अजित पवार… अजित पवार आहे आणि तो कोणाच्या बापाला भीत नाही, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज त्यांना शरद पवार यांच्याकडून झापण्यात आल्याच्या वृत्ताचे खंडन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच विधिमंडळ नेते जयंत पाटील यांच्या निलंबनप्रकरणी मवाळ भूमिका घेतल्याबद्दल शरद पवार यांनी फोन करून अजित पवार यांना जाब विचारला, अशा बातम्या काही ठिकाणी प्रसारित झाल्या होत्या. त्याबद्दल मंगळवारी सकाळी पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक वार्तालापाच्या वेळी विचारले असता अजित पवार उसळले… आणि म्हणाले की, अजित पवार… अजित पवार आहे आणि तो कुणाच्या बापालाही भीत नाही.
परवा जयंत पाटील यांचे निलंबन झाल्यानंतर सभागृहातून सभात्याग करून आम्ही सगळे खाली आलो. त्यावेळी एक फोन आला आणि पवार साहेबांचा फोन आहे, असे मला सांगितले गेले. कोणीतरी टीव्हीवाल्याने ऐकून बातमी दिली की पवारसाहेबांनी मला झापले. साहेबांनी मला सभागृहात काय झाले हे विचारले आणि माहिती घेतली. पण लोक बातम्या देतात तर प्रत्येकाला जाऊन खुलासे करायचे का…, अशी विचारणाही अजित पवार यांनी केली.

सभागृहात तुमचे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे गुळपीठ आहे, अशी टीका केली जाते, असे एका पत्रकाराने विचारले. त्यावर पुन्हा एकदा उसळून प्रतिक्रिया देत अजित पवार यांनी विचारणा केली, आता सभागृहात फडणवीसांशी कुस्ती करू का… का मारामारी करू…? अहो… शरद पवारसाहेब मुख्यमंत्री असताना आणि विरोधी पक्षात असतानाही त्यांचे सर्वच पक्षातल्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. म्हणजे काय गुळपीठ असते का… जिथे विरोध करायचा तिथे तो आम्ही करतच असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंबरोबर जाण्यास काँग्रेसचा नकार
स्थानिक निवडणुकांमध्ये राज्य पातळीवरील आघाड्या टिकत नाहीत आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येऊ शकतात. पण काँग्रेस शिवसेनेबरोबर येणार नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
सुयोग निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना पवार यांनी वंचित विकास आघाडीबद्दलही मत व्यक्त केले. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता प्रकाश आंबेडकर यांना आघाडीमध्ये बिघाडी करायची आहे की काय, असेच वाटते, अशी टिप्पणीही त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या आधी आपण स्वतः प्रकाश आंबेडकर यांना भेटून वाटाघाटी केल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी ९६ जागा लढवतील आणि वंचित विकास आघाडीसाठी ९६ जागा देऊ, इथपर्यंतचा प्रस्ताव आपण आंबेडकरांना दिला होता. पण नंतर त्यांनी नांदेडची जागा द्या किंवा बारामतीची जागा द्या, अशा अव्यवहार्य मागण्या सुरू केल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या कोट्यातील जागांमधून वंचित विकास आघाडीला जागा द्याव्यात, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.

