अलीकडेच एक मैसूर सॅंडल सोप आला होता… राहुल गांधी. अरे, सावरकरांवर बोलण्याची लायकी आहे का तुझी? म्हणे माफी मागितली. दयेचा अर्ज… दयेचा.. तो एक रणनीतीचा भाग असतो. चांगली गोष्ट करण्यासाठी एखादी भूमिका जर कोणी घेत असेल तर तो रणनीतीचा भाग असतो. हे ज्याला समजत नाही तो गुळगुळीत मेंदूचा… अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा समाचार घेतला.
गोरेगाव येथील नेस्को सभागारात झालेल्या गटाध्यक्षांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. सावरकरांची जशी बदनामी होत आहे तशीच बदनामी पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आदींची नेत्यांचीही केली जात आहे. दोन्ही बाजूंनी परस्परांची बदनामी करून हाताला काय लागणार, असा सवाल त्यांनी केला. आता हे बस करा. देशासमोर जे प्रश्न आहेत.. उद्योग, नोकऱ्या, आरोग्य, सुरक्षितता या प्रश्नांना आपण कसे सामोरे जायचे याचा विचार करा, असे आवाहनही त्यांनी केले.
आताचे माजी मुख्यमंत्री… मुख्यमंत्रीपदावर असताना हे तब्येतीचे कारण पुढे करत बसले होते. त्या एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली तर आता हे फिरत आहेत. स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात धरून कोपऱ्यात बसणारे आम्ही नाही. या उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी खटला आहे का? भूमिका घ्यायचीच नाही. नुसता पैसा अधिकार आणि स्वार्थासाठी जे शक्य आहे ते करायचे हे त्यांचे काम, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
सध्या राजकारणाची पातळी इतकी खालच्या स्तरावर गेली आहे की राज्यातला एक मंत्री एका महिला नेत्याला जाहीरपणे शिवी देतो? याला काय म्हणायचे? काही प्रवक्ते तर लायकी काय आणि बोलतात काय? अरे कशासाठी? साधूसंतांनी हा महाराष्ट्र घडवला आहे आणि असा महाराष्ट्र उद्या डोळ्यांनी आम्ही पाहायचा का, अशी टीका राज ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांचे यांचे नाव न घेता केली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, वय काय आणि बोलताय काय? राज्यपाल म्हणून आम्ही गप्प बसतो. म्हणे गुजराती, मारवाडी महाराष्ट्रातून गेले तर राहणार काय? अरे.. त्या गुजराती-मारवाड्यांना विचारा… तुम्ही महाराष्ट्रात का आलात? कारण.. महाराष्ट्र समृद्ध होताच आणि आजही तो आहे.
येत्या पंधरा दिवसात मनसेने पुकारलेल्या विविध आंदोलनांचा आणि भूमिकांचे पुढे काय झाले? आपल्याला किती यश मिळाले हे सांगणारी पुस्तिका पक्षाच्या प्रत्येक गटाध्यक्षाकडे दिली जाईल. हा गटाध्यक्ष जनतेला भेटणारा राज ठाकरेच असेल. या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने उतरा. मुंबई महापालिका तुमच्या हातात आणून देतो, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. आपले वरिष्ठ पदाधिकारी काम करत नसतील तर थेट माझ्याकडे तक्रार करा. मला हुजरे गोळा करायचे नाहीत, अशा शब्दांत त्यांनी पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनाही सुनावले.
अजूनही ज्या मशिदींतून भोंग्यांचा मोठ्याने आवाज येत असेल तेथे हनुमान चालीसा पठनाचा कार्यक्रम करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

