Homeमाय व्हॉईसबात निकलेगी तो...

बात निकलेगी तो बहोत दूरतलक जाएगी…

मी शांत आहे, याचा अर्थ मी हतबल आहे असा काढू नका… मी तोंड उघडले तर गोष्टी कुठपर्यंत जातील, याचा विचार करा. हे हिन्दीतून सुनावताना बात बहोत दूरतलक जाएगी… याचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज नागपूरला महाराष्ट्र विधानसभेतील शेवटचा दिवस गाजवला.

विधानसभेच्या अधिवेशनाचा समारोप शुक्रवारी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने झाला. सुमारे तासाभराच्या भाषणात मुख्यमंत्री शिन्दे यांनी विरोधकांच्या बहुतेक आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आणि वक्तृत्वासाठी फारसे प्रसिद्ध नसले तरी मुद्दे चोख मांडून त्यांनी आपले सरकार मुदत पूर्ण करून आगामी सर्व निवडणुकाही भारतीय जनता पक्षाबरोबरच्या युतीत बहुमताने जिंकेल, असा विश्वासही व्यक्त केला.

विरोधकांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री शिन्दे यांनी सवाल केला की, ज्यांचे गृहमंत्री जेलमध्ये जातात, ज्यांचे मंत्री दाऊद इब्राहिमबरोबर संबंध असल्याच्या आरोपावरून जेलमध्ये जातात, त्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे… सत्तेच्या दुरुपयोगाच्या आरोपाबद्दल प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यांनी कंगना राणावतला अडकवण्यासाठी वकिलाला करदात्या जनतेचे ८० लाख रुपये मोजले आणि केवळ हनुमान चालिसा पठण करण्याचे जाहीर केले म्हणून महिला खासदाराला जेलमध्ये टाकले… इतकेच नाही तर केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंना ज्यांनी सत्तेचा दुरूपयोग करून जेवणाच्या ताटावरून उठवून नेले, त्यांनी आमच्यावर आरोप करायचे… विरोधी बातम्या देणाऱ्या अर्णब गोस्वामी किंवा एबीपीचे राहुल कुलकर्णी यांच्यासारख्या पत्रकारांना तुम्ही अटक करता आणि आम्हाला प्रश्न विचारता… आज आमच्याविरुद्ध बातम्या देणाऱ्यांना आम्ही एका शब्दाने जाब विचारत नाही की आमच्या बाजूने बातम्या द्या, असेही सांगत नाही.

उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, अहो मुख्यमंत्रीपद मिळाले म्हणजे आभाळाला हात लागले असे ज्यांना वाटत होते, त्यांनी गरीश महाजन यांना अडकवण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यांना न्यायालयात धावाधाव करून स्वतःला वाचवावे लागले. तीच गोष्ट देवेन्द्र फडणवीस यांच्याही बाबतीत केली आणि त्यांना कुठून तरी अडकवता येईल का, असे प्रयत्न केले आणि अजितदादा हे तुम्हाला सर्व माहीत आहे, तरी आमच्यावर सत्तेच्या दुरूपयोगाचा आरोप करता आणि आम्हाला सत्तेची मस्ती आहे, असे आरोप करता? या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या त्याला सत्तेची मस्ती नाही म्हणायचे का, असा सवालही मुख्यमंत्री शिन्दे यांनी विरोधकांना विचारला.

अजित पवारांना उद्देशून मुख्यमंत्री शिन्दे यांनी सवाल केला की, अजितदादा आज तुम्ही आमच्या मंत्र्यांचे राजीनामे मागताय.. पण तेही अर्धवट कागदपत्रांच्या आधारे. पण, तुमचे मंत्री जेलमध्ये गेले तेव्हा ही राजीनामे मागण्याची हिम्मत तुम्ही का दाखवली नाहीत?

बात

राज्यातल्या शेतकऱ्यानेही हेलिकॉप्टरने फिरले पाहिजे, असे आमचे स्वप्न आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, त्यासाठी तालुका पातळीवर हेलिपॅड बांधायचे आम्ही जाहीर केले. त्यानंतर माझी टिंगल करत हेलिकॉप्टरने शेतावर जाणारा मुख्यमंत्री पाहिलाय का, असेल तर दाखवा आणि लाख रुपये मिळवा, अशी टीका टोमणे मारणाऱ्यांनी केली. पण, अडीच वर्षांत मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे आम्ही जाहीर केले. बक्षिसाचे हे सरकारचे म्हणजेच जनतेचे पैसे वाचवायचे म्हणून असला मुख्यमंत्री आणि सरकारच बदलून टाकले, असे प्रत्युत्तरही मुख्यमंत्री शिन्दे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिले.

