Homeटॉप स्टोरीहा तर महाविकास...

हा तर महाविकास आघाडीलाच धडकी भरवणारा मोर्चा!

महाराष्ट्रातल्या शिंदे फडणवीस सरकारला धडकी भरवणारा हा महामोर्चा असेल असे गेले आठवडाभर ठासून सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आज अखेर भ्रमनिरास झाला. सरकारला धडकी भरवण्याऐवजी हा ‘हल्लाबोल महामोर्चा’ अखेर आघाडीलाच धडकी भरवणारा ठरला. इतकी मेहनत करून, नेत्यांना टार्गेट देऊनही महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज अपेक्षित यश मिळाले नाही, अशीच चर्चा नंतर रंगली होती.

१२ वाजेपर्यंत पाहिली गेली मोर्चेकरांची वाट

सकाळी साडेदहा वाजता सुरू होणारा मोर्चा मोर्चेकरांनी पाठ फिरवल्यामुळे दुपारी बाराच्या आसपास प्रत्यक्षात आकारात यायला लागला. रस्त्यावर वाहनांसाठी जागा सोडण्याच्या बहाण्याने मोर्चाची रुंदी जितकी कमी करता येईल तितकी कमी करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला. तरीही मोर्चेकरी दाटीवाटीने सहभागी झाल्याचे चित्र कोठेही दिसले नाही.

नेत्यांनी घेतला हॉटेलचा आसरा

जे. जे. रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या रिचर्डसन क्रुडास कंपनीजवळून हा मोर्चा निघणार होता. सकाळी साडेआठ-नऊ वाजल्यापासूनच महाविकास आघाडीचे नेते घटनास्थळी पोहोचू लागले होते. परंतु कार्यकर्ते अभावानेच दिसत होते. परिणामी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रस्त्यावर उभे राहण्यापेक्षा मुंबई सेंट्रल परिसरातील एका हॉटेलचा आसरा धरला. बैठकीच्या निमित्ताने हे नेते हॉटेलमध्येच विसावले. यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांचा समावेश होता. शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर, सचिन अहिर, संजय राऊत तसेच अनिल देसाई भायखळा परिसरात येऊन पाहणी करून निघून गेले.

घोषणा आणि डबे बाजवून केला नाद

साधारण बारा वाजण्याच्या सुमारास मोर्चा हळूहळू पुढे सरकू लागला. मोर्चातल्या लोकांकडे पुठ्ठ्यावर लिहिलेले फलक दिसत होते. रस्त्याच्या दुतर्फा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही, महापुरुषांचा अपमान सहन होणार नाही अशा आशयाच्या घोषणा करणारे मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले होते. हा मोर्चा सुरू असताना काही मोर्चेकरी डबे वाजवून त्याचा नाद करत होते. आदिवासी भागातून आलेले काही मोर्चेकरी पारंपारिक नृत्य सादर करत होते. हल्लाबोल.. हल्लाबोल… अशा घोषणा देत होते. या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणा कानावर पडत होत्या. पण कोणत्याही घोषणांमध्ये एकवाक्यता नव्हती. दहा-बारा जणांच्या घोळका एखाद्या घोषणेला प्रतिसाद देत होता.

रश्मी, तेजस ठाकरेही मोर्चात सहभागी

छत्रपती शिवाजी महाराज की जय… असे घोषवाक्य लिहिलेले फलक मोर्चेकरांच्या हातात होते. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असलेल्या टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ संपणार होता. तिथे एक व्यासपीठ उभारण्यात आले होते. साधारण दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हा मोर्चा सीएसटीएम परिसरात पोहोचला तेव्हा त्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब मोर्चात सहभागी झाले. यात ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे दोन्ही मुले आदित्य तसेच तेजस यात सहभागी झाले होते त्यावेळी ठाकरेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

मोर्चेकऱ्यांमध्ये जोश भरण्याचा अजितदादांचा प्रयत्न

मोर्चा थांबल्यानंतर व्यासपीठावरून अजित पवार यांनी मोर्चेकरांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही घोषणा देत उपस्थितांना त्याला साथ देण्यासाठी सांगितले. पहिलीच घोषणा होती- जय जय जय जय जय जय जय शिवाजी… आणि त्याला प्रतिसाद देताना मोर्चेकरांकडून फार हलका आवाज आला. तेव्हा अजितदादांना सांगावे लागले… हा आवाज काहीच नाही. दिल्लीला पोहोचला पाहिजे. मोठ्याने बोला… त्यानंतर उपस्थित मोर्चेकरांनी पुढच्या घोषणांना प्रतिसाद दिला. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यासपीठावर येताच त्या तेथे उपस्थित असलेले शरद पवार यांच्या पाया पडल्या.

