राज्य सरकारने काल रात्री अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अपर पोलीस महासंचालकपदी नेमणूक केली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) मिलिंद भारंबे यांची नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईच्या वाहतूक विभागाचे पोलीस सहआयुक्त राज वर्धन यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात अपर पोलीस महासंचालक आणि सहव्यवस्थापकीय संचालक या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनय कुमार चौबे यांची पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले निकेत कौशिक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले शिरीष जैन यांची राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली असून विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) संजय मोहिते यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) या पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
नागपूर शहराचे अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची अमरावती शहराचे पोलीस आयुक्त म्हणून तर अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची मुंबईत सशस्त्र पोलीस दलात अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांची गुन्हा अन्वेषण विभागात पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून तर नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची मुंबईत वाहतूक पोलीस खात्यात अपर पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईच्या मध्य प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची मुंबईतच अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांची विशेष शाखेत अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांची पुणे शहराचे पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांची मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. म्हाडाचे मुख्य दक्षता अधिकारी प्रशांत बुरडे यांची पुण्यात गुन्हा अन्वेषण शाखेचे अपर पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सागरी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सत्यनारायण चौधरी यांची मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निशित मिश्रा यांची मुंबई आर्थिक गुन्हे विभागाचे पोलीस सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे खात्याचे सहआयुक्त प्रवीण पडवळ यांची मुंबईच्या वाहतूक विभागात पोलीस सहआयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक लखमी गौतम यांची मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) एस. जयकुमार यांची पोलीस सहआयुक्त (प्रशासन) म्हणून तर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक शहराचे पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक प्रवीण पवार यांची कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पुण्याच्या मोटर परिवहन विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईतील संरक्षण व सुरक्षा विभागाचे अपर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांची मुंबईत मध्य प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून तर दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस उपमहानिरीक्षक परमजीत दहिया यांची मुंबईत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांची मुंबईच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्णून नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईच्या विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त राजीव जैन यांची मुंबईतल्या उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

