राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधले उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि त्यांचे पुत्र भूषण सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवलेल्या जागा रहिवासी जागांमध्ये परावर्तित करून 3000 कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभेत केला. या दोघांचीही एसआयटी चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सध्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे जाहीर केले.
माहितीच्या मुद्द्याच्या आधारे भातखळकर यांनी हा विषय उपस्थित केला. कोरोनाचा कहर सुरू असताना, लोक त्राही त्राही होत असताना, रेमडिसिविर मिळत नसताना, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसताना या दोघांनी सरकारी पैशाची लूट केली. एकेका दिवशी सहा-सहा आदेश काढून औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवलेले भूखंड रहिवासी वापरासाठी मोकळे केले, असे ते म्हणाले.

या भूखंडांचा एकूण परिसर चार लाख 14 हजार चौरस मीटर इतका आहे. त्यांची बाजारातली किंमत 3109 कोटी आहे आणि हे भूखंड परावर्तित केल्यामुळे सरकारच्या तिजोरीत फक्त 168 कोटी रुपये आले. मग हे 3000 कोटी कोणाच्या घशात गेले? मातोश्रीला तर गेले नाहीत ना? हे भूषण सुभाष देसाई सोफीटेल हॉटेलमध्ये बसून काय करत होते? तेव्हाच्या या उद्योग मंत्र्यांनी 20/05/2019, 24/09/2019 आणि 13/10/2019 या तीन दिवशी, दिवसाला सहा-सहा आदेश काढून हे भूखंड निवासी वापरासाठी परावर्तित केले. औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवण्यात आलेले भूखंड थेट रहिवासी वापरासाठी परावर्तित करता येत नाहीत. ते आधी व्यापारी कारणासाठी परावर्तित करावे लागतात आणि नंतर जर गरज भासली तरच ते निवासी वापरासाठी परावर्तित करता येऊ शकतात, ही कायदेशीर तरतूद असताना अत्यंत बेकायदेशीरपणे काम करत देसाई यांनी हा घोटाळा केला असल्याचे भातखळकर यांनी सांगितले.
हे भूषण देसाई तर कोकणचे कसाई, असे म्हणणारे आज त्यांची बाजू घेत आहेत, असा टोलाही त्यांनी भास्कर जाधव यांनी हरकत घेताच लगावला.