पोलिसांनी वाहतूक वळवली

महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केला होता. रिचर्डसन्स क्रुडास मिल, सर जे. जे. उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नवरोजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टाईम्स ऑफ इंडिया हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्या मार्गावरील वाहनचालकांना गॅस कंपनी-चिंचपोकळी पूल-आर्थर रोड-सात रास्ता सर्कल-मुंबई सेंट्रल-लॅमिंग्टन रोड-ऑपेरा हाउस-महर्षी कर्वे रोड (क्वीन्स रोड), हा पर्यायी मार्ग किंवा सात रस्ता सर्कल- मुंबई सेंट्रल- ताडदेव सर्कल- नाना चौक- एन.एस. पुरंदरे रोड मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले.

अडीच हजार पोलीस बंदोबस्ताला

महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये राज्यभरातील ठाकरे गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. डाव्या पक्षांचे कार्यकर्तेही यात सहभागी झाले होते. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता. जागोजागी पोलिसांची पथक तैनात करण्यात आली होती. ड्रोनद्वारे पोलिसांनी मोर्चावर नजर ठेवली होती.

महापुरूषांचे ठेवले होते पुतळे

महाविकास आघाडीच्या मोर्चात महापुरुषांचे पुतळे पाहायला मिळाले. महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी मविआने हा मोर्चा काढला होता. त्यामुळे या मोर्चामध्ये महापुरुषांचे पुतळे ठेवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे पुतळे मोर्चात पाहायला मिळाले.

राज्यपालांची हकालपट्टी झाली नाही तर महाराष्ट्र पेटेल

केंद्र सरकारने राज्यपालांची लवकरात लवकर हकालपट्टी केली नाही, तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी दिला. महाराष्ट्राच्या सन्मानासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने लोक येथे आले आहेत. आज ज्यांच्या हातात राज्याची सूत्रे आहेत, ते लोक महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वेगळ्या प्रकारची भाषा वापरत आहेत. भारताला आत्मविश्वास देण्याचे ऐतिहासिक काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. या देशात अनेक राजे होऊन गेले. अनेकांची संस्थाने झाली. पण मागील साडेतीनशे वर्षांपासून सामान्य माणसांच्या अंतकरणावर एकच नाव अखंड आहे, ते नाव म्हणजे हिंदवी स्वाराज्याची स्थापना करणारे ‘शिवछत्रपती’. अशा शिवाजी महाराजांचा आक्षेपार्ह उल्लेख राज्याचा एखादा मंत्री करतो. अन्य कुणी सत्ताधारी पक्षाचे घटकपक्ष करतात, हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. ही भावना व्यक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने तुम्ही इथे आला आहात. यातून राजकर्त्यांनी बोध घेतला नाही, तर लोकशाहीच्या मार्गाने त्यांना धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करायलाच हवा

कर्नाटक असो वा आणखी इतर शक्ती असो, हे सगळे एकत्र महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत. महाराष्ट्राचे लचके तोडत आहेत. त्यामुळे या महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करायलाच हवा, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आजचा महामोर्चा हा त्याचाच भाग असून हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे असेही ते म्हणाले. 

बऱ्याच वर्षानंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. ज्यावेळी या मोर्चाची घोषणा केली त्यावेळी तुम्ही चालणार का, असा सवाल मला करण्यात आला. त्यावेळी ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्यांच्या छाताडावर चालणार असल्याचे मी म्हणालो. मुंबईसह महाराष्ट्र झाला, पण अजूनही बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही. आजच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रप्रेमी सामील झाले आहेत. बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे तोतया या मोर्चामध्ये नाहीत. राज्यपालपद मोठे आहे, त्याचा आम्ही मान ठेवतो. पण राज्यपाल कोण असावा याचा विचार करावा. या राज्यपालांना मी राज्यपाल मानतच नाही, असे ठाकरे म्हणाले.

मास्टरमाईंड शोधण्याची गरज

आजच्या महाविकास आघाडीच्या मोर्चाने राज्यकर्त्यांना धडकी भरली असेल, महापुरुषांबाबत सातत्याने अपमानास्पद बोललं जात आहे. राज्याचे दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. गरळ ओकण्याचे, बेताल वक्तव्ये सातत्याने केली जात आहे. यामागे कोण मास्टरमांईड हे शोधण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content