प्रबोधनकारांच्या वारसांनी लिंबू फिरवण्याची भाषा सुरू केली आणि आम्ही वर्षा बंगल्यावर फार उशिरा गेलो. पण तेथे पाटीभर लिंबेही सापडली, असे सांगून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, यांनी (उद्धव ठाकरे) माझ्यावर रेशीमबागेत गेल्याबद्दल टीका केली. पण स्वतः मात्र गोविंद बागेचे उंबरे झिजवले. मी बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार राज्यात स्थापन केले म्हणून रेशीमबागेत गेलो पण तुम्ही ५० जण सोडून गेल्यावरही माझेच बरोबर, असे सांगत फिरताय आणि माझ्यासारख्या ज्यांना सगळी अंडीपिल्ली माहीत आहेत, त्यांच्यावर आरोप करताय, असा सवालही शिन्दे यांनी विचारला. लिंबूटिंबूची भाषा करणाऱ्यांनी स्वतः बाळासाहेबांच्याच नव्हे तर प्रबोधनकारांच्या विचारांनाही तिलांजली दिली आहे, अशी टीकाही शिन्दे यांनी केली. जे स्वतः घरातून बाहेर पडत नाहीत, त्यांनी हिम्मत दाखवण्याची, मैदानात येण्याची भाषा करू नये, अशा शब्दात मुख्यमंत्री शिन्दे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय करणारे आपले सरकार आहे, असे सांगून राज्यातील गोरगरीबांना दिवाळीमध्ये शंभर रुपयांत दैनंदिन वापराच्या चार वस्तू आमच्या सरकारने दिल्या, असे शिन्दे यांनी सांगितले. तुम्हाला खरंच भ्रष्टाचार थांबवायचा होता तर अण्णा हजारे यांच्यासारखे समाजसेवक कायम मागणी करतात त्या लोकपालसारख्या विधेयकावर तुम्ही का निर्णय घेतला नाहीत, असे विचारून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, आम्ही लोकपाल विधेयक विधिमंडळात मंजूर केले आहे आणि त्यात मुख्यमंत्र्यासकट मंत्रिमंडळातील प्रत्येक सदस्याला लोकपालाच्या कक्षेत आणण्याचे धाडसही आम्हीच दाखवले आहे.     

राज्यातले उद्योग परराज्यात जाताहेत, म्हणून हाकाटी करताय. पण उद्योगांनी महाराष्ट्रात यावे, यासाठी तुम्ही दीड वर्षांत उपसमितीची एकही बैठक घेतली नाहीत आणि उद्योगांना कोणत्याही सवलतीही दिल्या नाहीत. स्वतः पंतप्रधानांनीच मला सांगितले की, महाराष्ट्राकडून प्रतिसाद नसल्याने उद्योग बाहेर गेले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, उद्योगांकडे कोण टक्केवारी मागत होते आणि प्लॉटमधे काय घोटाळे झाले, या सगळ्याची चौकशी तर होणारच आहे. तेव्हा दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

निर्भया पथकासाठीची वाहने मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी, या विषयावर केलेल्या आरोपाचे उत्तर देताना मुख्यमंत्री शिन्दे यांनी निर्भया वाहनांच्या खरेदीचा तपशील जाहीर केला. तो करतानाच गेल्या सरकारमधील सुभाष देसाई, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार या मंत्र्यांसह खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेसाठीही निर्भया पथकासाठी घेतलेल्या ताफ्यातील वाहने दिली गेली होती, याकडेही सभागृहाचे लक्ष वेधले.

गुन्हे प्रगटीकरणाचे प्रमाण, गुन्ह्यांमधे शिक्षा होण्याचे प्रमाण हे सारे वाढले आहे, असे सांगून सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी स्थापन केलेले विशेष युनिट, बालगुन्हेगारीच्या विरोधात उचललेली पावले, बालकांविरुधच्या गुन्ह्यांविरुद्ध उचललेली पावले, महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांबद्दल उचललेली पावले यासह विविध क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेऊन आपले सरकार जिल्हा पातळीवर मुख्यमंत्री कार्यालयाची शाखा उघडून लोकांपर्यंत सरकार प्रभावीपणे पोहोचवेल, असेही जाहीर केले.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये बाळासाहेबांची सेना हा आपला पक्ष राज्यात दोन क्रमांकावर आला आहे आणि हीच आपल्या कामाची पावती आहे, असेही शिन्दे यांनी सांगितले. यापुढे झेंडा तर आमचा असेलच पण अजेंडाही आमचाच असेल, असे सांगून आपला पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर येणाऱ्या सर्व निवडणुकाही जिंकेल आणि आपला कार्यकाळही पूर्ण करेल, असा विश्वासही शिन्दे यांनी व्यक्त केला.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content