Homeपब्लिक फिगरसुधीर मुनगंटीवारांच्या कार्यशैलीवर...

सुधीर मुनगंटीवारांच्या कार्यशैलीवर दैवत बोरकर यांना पीएचडी!

एखाद्या राजकीय नेत्याची गुणसंपन्नता, ओघवती भाषा, अनोखी कार्यशैली, विषयाची खोली जाणून घेण्याची कुवत, प्रचंड आकलनशक्ती, अचूक नियोजन, कायद्याचे प्रगाढ ज्ञान, मूल्याधिष्ठित आचरण, प्रसंगी अन्यायाविरुद्ध करावा लागणारा संघर्ष… अशा विविध गुणविशेषांचा एक, दोन नव्हे तब्बल चार वर्षे झालेला अभ्यास, त्यातून साकारलेला आणि डॉक्टरेट पदवीला पात्र ठरलेला एक प्रबंध… याची ही अनोखी कहाणी आहे सुधीर मुनगंटीवारांच्या कार्यशैलीवर दैवत बोरकर यांनी केलेली पीएचडी!

राज्याच्या एका टोकावर वसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वास्तव्य असलेलं, पण आपल्या आगळ्या कार्यशैलीने संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशपातळीवरही व्यक्तिमत्वाची अमोघ छाप उमटविणारे, राज्याचे विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा, कार्यशैलीचा, संवादशैलीचा, प्रश्न धसास लावण्याच्या तळमळीचा, विधिमंडळात संसदीय आयुधांचा वापर करत प्रश्न तडीस नेण्यासाठीची त्यांची धडपड अशा विविध बाबींचे सखोल निरीक्षण, आकलन, अभ्यास करीत त्यावर‌ पीएचडीसाठी प्रबंध लिहिण्याची कल्पना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी व राज्यशास्त्र विषयात अध्यापन करणारे दैवत बोरकर यांच्या मनात आली.

दैवत बोरकर यांचे वडील रघुनाथ बोरकर यांनीही त्यांच्या उमेदीच्या काळात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या पुरातत्त्वासंदर्भात अभ्यास करून पीएचडीसाठी प्रबंध सादर करून पीएचडी मिळवली होती. आता दैवत यांनी याच जिल्ह्यातील एका अनोख्या राजकीय नेतृत्त्वाच्या अनोख्या आणि म्हणूनच लोकप्रिय ठरलेल्या कार्यशैलीचा विषय आपल्या अध्ययनासाठी निवडला.

सुमारे सहा वर्षांपूर्वी पीएचडीसाठी गोंडवाना विद्यापीठात रजीस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांनी या विषयावर प्रत्यक्ष अभ्यास सुरू केला. होणाऱ्या प्रत्येक भेटीतून सुधीर मुनगंटीवार यांच्या व्यक्तिमत्वाचे विविधांगी कंगोरे उलगडत गेले तर दुसरीकडे विधिमंडळात त्यांनी मांडलेले प्रश्न, सामाजिक विषय, आशयघन अशी अशासकीय विधेयके, त्यांनी केलेला संसदीय आयुधांचा सुयोग्य वापर… या साऱ्याच बाबी थक्क करणाऱ्या ठरल्या. त्यांची नोंद दैवत बोरकर यांनी या प्रबंधातून ती विस्तृतपणे मांडली आहे.

राजकारणात वावर असलेल्या एका उच्चशिक्षित राजकीय नेत्याचा राजकारणापलीकडच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील व्यासंगावर, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उभारलेले ग्रंथालय आणि अभ्यासिकेवर, प्रकाश टाकतानाच दैवत बोरकर यांनी, सुधीर मुनगंटीवार यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचे त्यांनी अभ्यासलेले पैलूही उद्धृत केले आहेत. गॉडफादर नसताना सुधीर मुनगंटीवार यांनी राजकारणात गाठलेली उंची, समाजात मिळवलेले प्रतिष्ठेचे स्थान, शेतकरी, कामगार, महिला, अपंग, विद्यार्थी, वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, नागपूर, अमरावती, पुणे विद्यापीठांना‌ तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची मागणी करताना त्यांनी विधिमंडळात लढलेली लढाई…. ग्रंथालय, नाट्यगृह, इतिहासात प्रथमच आयएसओ प्रमाणपत्रासाठी पात्र ठरलेले त्यांच्या विभागाचे मंत्रालयातील दर्जेदार कार्यालय, वनौपजांसाठीचे संशोधन केंद्र अशा कितीतरी गोष्टी त्यांच्या राजकारणविरहीत द्रष्टेपणाची साक्ष ठरतात, त्याचेही विस्तृत विवेचन दैवत बोरकर यांनी त्यांच्या या प्रबंधातून केले आहे.

