वी उत्तर प्रदेशात मुली सुरक्षित नव्हत्या. गरीब आणि व्यापारी असुरक्षित वातावरणात वावरत होते. आमच्या सरकारची स्थापना झाली आणि आम्ही पहिल्यांदा दोन विषयांवर विशेष लक्ष केंद्रित केले. सर्वात पहिले तिथे मुलींची सुरक्षा सुनिश्चित केली गेली. त्यानंतर दुसरा मुद्दा होता तो अवैध धंद्यांचा. हे धंदे चालणार नाहीत याची आम्ही पुरेपूर काळजी घेत आहोत. अवैध कत्तलखाने असोत किंवा गरिबांच्या जमिनीवरील अवैध कब्जा असो, सगळे बंद झालेले आहेत. आम्ही यांच्या विरोधात विशेष टास्क फोर्स तयार केला आहे. आज तिथे विकासाच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. आम्ही जेव्हा मुलींची सुरक्षा सुनिश्चित करायला लागलो त्यावेळेला आमच्या विचारांवर काही जणांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. पण जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा याच सुरक्षित माता-भगिनींनी आणि मुलींनी पंतप्रधान मोदी यांच्या धोरणावर आपला विश्वास व्यक्त केला, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

गेल्या साडेपाच वर्षांत आम्ही पाच लाखांहून अधिक युवकांना सरकारी नोकऱ्या देण्यात यशस्वी झालो आहोत. उमेदवाराच्या निवडीत होत असलेला हस्तक्षेप आम्ही बंद केला आहे. नोकर भरतीसाठी संबंधित विभागांना स्वायत्तता दिली आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्यावरील जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळेच पाच लाखांपेक्षा जास्त युवकांना आम्ही सरकारी नोकरी दिल्यानंतरही एकाही नियुक्तीवर कोणी प्रश्न उपस्थित करू शकले नाही. प्रत्येक ठिकाणची भरती पारदर्शक पद्धतीनेच केली गेली. त्यामुळे युवकांचा आज सरकारवरचा विश्वास वाढला आहे. म्हणूनच 37 वर्षानंतर उत्तर प्रदेशमध्ये एखादे सरकार पुन्हा दुसऱ्यांदा दोनतृतीयांश बहुमताने निवडून आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

एक काळ होता जेव्हा उत्तर प्रदेशात दर दोन-तीन दिवसांनी दंगल होत होती. आज पाच वर्षे होऊन गेली तिथे एकही दंगल झालेली नाही. कायदा आणि सुव्यवस्था चांगली असल्यामुळेच उत्तर प्रदेशात सरकार 25 नवीन सेक्टरल पॉलिसी लागू करू शकले. उत्तर प्रदेश सरकार वायू, जल, रस्ते तसेच रेल्वेच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यावेळी उपस्थित होते.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content