उत्कृष्ट संसदपटूपासून तर, अंध कल्‍याणाच्‍या क्षेत्रात उल्‍लेखनीय काम केल्‍याबददल राष्‍ट्रीय दृष्‍टीहीन संघाच्‍या वतीने जी. एल. नर्डेकर स्‍मृती पुरस्‍कार, वृक्षारोपण मोहिमेसंदर्भात किर्लोस्‍कर वसुंधरा अवार्ड, लोकसेवा आणि विकास संस्‍थेचा कर्मवीर मासा कन्‍नमवार मेमोरियल अवार्ड, दैनिक लोकमतचा महाराष्‍ट्रीयन ऑफ द इयर, इंडिया टुडे समुहाद्वारा दोन वेळा बेस्‍ट फायनान्‍स मिनिस्‍टर पुरस्‍कार, आफ्टरनून व्‍हॉइस या संस्‍थेद्वारे बेस्‍ट परफॉर्मिंग मिनिस्‍टर पुरस्‍कार, जे. सी. आय. महाराष्‍ट्रतर्फे मॅन ऑफ द इयर पुरस्‍कार, फेम इंडियातर्फे उत्‍कृष्‍ट मंत्री पुरस्‍कार अशा प्रतिष्‍ठेच्‍या पुरस्‍कारांनी त्‍यांना सन्‍मानित करण्यात आले, ही त्यांच्या कार्याची समाजाने घेतलेली दखलही, दैवत बोरकर यांच्या प्रबंधाचा भाग ठरली आहे.

आपल्या अनोख्या कार्यशैलीतून ते देशातील पहिले आय.एस.ओ. मंत्री कार्यालय होण्याचा बहुमानप्राप्त मंत्री ठरले. वनमंत्री म्हणून हरित महाराष्ट्र संकल्पना राबवत त्यांनी 3 वर्षांत 50 कोटी वृक्ष लागवडाची विक्रमी मोहीम राज्यात राबविली. विक्रमी वृक्षारोपण मोहिमेची दखल ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ तसेच ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’तर्फे घेतली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात या वृक्षारोपण मोहिमेचे कौतुक केले. राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करणारे ते मंत्री ठरले. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण ठेव रकमेत वाढ करण्याचा निर्णय, किडनी डायलीसीस व कर्करोगावरील औषधे करमुक्त करणे, चंद्रपूर जिल्हयातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचे वन अकादमीमध्ये रुपांतर व सदर अकादमीला स्वायत्तता प्रदान करणे, असे ऐतिहासिक निर्णयदेखील त्यांच्या सामाजिक भावनेची साक्ष ठरले आहेत. त्याचीही दखल अभ्यासकांनी त्यांच्या प्रबंधातून घेतली आहे.

नेतृत्त्व कुशल, तळमळ जपणारे, मूल्याधिष्ठित आचरण असणारे, प्रामाणिक, जागरूक, संघर्ष करणारे, समाजाला दिशा देणारे असेल, तर सकारात्मक समाजपरिवर्तन ही काळ्या दगडावरची रेघ आहे… हा या प्रबंधनाचा निष्कर्षही त्यांनी अधोरेखित केला आहे. ‘सुधीर मुनगंटीवार यांचे राजकीय नेतृत्त्व: एक चिकित्सक अभ्यास’, या विषयावरील या प्रबंधाला गोंडवाना विद्यापीठाने नुकतीच पीएचडी बहाल केली असून, आगामी काळात होणाऱ्या दीक्षांत समारंभ दैवत बोरकर यांना ती प्रदान केली जाईल.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content